Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
देशात
सुरू असलेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेनं २७ कोटींचा टप्पा पार केला
आहे. देशात आतापर्यंत लसीच्या २७ कोटी २३ लाख ८८ हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
आहेत. लसीकरण मोहिमेच्या कालच्या १५४ व्या दिवशी सुमारे ३३ लाख जणांचं लसीकरण करण्यात
आलं.
****
महाराष्ट्र
आणि कर्नाटक दोन्ही राज्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासंसदर्भात कर्नाटकचे
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात आज
बंगळूरु इथं बैठक झाली. महाराष्ट्रातल्या कृष्णा आणि भीमा खोऱ्यातून सोडण्यात येणाऱ्या
पाण्याच्या विसर्गाबाबत या बैठकीत चर्चा झाली. दोन्ही राज्यांचे धरण व्यवस्थापन, पाण्याची
साठवणूक, धरणातील पाण्याचा विसर्ग याबाबत माहितीचे आदानप्रदान करण्याबाबत आढावा घेण्यात
आला. दोन्ही राज्यांनी पाण्याची साठवणूक आणि विसर्ग करताना एकमेकांना विश्वासात घेण्याचं
यावेळी निश्चित करण्यात आलं.
****
सर्व
विभागातल्या परिचारिकांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत संपावर
जाण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं दिला आहे. संघटनेनं आपल्या मागण्यांचं
निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दिलं आहे. बेमुदत संपाआधी २१ आणि २२ जून
रोजी दोन तास काम बंद आंदोलन केलं जाईल. २३ आणि २४ जून रोजी पूर्णवेळ परिचारिका संप
पुकारतील. त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बेमुदत संपाचा इशारा देऊन, रुग्णसेवेवर
परिणाम झाल्यास त्यास शासन आणि प्रशासन जबाबदार असेल, असं संघटनेनं म्हटलं आहे. सेवा
ज्येष्ठतेनुसार पदोन्नती, नर्सिंग भत्ता, साप्ताहिक सुट्टी या आणि अन्य काही मागण्या
परिचारिका संघटनेनं केल्या आहेत.
****
राज्यातल्या
आशा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात सरकारला
जाब विचारणार असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल
पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. ज्या आशा कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन गेली दीड
वर्षे कोरोनाच्या साथीत काम केलं त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांनी गाडीत बसून
ऐकून तरी घ्यायला हव्या होत्या, असं ते म्हणाले.
****
कोविड
रुग्णांची फसवणूक करून फरार झालेल्या सांगली इथल्या डॉ. महेश पाटील यास पोलिसांनी अटक
केली. न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर पाटील हा पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला
होता. तज्ज्ञ डॉक्टर्स आणि यंत्रसामुग्री उपलब्ध नसताना डॉक्टर पाटील यांनी कोविड रुग्णालय
सुरु केलं होतं. महानगरपालिकेने दोनदा नोटीस बजावल्यानंतरही रुग्णालय सुरुच ठेवण्यात
आलं होतं. या रुग्णालयात सुमारे ८७ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, महापालिकेने
डॉ.महेश पाटील याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
****
अल्पसंख्यांक
समुदायाचा विकास करण्यासाठी पंतप्रधानांच्या नवीन १५ कलमी कार्यक्रमाची संबंधित अधिकाऱ्यांनी
प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले
आहेत. संबधित विभागांना नवीन १५ कलमी कार्यक्रमाची माहिती होण्याकरता काल घेण्यात आलेल्या
कार्यशाळेत ते बोलत होते. अल्पसंख्यांक समुदायाला विकासाच्या प्रवाहात आणल्यास त्यांच्यात
शांतता आणि स्थैर्य येईल, असं ते यावेळी म्हणाले.
****
परभणी
महानगरपालिकेच्या हद्दीत विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना परवाना घेण्याचा आदेश
प्रशासनाने तात्काळ रद्द करावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार
असल्याचं, शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर यांनी म्हटलं आहे. महानगरपालिकेच्या
हद्दीत विविध व्यवसाय करणारे छोटे-मोठे सर्व व्यापारी अस्थापना धारकांनी मनपाकडून व्यवसाय
परवाना काढणं बंधनकारक करण्यात आलं असून, त्याला व्यावसायिकांनी विरोध केला आहे.
****
मुस्लिम
समाजाला शैक्षणिक आणि शासकीय नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी परभणी
इथल्या मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने केली आहे. समितीनं आपल्या मागण्यांचं निवेदन
काल प्रशासनाला सादर केलं. मुस्लिम समुदायातलं शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधलं मागासलेपण
दूर करण्यासाठी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात यावं, जिल्हा पातळीवर मुस्लिम
विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनातून
करण्यात आल्या आहेत.
****
लातूर
महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या तसंच तिसऱ्या सोमवारी ई -लोकशाही दिनाचं
आयोजन केलं जात आहे. येत्या सोमवारी सकाळी ११ ते १ या कालावधीत महापालिकेच्या वतीने
देण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना यात सहभागी होता येणार असल्याचं, मनपा
आयुक्त अमन मित्तल यांनी सांगितलं.
****
परभणी
शहर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी
कुलसचिव रणजित पाटील यांनी काल पदभार स्वीकारला.
****
No comments:
Post a Comment