Sunday, 23 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.05.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात आतापर्यंत १९ कोटी लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यातले एक कोटी लाभार्थी १८ ते ४४ वर्ष वयोगटातले आहेत. दरम्यान,काल १५ लाख ५२ हजाराहून अधिक लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली.

****

देशात काल सकाळी संपलेल्या २४ तासांत कोविड-19 च्या २ लाख ५७ हजार,२९९ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर तीन लाख, ५७ हजार, ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७.७६ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशात या आजाराचे २९ लाख, २३ हजार, ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, या चोवीस तासात ४ हजार, १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

हिंसाचार आणि छळ याला बळी पडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी ‘एक थांबा योजना’ या नावानं योजना राबवली जात असून त्याचा लाभ आतापर्यंत सुमारे तीन लाख महिलांना झाला आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं २०१५ मध्ये ही योजना सुरू केली. देशात राज्य सरकारांच्या सहाय्यानं अशी ७०१ मदत केंद्रं उभारण्यात आली असून ती समन्वयानं काम करतात. कोविड काळात कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडणाऱ्या अथवा संकटात असणाऱ्या महिलेनं अशा मदत केंद्राशी संपर्क साधावा, असं मंत्रालयानं जाहीर केलं आहे.

****

पंढरपूर इथल्या श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आजच्या भागवत एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात आकर्षक नयनरम्य अशी मोगऱ्याच्या फुलाची आरास करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

गेल्या सोमवारी चक्रीवादळामुळं मुंबईतल्या समुद्रात बुडालेल्या मालवाहक बार्ज पी-305 मधल्या आणखी ४३ कर्मचाऱ्यांचे शव आज मिळाले. आतापर्यंत ६१ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून आणखी १८ जणाचा शोध घेणं सुरू आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आज एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि लाभधारक सहभागी होणार आहेत.

****

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण- एनईएफटी सेवा आज दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध राहणार नाही, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं कळवलं आहे. काही तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ही सेवा काल रात्रीपासून १४ तासांसाठी सर्व सदस्य बँकासाठी बंद ठेवण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. मात्र या काळात आरटीजीएस सेवा सुरू राहील असंही बँकेन कळवलं आहे.

****

No comments: