आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ मे २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
बंगालच्या उपसागरामध्ये
निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना ‘यास’चक्रीवादळाचा
धोका निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर
सज्जतेचा आढावा घेतला. वादळाचा धोका असलेल्या भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या
४६ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सेना दलांसह विविध मंत्रालयंही सतर्क झाली आहेत.
****
कोविड बाधित
रुग्णांवर ऍलोपॅथिक उपचारांबाबत योग गुरु रामदेवबाबांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नाराजी व्यक्त केल्यावर, रामदेवबाबांनी
दिलगिरी व्यक्त केली आहे. कोविड बाधित रुग्णांवर ऍलोपॅथिक औषधांवर रामदेवबाबांनी टिका
केली होती.
****
देशभरात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या १९ कोटी ५० लाख मात्रा देण्यात आल्या
आहेत. १८ ते ४४ वयोगटातल्या एक कोटी नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असल्याचं
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. काल दिवसभरात १६ लाख मात्रा देण्यात आल्या, यात १८ ते
४४ वयोगटातल्या सहा लाख ८२ हजार नागरिकांचा समावेश आहे.
****
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांना श्रद्धांजली
वाहण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल ऑनलाईन सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली.
यात देशातील सर्वपक्षीय खासदार, मंत्री आणि नेत्यांनी सातव यांच्या आठवणींना उजाळा
देत श्रद्धांजली अर्पण केली.
****
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातल्या हळद लागवडीची लगबग सुरू
झाली आहे. यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. जिल्ह्यात
हळदीचं क्षेत्र अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव, हिमायतनगर, नायगाव, बिलोली या
तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.
****
परभणी महापालिका क्षेत्रातल्या लसीकरण केंद्रांवर, ४५ वर्षांवरील नागरिकांसह आघाडीवरील
कोरोना योद्धे - आरोग्य कर्मचारी यांना, आज कोविशिल्ड लसची पहिला मात्रा, आणि याआधी
पहिला मात्रा घेतल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना कोविशिल्डची दुसरी मात्रा देण्यात
येणार आहे.
****
परभणी शहरात संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या २२० नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी
करण्यात आली. महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्या सुचनेवरुन ही मोहीम सुरु करण्यात
आली आहे.
****
No comments:
Post a Comment