Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 November 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
आज संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे. भाषिक स्वातंत्र्य आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी या महाराष्ट्र
सुपुत्रांनी प्राणपणानं दिलेला लढा अभूतपूर्वच राहिला आहे.
हा लढा अजूनही संपलेला नाही. जग आणि पुढच्या पिढीपर्यंत या सीमा लढ्याच्या
संघर्षाची धग पोहचविणं, तिची धार कायम ठेवणं हेच या वीर महाराष्ट्रपुत्रांना खरे अभिवादन आहे. त्यासाठी मराठीची
वज्रमूठ करू या, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्र
आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी पवार यांनी
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण केलं. संयुक्त
महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी
इतिहास असून सीमा भागातील मराठी भाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण
स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल, असं पवार यांनी
म्हटलं आहे.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संस्थेच्यावतीनं
दिल्या जाणारा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार हिंगोली जिल्ह्यातले
सामाजिक कार्यकर्ते जयाजी पाईकराव यांना आज समारंभपूर्वक प्रदान
करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ आणि २१ हजार रुपये रोख
असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
तत्पूर्वी
स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांना त्यांच्या
स्मृती दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या
वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष डॉक्टर एस. बी. वराडे,
कृषिभूषण विजय अण्णा बोराडे, सामाजिक
कार्यकर्ते पाईकराव यांनी भाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं.
***
देशात गेल्या २४ तासांत कोविडचे १० हजार ४८८ नवीन रुग्ण आढळले, तर काल ३१३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर १२ हजार ३२९ रुग्ण बर होऊन घरी गेले. देशात
आता एकूण १ लाख २२ हजार ७१४ सक्रिय
रुग्ण आहेत. सध्या या आजारातून बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक
२९ शतांश टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी
३९ लाख २२ हजार ३७ लोक कोविडमुक्त
झाले आहेत, त्याच वेळी,
४ लाख ६५ हजार ६६२
लोकांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४५ लाख १० हजार ४१३ रुग्ण
आढळले आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
देशात
सरकार राबवत असलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत
आतापर्यंत ११६ कोटी ५० लाख ५५ हजार
२१० लसी देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ६७
लाख २५ हजार ९७० डोस देण्यात आले.
***
पैठणच्या
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी
हंगामाच्या सिंचनाकरीता आज सकाळी दहा वाजता पाणी सोडण्यात आलं आहे. धरणापासून परभणी जिल्ह्यात १२२ किलोमीटरपर्यंत हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. या डाव्या कालव्याखाली
एक लाख ४१ हजार ६४० हेक्टर सिंचन क्षेत्र आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या
शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. हैदराबादमध्ये
वार्ताहरांशी बोलतांना राव यांनी ही माहिती दिली. तेलंगणा सरकारनं यासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं
ते म्हणाले. केंद्र सरकारनं या आंदोलनातील पीडित शेतकऱ्यांच्या
कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, शेतकरी
आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना केंद्र सरकारनं मदत करावी, अशी मागणी होत असेल तर ती योग्यच असून,
शेतकऱ्यांना पंतप्रधान सहायता निधीतून मदत करावी अशी मागणी शिवसेना
नेते संजय राऊत यांनी केली आहे. ते आज सकाळी मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
****
जळगाव तसंच धुळे - नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बॅकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी १५ मतदान
केंद्रावर मतदान सुरू आहे. तर धुळे -
नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रीया शांततेत
सुरु आहे.
त्रिपुरा इथंल्या घडलेल्या घटनेचे पडसाद अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात
उमटल्यानंतर अकोला शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून
अकोला शहरासाठी दिवसा जमावबंदी तर रात्रीच्या संचारबंदीत २३ नोव्हेंबरपर्यंत वाढ
करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेपासून ते २३ नोव्हेंबर सकाळी
सहा वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे.
****
भारत आणि न्यझिलंड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
तिसरा आणि अंतिम सामना आज कोलकत्ता इथं खेळला जाणार आहे.
****
या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र
आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या युट्युब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.
No comments:
Post a Comment