Saturday, 12 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – जून २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या जी-७ शिखर परिषदेच्या उपक्रमात ऑनलाईन माध्यमातून सहभागी होणार आहेत. भारतासह, ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना पाहुणे देश म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. या परिषदेची संकल्पना बिल्ड बॅक बेटर म्हणजेच उत्तम पद्धतीनं पुन्हा उभारणी अशी आहे. या परिषदेत, सर्व जागतिक नेते, कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीपासून जगाला मुक्त करण्याच्या विषयावर आपले विचार मांडणार आहेत, यात आरोग्य आणि हवामान बदल या मुद्द्यांवर विशेष भर असेल. या आधी २०१९ साली बिअरीत्स इथं झालेल्या जी-७ परिषदेत, सदिच्छा भागीदार म्हणून पंतप्रधान हवामान, ‘जैव-विविधता आणि महासागर तसंच डिजिटल परिवर्तन अशा दोन सत्रांमध्ये सहभागी झाले होते.

****

मुंबईत आज सकाळपासून विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या जोरदार पावसानं उपनगरातील काही भागात पाणी साचलं आहे. दुपारी १२ वाजेनंतर पाऊल थांबला आहे. आज समुद्राला भरती येणार असून लाटा उसळण्याची शक्यता आहे.

रम्यान, मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी पुढील २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं  वर्तवली आहे. तसंच या ठिकाणी उद्या आणि परवा या दोन दिवसांच्या कालावधीअतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे आणि लगतच्या परिसरात न जाण्याचं आवाहन नागरिकांना बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाद्वारे करण्यात आलं आहे.

****

नांदेड शहरास पाणी पुरवठा करणारा डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज सकाळी ९५ टक्के क्षमतेनं भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल पक्षाध्यक्ष पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी आज हे स्पष्टीकरण दिले. प्रशांत किशोर यांनी देशातल्या राजकीय परिस्थितीची पवार यांना माहिती दिल्याचं मलिक यांनी सांगितलं.

****

देशात गेल्या २४ तासांत १ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण कोविड संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत २ कोटी ७९ लाखांहून अधिक रुग्ण या आजारातून मुक्त झाले असून देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या २४ तासांत ८४ हजार ३३२ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली तर उपचारादरम्यान ४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोविडमुळे ३ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १० लाख ८० हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ३७ कोटी ६२ लाख नागरिकांची कोविड तपासणी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.

****

देशात गेल्या २४ तासांत ३४ लाख ३३ हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत २८ लाख ४८ हजार नागरिकांना लसीची पहली मात्रा तर ३ लाखांहून अधिक नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या २४ कोटी ९६ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यात देशातील २८ राज्य आणि ९ केंद्र शासित प्रदेश यांमध्ये १८ ते ४४ वर्ष वयोगटातील तीन कोटी ७९ लाखांहून अधिक व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलं आहे. 

****

आज जागतिक बाल कामगार विरोध दिवस आहे. तत्पर कारवाई करत बाल कामगार नष्ट करु या असं या वर्षीचं घोषवाक्य आहे. देशात बाल कामगारांची संख्या १६ कोटी झाली असल्याचं युनिसेफ आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. २००२ या वर्षापासून १२ जून हा दिवस बाल कामगार विरोध दिवस म्हणून साजरा केला जात असून यानिमित्तानं बाल कामगारांची परिस्थिती आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होणार आहे.

****

राज्यात कोविड रुग्णसंख्येत घट झाल्याने ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १२ जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, अहमदनगर, जळगाव, वाशिमसह इतर १३ जिल्ह्यांत येत्या सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार असून जनजीवन सुरळीत सुरू होईल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...