Saturday, 22 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.05.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक२२ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      जहां बीमार वही उपचार - कोरोना विरोधातल्या लढाईत पंतप्रधानांचा नवा मंत्र. 

·      तौक्ते चक्रीवादळानं झालेल्या नुकसान भरपाईचा निर्णय दोन दिवसांत - मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.

·      गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार.

·      चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचं कोविड संसर्गानं निधन.

·      राज्यात काल २९ हजार ६४४ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल १०१ रुग्णांचा मृत्यू तर नव्या तीन हजार २०८ रुग्णांची नोंद.

·      परभणी जिल्ह्यात आज आणि उद्या कडकडीत टाळेबंदी; उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारपासून एक जूनपर्यंत टाळेबंदी काही अंशी शिथील.

आणि

·      नैऋत्य मोसमी पाऊस काल अंदमान बेटांवर दाखल.

****

‘जहां बीमार वही उपचार’ हा कोरोना विरोधातल्या लढाईचा नवा मंत्र असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मधल्या डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करत असलेल्या कोरोना योद्ध्यांशी ते काल संवाद बोलत होते. कोरोना महामारीपासून बालकांचं संरक्षण करण्याचं आवाहन करतानाच, कोरोना विषाणू सातत्यानं आपलं स्वरुप बदलत आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला सज्ज रहावं लागेल, असं पंतप्रधान म्हणाले. कोविड प्रतिबंधक लसीकरण महत्वाचं असून, लस घेणं ही आपली सामुहिक जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नुकसान भरपाईचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. काल रत्नागिरी इथं नुकसानीची पाहणी आणि आढावा घेतल्यानंतर, ठाकरे बोलत होते. या नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची आमची मागणी आहे. निकष बदलून कोकणवासीयांना दिलासा दिला जाईल आणि पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. अशी वादळं दरवर्षी येत असल्यानं, भूमिगत वीज वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारा यासारखी कामं कायमस्वरूपी होणं आवश्यक आहेत, त्यासाठी राज्यसरकार आवश्यक निधी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. चिपी विमानतळ सुरू करण्याबाबतचा निर्णय २५ मे रोजीच्या अहवालानंतर घेणार असल्यानं लवकरात लवकर विमानतळ सुरू करू असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

****

विधान परिषदेवरील नामनियुक्त सदस्यपदांसाठी राज्य मंत्रिमंडळानं १२ जणांच्या नावाची शिफारस केली असताना, राज्यपालांनी अद्याप निर्णय का घेतला नाही, अशी विचारणा, मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, राज्य सरकारला याबाबत दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच राज्यपालांच्या सचिवांनाही याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

****

महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यातल्या नक्षलवादाचं उच्चाटन करण्यासाठी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. गडचिरोली इथं काल सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी मारले गेले, त्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. एटापल्ली तालुक्यातल्या जंगलात काल सकाळी ही चकमक झाली. या चकमकीनंतर नक्षल्यांकडील बंदुका, पुस्तकं आणि दैनंदिन वापराचं साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठार झालेले नक्षली कसनसूर दलमचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बोलताना, गृहमंत्री वळसे पाटील यांनी, पोलिस आणि महसूल विभाग समन्वयानं काम करत असल्यानं दुर्गम भागाचा विकास होत आहे, दुर्गम भागात मोबाईल जोडणीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असं सांगितलं.

****

शिवभोजन थाळी मोफत देण्याच्या योजनेला येत्या १४ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा नि:शुल्क लाभ घेतला आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्र सुरु आहेत.

****

चिपको आंदोलनाचे प्रणेते, ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं काल उत्तराखंडात ऋषीकेश इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या ऋषीकेश इथल्या रुग्णालयात बहुगुणा यांच्यावर कोविड संसर्गासाठी उपचार सुरू होते.

गांधीविचारांचे अनुयायी असलेले बहुगुणा यांनी १९७४ साली उत्तरप्रदेशात वृक्षतोडी विरोधात पुकारलेल्या चिपको आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. भागीरथी नदीवरच्या टिहरी धरणाच्या विरोधात बहुगुणा यांनी १९९५ मध्ये प्रथम ४५ दिवसांचं आणि पुढच्या वर्षभरात ७४ दिवसांचं उपोषण केलं होतं. समाजातल्या वंचित घटकांसाठी त्यांनी काम केलं, अनुसूचित समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी टिहरी इथं ठक्कर बाप्पा वसतीगृह उभारलं. पर्वतीय नवजीवन मंडळ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धन चळवळ चालवली. बहुगुणा यांना १९८१ साली पद्मश्री तर २००९ साली पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

बहुगुणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या भोसी या सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावानं अनोखा मार्ग अवलंबला आहे. याबाबत अधिक माहिती देणारा हा विशेष वृत्तांत –

कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासारख्या साध्या उपायांच्या मदतीनं पुरेशा आरोग्य सुविधा नसलेली गावंही कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त होऊ शकतील असा विश्वास या गावाचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले,

“आपण योग्य प्रकारे जर त्याची उपाययोजना केली तर कोरोनातून आपण निश्चितच मुक्त होऊ शकतो. आणि आम्ही हे आमच्या गावामधे करून दाखवलेलं आहे. जर आपण आमच्या सारख्या उपाययोजना केल्या कोणाच्या संपर्कात कोणाला नाही येऊ दिलं, कारण संपर्कात आल्यानंतर वाढणारचे ते. गावामधे एकही पेशंट राहणार नाही अशी मला खात्री आहे.”

या उपाययोजनांचा अवलंब करून कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या भोसी गावातल्या लक्ष्मीबाई अक्केमवार आणि विशाल कल्याणकर यांनी या शब्दात प्रतिक्रिया दिली -

“आम्ही जाऊन शेतात राहिलो. १४ दिवस राहिलो. मग भोकरला जाऊन तपासलं. १४ दिवसाला. मग घरला जा म्हणले. मग ठणठण झालो आम्ही.” “गोळ्या औषधे वगैर टाईम टू टाईम घेतली नंतर असं करत करत चार पाच दिवस थोडा त्रास झाला, मग १८ दिवसानंतर रिकव्हर झालो आम्ही.”

कोविड मुक्तीसाठी भोसी गावानं अवलंबलेला मार्ग जिल्ह्यातल्या अन्य गावांमधे राबवण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, “भोसी गावाने लोक प्रतिनिधी, आरोग्य टीम, आणि ग्रामस्थ यांनी जर पुढाकार घेतला आणि तिथले प्रश्न सोडवले तर उत्तम असं, स्तुत्य असं उदाहरण आणि हा भोसी पॅटर्न आपल्या सगळयांसमोर आलेला आहे. नांदेड जिल्ह्यामधे जे पण हॉट स्पॉट आहेत, ते याच पद्धतीने याच पॅटर्नने आम्ही आता त्याला डील करणार आहोत.”

****

राज्यात काल २९ हजार ६४४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५५ लाख २७ हजार ९२ झाली आहे. काल ५५५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ८६ हजार ६१८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५७ शतांश टक्के झाला आहे. काल ४४ हजार ४९३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५० लाख ७० हजार ८०१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९१ पूर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ६७ हजार १२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल तीन हजार २०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०१ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २९, औरंगाबाद २३, बीड १३, जालना ११, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी आठ, नांदेड पाच, तर हिंगोली जिल्ह्यातल्या चार रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७२० रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ५३१, उस्मानाबाद ५१४, औरंगाबाद ४६२, परभणी ४०८, जालना ३८२, हिंगोली १००, तर नांदेड जिल्ह्यात ९१ नवे रुग्ण आढळून आले. 

****

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना काल त्यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्तानं देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, नांदेडसह मराठवाड्यात सर्वत्र राजीव गांधी यांना अभिवादन करून दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथही घेण्यात आली.

