Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जुलै २०२१ दुपारी १.०० वा.
****
पेगॅसस प्रकरणावरुन
विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं.
राज्यसभेत
कामकाज सुरु होताच विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. सभापती एम व्यंकय्या
नायडू यांनी, तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांना सभागृहाच्या कामकाजात अडथळा
आणल्याप्रकरणी उर्वरित पावसाळी अधिवेशन काळापर्यंत निलंबित केलं. टीएमसीच्या इतर सदस्यांनी
या निलंबनाचा तीव्र निषेध करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. गोंधळ सुरुच राहील्यानं
कामकाज पुन्हा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आलं.
लोकसभेतही
कामकाज सुरु होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कामकाज आधी १२
वाजेपर्यंत आणि नंतर संपूर्ण दिवसासाठी स्थगित करण्यात आलं.
****
कोकणात रत्नागिरी
आणि सिंधदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आंबोली घाटात दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर आल्यानं घाटमार्ग
बंद झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गवर सुद्धा कुडाळ, कणकवली जवळ पुराचं पाणी आल्यानं
वाहतूक थांबवण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात
साखर सुतारवाडी इथं दरड कोसळून चार लोकांचा मृत्यू झाला असून, पाच लोक ढिगाऱ्याखाली
अडकली आहेत. महाड इथल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी
निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली.
राज्यात
अनेक भागात निर्माण झालेली पूर परिस्थिती पाहता बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण
दल - एनडीआरएफची १४ पथकं तैनात करण्यात आली आहेत. यापैकी चार पथकं चिपळूण, तर तीन पथकं
महाड इथं बचाव कार्य करत आहेत.
****
भारतानं
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ४२ कोटींचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ४८ लाख
८६ हजार लोकांना लस देण्यात आली.
दरम्यान,
देशात काल नव्या ३५ हजार ३४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४८३ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी १२ लाख ९३
हजार ६२ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख १९ हजार ४७० रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. काल ३८ हजार ७४० रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी चार लाख ६८ हजार ७९
रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख पाच हजार ५१३ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
औरंगाबाद
- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या
चार तरुणांचा मृत्यू झाला. मालेगाव इथले सतरा जण टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपतीकडे जात
असताना, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरखेडा गावाजवळ गाडीचं चाक बदलताना, मागून भरधाव
वेगानं येणाऱ्या आयशर गाडी ने उभ्या असलेल्या युवकांना उडवलं. काल रात्री हा अपघात
झाला. जखमींना उस्मानाबाद इथल्या खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
जलजीवन मिशन
अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबवण्यात येत आहे. या
अभियानातंर्गत जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणी द्वारे
पाणीपुरवठा करण्यासाठी येत्या सात ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवणार असल्याची माहिती जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी दिली आहे.
****
कोरोना साथीमुळे
वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज जपानच्या टोकियो
शहरामध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता हा सोहळा सुरू
होईल. सोहळ्यात होणाऱ्या संचलनात भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि मुष्टियोद्धा
मेरी कोम हे भारतीय पथकाचं नेतृत्व करतील. आकाशवाणी, दूरदर्शन आणि डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर
या स्पर्धेचं विशेष वार्तांकन करण्यात येणार आहे. डीडी स्पोर्ट्सवर रोज पहाटे पाच ते
संध्याकाळी सात या वेळेत विविध स्पर्धांचं थेट प्रसारण होणार आहे.
दरम्यान,
ऑलिम्पिक मधल्या काही स्पर्धा आज पहाटेपासून सुरु झाल्या. तिरंदाजीमध्ये वैयक्तिक प्रकारात
भारताची दीपिका कुमारी नवव्या स्थानावर राहिली.
****
टोकियो ऑलिम्पिक
मध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चिअरअप इंडीया या मोहिमेंतर्गत आज सकाळी
औरंगाबाद इथल्या मोंढा नाका हून सायकल रॅली काढण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं
औरंगाबाद विभागीय कार्यालय आणि औरंगाबाद इथल्या सायकलीस्ट संस्थेच्या वतीने काढण्यात
आलेल्या या रॅलीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. शहरातल्या
विविध भागात सुमारे २० किमी या रॅलीनं मार्गक्रमण केलं.
****
भारत आणि
श्रीलंकेदरम्यानचा एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज कोलंबो इथं
खेळला जाणार आहे. दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारतानं दोन - शून्य
अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment