Saturday, 22 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.05.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन योजना’ सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ऑक्सिजन उत्पादकांना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.

****

तौक्ते चक्रीवादळामुळे बार्ज पी ३०५ या जहाजावर मृत्यू झालेल्या तसंच बेपत्ता असलेल्यांच्या वारसांना, ओएनजीसी तर्फे दोन लाख रुपये तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षितरित्या वाचवण्यात आलेल्यांना, प्रत्येकी एक लाख रुपये तातडीची मदत जाहीर करण्यात आली. संबंधित कंपनीकडूनही मृतांच्या वारसांना उरलेल्या सेवा कालावधी इतकं, किंवा जास्तीत जास्त १० वर्षांचं वेतन दिलं जाणार आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ६० जणांचा मृत्यू झाला असून, १५ जण अजूनही बेपत्ता आहेत, तर १८८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

****

दरम्यान, चक्रीवादळाची पूर्वसूचना देण्यात आली असूनही कामगारांचा जीव धोक्यात घातला या कारणासाठी, पी ३०५ तराफ्याचे कॅप्टन राकेश बल्लव आणि अन्य काही जणांविरोधात काल मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तराफ्याच्या मुख्य अभियंत्याच्या तक्रारीवरुन हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

परभणी जिल्ह्यात एक जून पर्यंतच्या टाळेबंदीदरम्यानची सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत देण्यात आलेली सूट, आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज आणि उद्या कडकडीत टाळेबंदी असेल.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातली सर्व किराणा दुकानं, भाजीपाला-फळ विक्री, दूध संकलन केंद्र आणि सर्व पेट्रोल पंप, परवा सोमवारपासून एक जून पर्यंत, सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.

****

रासायनिक खतं, पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ, काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, महिला आघाडी प्रमुख कल्पना डोंगळीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

****

No comments: