Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २३
मे
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा
आणि सुरक्षित रहा.
****
·
म्युकर मायकोसिस साथ प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या
केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना.
·
कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या परिवार आणि आश्रितांनाही
लस घेता येणार.
·
कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला
अडचण नाही - केंद्र सरकारचं स्पष्टीकरण.
·
राज्यात २६ हजार १३३ नवीन कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात
९७ जणांचा मृत्यू तर दोन हजार ८७६ बाधित.
·
प्रसिद्ध संगीतकार विजय पाटील उर्फ लक्ष्मण यांचं हृदयविकाराच्या
धक्क्यानं निधन.
आणि
·
आष्टीच्या कोविड केंद्रात कामचुकारपणा केल्याच्या आरोपावरुन
एका डॉक्टरसह सात जणांना कामावरुन काढलं.
****
काळी
बुरशी म्हणजेच, म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना,
प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी
याबाबत सर्व मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहिलं आहे. रुग्णालय संसर्ग नियंत्रण
समिती स्थापन करून संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी सूचना
राज्यांना करण्यात आली आहे. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार कडून सर्व
प्रकारचं साह्य मिळेल, असं आश्वासनही मंत्रालयानं दिलं आहे.
****
आयुषमान
भारत आणि अन्य आरोग्य विमा योजनांनध्ये म्युकर मायकोसिस या आजाराचा समावेश करावा अशी
विनंती कॉंग्रेसच्या अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
पत्राद्वारे केली आहे. या आजाराला साथ रोग घोषित केल्यामुळे यावरील उपचारासाठी आवश्यक
औषधींच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर भर दिला जावा असं गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.
****
कोवॅक्सिन
तसंच कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला काहीही अडचण येणार
नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी ही माहिती दिली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना
- डब्ल्यूएचओची मान्यता नसून, या लसी घेणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार
नसल्याचं, खोडसाळ वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं, जावडेकर यांनी या वृत्ताचं खंडन
केलं आहे.
दरम्यान,
काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी, कोरोना विषाणूच्या नव्या अवताराला इंडियन व्हेरियंट
म्हटल्याबद्दल जावडेकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. हा देशाचा अपमान असून, या प्रादुर्भावाविरोधातल्या
लढाईचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य
संघटनेनं कोरोनाच्या कोणत्याही रुपाला कोणत्याही देशाचं नाव दिलेलं नाही, असं जावडेकर
यांनी नमूद केलं आहे.
****
कामाच्या
ठिकाणी लसीकरणाची सुविधा तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या परिवारालाही
आणि आश्रितांना देखील दिली जाऊ शकते असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. या संदर्भात
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. औद्योगिक
आणि कामाच्या ठिकाणी लसीकरणासाठी लसीच्या मात्रा संबंधित कंपनी किंवा व्यवस्थापनाने
ज्या रुग्णालयांशी करार केला आहे, त्या रुग्णालयांनी खरेदी करावा, मात्र ४५ वर्षांपेक्षा
अधिक वयाच्या नागरिकांना मोफत लस दिली जाईल, असं या पत्रात म्हटलं आहे.
****
कोविड
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याची वैद्यकीय प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य
सरकारनं मिशन ऑक्सिजन स्वावलंबन योजना हाती घेतली आहे. या योजनेतंर्गत ऑक्सिजन निर्माण
करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई
यांनी सांगितलं. हा निर्णय जाहीर केल्यानंतर आमच्याकडे बऱ्याचशा उद्योजकांनी संपर्क
साधला असून, महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास त्यांनी विशेष स्वारस्य दाखवलं असल्याचं
देसाई यांनी सांगितलं.
****
राज्यात
काल २६ हजार १३३ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची
एकूण संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ झाली आहे. काल ६८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ८७ हजार ३०० झाली असून,
मृत्यूदर एक पूर्णांक ५७ शतांश टक्के झाला आहे. काल ४४ हजार ४९३ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
तीन लाख ५२ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल दोन हजार ८७६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९७ जणांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २६, औरंगाबाद २४, बीड १४, उस्मानाबाद
११, परभणी आठ, नांदेड सात, हिंगोली ०४, तर जालना जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा समावेश
आहे.
बीड
जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७७९ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ५७७,
औरंगाबाद ४२९, जालना ३४२, लातूर २९९, परभणी २२०, नांदेड १६९, तर हिंगोली जिल्ह्यात
६१ नवे रुग्ण आढळून आले.
****
पदोन्नती
मधील आरक्षण देणं हे राज्याच्या अधिकारात असून, हे आरक्षण रद्द करणारा ७ मे रोजीचा
शासन आदेश रद्द करावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक
जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ही मागणी
मान्य न झाल्यास, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांना सोबत घेऊन १५ जूनला राज्यव्यापी
आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
राज्यात
२०२१-२२ मधील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम
करण्यात आली नाही, असं शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलं आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबत
सविस्तर दिशानिर्देश शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळवण्यात येतील, असं शिक्षण उपसंचालक
द गो जगताप यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी
आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये, विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होईल
अशा सूचना दिल्या जाऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या
प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आज एक उच्चस्तरीय बैठक
आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, यांच्या उपस्थितीत
होणाऱ्या या बैठकीत सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण
सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि लाभधारक सहभागी होणार आहेत.
****
राष्ट्रीय
इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण - एनईएफटी सेवा आज दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध राहणार
नाही, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं कळवलं आहे. काही तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ही
सेवा काल रात्रीपासून १४ तासांसाठी सर्व सदस्य बँकासाठी बंद ठेवण्यात आल्याचं रिझर्व्ह
बँकेनं सांगितलं आहे. मात्र या काळात आरटीजीएस सेवा सुरू राहील असंही बँकेन कळवलं आहे.
****
प्रसिद्ध
संगीतकार विजय पाटील उर्फ लक्ष्मण यांचं काल नागपूर इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. आपले सहकारी सुरेंद्र
हेंद्रे उर्फ राम यांच्या साथीनं विजय पाटील यांनी १९७०च्या दशकात संगीत दिग्दर्शन
सुरू केलं, ‘पांडू हवालदार’ या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ झाला.
प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक दादा कोंडके यांनी या संगीतकार जोडीचं राम लक्ष्मण असं
नामकरण केलं, त्यानंतर अवघ्या काही काळातच राम यांचं निधन झालं, मात्र विजय पाटील यांनी
'राम लक्ष्मण' याच नावानं जवळपास ७५ हिंदी, मराठी तसंच भोजपुरी चित्रपटांना संगीत दिलं.
'तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ आदी
मराठी चित्रपटांसोबतच, एजंट विनोद, हम से बढकर कौन, आगे की सोच, मैंने प्यार किया,
पत्थर के फूल, हंड्रेड डेज, हम आपके है कौन, हम साथ साथ है आदी हिंदी चित्रपटांना त्यांनी
दिलेलं संगीत जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालं. मैंने प्यार किया चित्रपटाच्या संगीतासाठी
त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी
राज्य शासनाचा २०१८ सालचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं
होतं.
सांस्कृतिक
कार्यमंत्री अमित देशमुख यांनी लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राम-मक्ष्मण
युगाचा आज अस्त झाला, मात्र त्यांच्या संगीतातून ते कायम रसिकांच्या स्मरणात राहतील
असं देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कोरोना
विषाणूची तिसरी लाट जुलै मध्ये येण्याची शक्यता व्यक्त होत असून या लाटेत बालकांना
सर्वाधिक धोका असण्याचंही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेनं
कोरोना विषाणूग्रस्त बालकांच्या तातडीच्या उपचारासाठी विविध रूग्णालयात ७३६ खाटांची
व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी ही माहिती
दिली. या रूग्णालयात ४५ व्हेंटिलेटर आणि ४३७ ऑक्सिजनच्या खाटा असणार आहेत. यासोबतच
एमजीएम आणि मेल्ट्रॉन इथल्या बाल कोविड केंद्रात महापलिकेचे डॉक्टर कार्यरत राहणार
असल्याचंही पाडळकर यांनी सांगितलं.
****
कोविड
उपचारादरम्यान म्यूकर मायकोसिस या आजाराचा संसर्ग झालेले आणि सध्या औरंगाबाद इथं एमजीएम
रुग्णालयात उपचार घेत असलेले डॉक्टर राहुल पवार यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची
तयारी एमजीएम रुग्णालयाने घेतली आहे. लातूर इथं खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप
करणारे डॉ. राहुल पवार यांना कोविड आणि त्यानंतर म्यूकर मायकोसिसची लागण झाली, आर्थिक
स्थिती बेताची असल्यानं, सामाजिक माध्यमातून त्यांना मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पवार यांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे
निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले होते.
****
परभणी
इथं जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतल्या कोविड केंद्रात काल प्राणवायू प्रकल्पातला
एक पाईप अचानक फुटल्यानं, काही काळ गोंधळ उडाला, मात्र तज्ज्ञांसह कर्मचाऱ्यांनी तत्काळ
पर्यायी यंत्रणा कार्यान्वीत केल्यानं, कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
****
राज्यातील
आदर्श गाव असलेल्या हिवरेबाजारनं पुन्हा एकदा सामुदायिक प्रयत्नातून ‘गाव कसे कोरोना
मुक्त’ होऊ शकते. हे दाखवून दिलं आहे. या महिन्याभरामध्ये गावात एकही कोरोना बाधित
रुग्ण आढळला नसून गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं संपूर्ण गाव कोरोना मुक्त झाल्याचं
सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले –
दोन
एप्रिल ते दहा एप्रिलपर्यंत एकदम संख्या ३२ वरती गेली. मग आम्ही तातडीनं या लोकांना
विलगीकरण कक्ष तयार केला आणि त्यामधे ठेवलं. आणि रिपोर्ट जेव्हा आला, त्यानंतर लक्षात
आलं की ते पण पॉझिटीव्ह आहेत. मी त्यासाठी तातडीचे योग्य ते रक्त सँपल तपासणी आणि आरोग्याच्या
दृष्टीने चांगली उपाययोजना केली. आणि उत्तम चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाल्यामुळे
नव्याने एकही बाधीत रुग्ण आला नाही. त्याला एकच कारण की आम्ही लोकांना घरातून विलगीकरण
कक्षात नेलं. आणि तिथेच दररोजच्या तपासणीतून औषधोपचार केला. आणि त्याचा परिणाम आज हिवरे
बाजार आज शुन्यावर आला.
****
परभणी
जिल्ह्यात टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरुध्द महापालिका आणि
पोलिस प्रशासनानं कारवाई केली. आठ दुकानदारांकडून ५५ हजार रुपये दंड तर विनामास्क फिरणाऱ्या
७२ जणांकडून १४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
औरंगाबाद
शहरात टाळेबंदी नियमांचा भंग केल्याबद्दल सील करण्यात आलेल्या दुकानांचं सील काढण्यात
यावं, अशी विनंती औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे
केली आहे. व्यापाऱ्यांनी टाळेबंदीत दुकानं सुरु ठेवण्याच्या चुकीबद्दल त्यांच्यांकडून
दंडात्मक रक्कम वसूल करावी तसंच त्यांना समज देऊन सील काढावेत अशी विनंती संघानं केली
आहे.
****
बीड
जिल्ह्यात आष्टी इथल्या कोविड केंद्रात कामचुकारपणा केल्याच्या आरोपावरुन जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी एका डॉक्टरसह सात जणांना कामावरुन कमी केलं आहे. या
केंद्रातल्या सुविधा आणि उपचारांबाबत रोज तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पवार
यांनी काल सकाळी अचानक या केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांना अस्वच्छता आणि रूग्णांच्या
उपचारांकडे दुर्लक्ष होत असल्याच आढळून आलं. पवार यांनी तत्काळ एका डॉक्टरसह दोन परिचारिका,
आणि चार वॉर्डबॉयवर कार्यमुक्तीची कारवाई केली.
****
औरंगाबाद
इथल्या खाम नदी परिसरात एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या
नदी पुनरुज्जीवनाची पाण्डेय यांनी काल पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. नदी विकास
कामाला गती आली असून बाजूच्या नाल्यावर जाळ्या बसवण्यात येणार आहेत, बंधाऱ्याची उंची
वाढवली जाणार आहे, असं पाण्डेय यांनी सांगितलं. विविध कामे वेळेत पूर्ण करण्याच्या
सूचना पाण्डेय यांनी केल्या.
****
नांदेड
जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात दिघी इथं पैनगंगा नदीतून काढलेल्या रेती साठ्यावर
तहसील प्रशासनानं काल कारवाई करून रेतीचे साठे जप्त केले, शिवसेनेचे कार्यकर्ते राम
गुंडेकर यांनी अवैध वाळू तस्करी विरूद्ध तक्रार केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात
आली.
दरम्यान,
बिलोली तालुक्यातील कार्ला बुद्रुक परिसरातून मांजरा नदीतील अवैध वाळू उपसा आणि गौण
खनिज तस्करी विरूद्ध, ग्राम पंचायत सदस्य आणि गावातले नागरी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारी मालमत्तेची चोरी होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन नागरिकांनी वाळूची वाहतूक
करणारी वाहनं काल अडवून धरत, तस्करांवर कारवाईची मागणी केली.
****
महाराष्ट्र
विधान परिषद बरखास्त करावी, अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष
तथा प्रवक्ते विधीज्ञ रेवण भोसले यांनी केली आहे. याबाबत विधानसभेत एक ठराव घेऊन राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्याची मागणी भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. देशातल्या काही राज्यांनी आपल्या विधान परिषदा
रद्द करून त्यावरील खर्च वाचवला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेचाही खर्च
वाचवावा, हा निधी जनतेच्या कोणत्याही कामासाठी वापरावा, राज्यातल्या विद्यार्थ्यांना
स्पर्धा परीक्षांची पुस्तकं मोफत द्यावी, शेतकऱ्यांना - कामगारांना मदत करावी, अशी
मागणी भोसले यांनी केली आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७७ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
No comments:
Post a Comment