औरंगाबाद इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ काल घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात १ जून पर्यंतच्या टाळेबंदीदरम्यानची सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत देण्यात आलेली सूट आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज आणि उद्या कडकडीत टाळेबंदी असेल. या दोन दिवसांच्या कालावधीत किराणा दुकानं, भाजीपाला, फळविक्री यावरही बंदी आहे. वैद्यकीय सेवा, कृषी निविष्ठा तसंच सहाय्यभूत सेवा देणाऱ्या आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात, असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल जारी केलेल्या एका आदेशात म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातली सर्व किराणा दुकानं, भाजीपाला-फळ विक्री, दूध संकलन केंद्र आणि सर्व पेट्रोल पंप परवा सोमवारपासून एक जून पर्यंत सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. बार, रेस्टॉरंट तसंच हॉटेल यांना परवापासून घरपोच सेवा देण्यासही परवानगी देण्यात आली आहे

****

युवासेनाप्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने काल औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय-घाटीला अतिउच्च दर्जाचे १० व्हेंटिलेटर देण्यात आले. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, आमदार तथा शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे हे व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब उपजिल्हा रुग्णालयालाही शिवसेनेच्या वतीने दोन व्हेंटिलेटर देण्यात आले. खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे-पाटील, यावेळी उपस्थित होते.

****

नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान बेटांवर काल दाखल झाला. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि अंदमान सागरापर्यंतचा परिसर मोसमी पावसानं व्यापला आहे. २१ मे रोजी मोसमी पाऊस या भागात पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता, त्यामुळे आता ३१ मे रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार असल्याचं, हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

****

लातूर जिल्ह्यातील सर्व जलप्रकल्प आणि पुलांची तपासणी करून खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत. ते काल मान्सूनपूर्व तयारी बैठकीत बोलत होते. गाव ते जिल्हा मुख्यालय स्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

****

कोविड महामारी तसंच संचारबंदीच्या काळात ऑटोरिक्षा तसंच इतर प्रवासी वाहनांच्या कर्जाचे थकीत हफ्ते वसूल करण्यास तत्काळ मनाई करावी, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. याबाबत जलील यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना पत्र सादर केलं आहे. खाजगी बँका तसंच फायनान्स कंपन्यांचे वसुली अधिकारी गुंड प्रवृत्तीचे तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, ते सकाळी तसंच मध्यरात्रीच्या वेळी वसुली करण्यासाठी येऊन, धमकावत असल्याचं, खासदार जलील यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं टाळेबंदीच्या नियमाचा भंग करणाऱ्या ६४ दुकानदारांवर काल पोलीस आणि नगर परिषदेनं संयुक्त कारवाई केली. या दुकानदारांकडून ४० हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. परभणी शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना गेल्या ३ दिवसात एकूण ९२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

****

औरंगाबाद इथं काल टाळेबंदी नियमाचा भंग करणारी २४ दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत महापालिका तसंच पोलिस पथकानं ही दुकानं सील केली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथं रासायनिक खताची जादा दरानं विक्री करणाऱ्या ३ दुकानांचे परवाने काल निलंबित करण्यात आले. जिल्हास्तरीय भरारी पथकानं केलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली.

****

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बँकांमार्फत सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुरळीतपणे पीककर्ज वितरीत करावं, अशी मागणी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासह कॉंग्रेसच्या शिष्टमंडळानं केली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे काल याबाबत एक निवेदन सादर करण्यात आलं. १ जून ते ७ जून या एका आठवड्यात सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या थकबाकी संदर्भात विचार न करता प्रती एकर किमान १० हजार रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****

रासायनिक खतं, पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, महिला आघाडी प्रमुख कल्पना डोंगळीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

****

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या वेतनातून दोन दिवसांचा पगार घेण्याच्या निर्णयातून, औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयातले कोरोना योद्धे, अधिकारी आणि कर्मचारी यांना वगळावं, अशी मागणी आयटक महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे.

****

No comments: