Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
बालकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यास पालकांनी त्यांना घरीच कोणतीही
औषधी देऊ नयेत असा
सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोना
विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या
लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असण्याच्या पार्श्वभूमीवर, लहान मुलांकरता स्थापन केलेल्या कृती दलाशी त्यांनी
आज ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातले बाल रोग तज्ज्ञ या संवादात सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी
बालकांना या लाटेत कोरोना विषाणूची बाधा झाल्यास सर्वात प्रथम पालकांनी घाबरून जाऊ
नये असं आवाहन केलं. लहान मुलांवर उपचारादरम्यान, अनावश्यक औषधांचा
भडिमार करु नका असा सल्ला त्यांनी डॉक्टरांना दिला. या साथीबाबत बालरोग तज्ज्ञांनी पालकांना मार्गदर्शन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची सर्वतोपरी तयारी करण्यात
येत असून कोणत्याही संसाधनांचा तुटवडा जाणवू नये यासाठी काम सुरू असल्याचं
ते म्हणाले.
या विषाणूचा धोका अजून टळलेला नाही त्यामुळं सर्वांनीच काळजी घेण्याचं आणि नियमाचं पालन करण्याचंही आवाहन त्यांनी
केलं आहे. जून महिन्यापासून लसीची उपलब्धता वाढेल अशी अपेक्षा
व्यक्त करून राज्याच्या हितासाठी आपण टाळेबंदीचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले.
एकसाथ लस उपलब्ध झाल्यास संपूर्ण राज्याला लसीकरण करण्याची आपली तयारी असल्याचंही ठाकरे
यांनी सांगितलं.
****
सातारा जिल्ह्यात कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या
परिसरात आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी
भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र
केंद्रानं दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक
३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणतीही कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं
वृत्त नाही. गेल्या दोन महिन्यांमध्ये कोयना धरण परिसरात बसलेला हा भूकंपाचा तिसरा धक्का
आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही देवरूख परिसर आणि संगमेश्वर
तालुक्यात साडवली, कडवई परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. काही घरात भांडी
ठेवण्याचे रॅक हलल्यानं भांड्यांच्या आवाज झाला आणि नागरिकांना भूकंपाची जाणीव झाली,
असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराच्या वाढत्या रुग्णांचा तपशीलवार आढावा
घेतल्यानंतर अॅम्फोटिसीरिन-बी औषधाच्या २३ हजार ६८० अतिरिक्त मात्रा
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या असल्याचं केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौ़डा यांनी काल सांगितलं. देशात सध्या
म्युकरमायकोसिसचे एकूण ८ हजार ८४८ रूग्ण असून त्यानुसारच वाटप
केलं असल्याचं गौडा म्हणाले.
****
कोविड रुग्णांसाठी देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा
सुरळीत राखण्याच्या कामात रेल्वेचं योगदान लक्षणीय आहे. आतापर्यंत रेल्वेनं २२४ ऑक्सीजन
एक्सप्रेसमार्फत १३ विविध राज्यांना १४ हजार ५०० टनांपेक्षा जास्त ऑक्सीजन पुरवला आहे.
ऑक्सीजन एक्सप्रेस गाड्यांमार्फत दररोज सुमारे ८०० टन द्रवरुप ऑक्सीजनची वाहतूक केली
जाते, अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.
****
ऑलिपिंक विजेता पैलवान सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांनी माजी
राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी आज अटक केली. दिल्लीच्या एका
पोलिस ठाण्यात सुशील कुमारच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवालाची नोंद झाल्यानंतर गेल्या
पाच तारखेपासून तो फरार होता. चार मे रोजी दोन गटात वाद झाल्यानंतर सागरची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, दिल्लीच्या
एका न्यायालयानं सुशील कुमारवर असलेले गंभीर आरोप बघता त्यांचा जामीन फेटाळला होता.
****
जयपूर घराण्याचे जेष्ठ गायक आणि आकाशवाणी औरंगाबादचे माजी संगीत विभाग प्रमुख पंडीत यशवंत क्षीरसागर यांचं
काल रात्री औरंगाबादमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते.
त्यांनी औरंगाबाद, पुणे, आणि सांगली आकाशवाणी
केंद्रात काम केलं होतं. गायन बरोबरच संगीत विषयक
लिखाण आणि मराठवाडा परफॉर्मिंग आर्ट सेंटरच्या
माध्यमातून त्यांनी संगीत प्रचार-प्रसाराचं कार्य केलं. आकाशवाणीत रूजू होण्यापूर्वी ते सातारा जिल्ह्यात फलटण इथं शिक्षक होते. पंडीत
जसराज यांचाही त्यांना काही काळ सहवास आणि शिक्षण मिळालं होतं.
****
हिंगोली जिल्ह्यातले शिवसेनेचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते तथा
वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट प्रल्हादराव उमरेकर-वाबळे
यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उमरा वाबळे या त्यांच्या मूळ गावी
अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातल्या हळद लागवडीची लगबग सुरू झाली आहे. यासाठी शेतकरी
ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. जिल्ह्यात हळदीचं क्षेत्र अर्धापूर, मुदखेड, भोकर,
हदगाव, हिमायतनगर, नायगाव,
बिलोली या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७७ वा भाग असेल. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल
****
No comments:
Post a Comment