Sunday, 21 November 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 November 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 November 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** INS विशाखापट्टणम ही क्षेपणास्त्ररोधी विनाशिका भारतीय नौदलाच्या सेवेत प्रत्यक्ष दाखल  

** महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त - आमदार हरिभाऊ बागडे यांची टीका

** औरंगाबाद परिमंडळातल्या साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे एक हजार आठशे अठरा कोटी रुपये माफ

आणि

** भारत - न्यूझीलंड दरम्यान टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज तिसरा सामना

****

भविष्यात भारत फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही जहाजांची निर्मिती करू लागेल असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. INS विशाखापट्टणम ही क्षेपणास्त्ररोधी विनाशिका आज भारतीय नौदलाच्या सेवेत प्रत्यक्ष दाखल झाली, त्यानिमित्त मुंबईत झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते.

INS विशाखापट्टणम ही विनाशिका १६३ मीटर लांबीची असून, आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असल्यानं, जगातली आधुनिक क्षेपणास्त्ररोधी विनाशिकांपैकी एक ठरली असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या विनाशिकेची संरचनात्मक संकल्पना पूर्णतः भारतीय आहे, तर विनाशिकेसाठीची ७५ टक्के यंत्रसामग्री भारतीय बनावटीची आहे.

गेल्या काही काळात भारतीय नौदलात दाखल झालेल्या ४१ पैकी ३९ जहाजं आणि पाणबुड्यांची निर्मीती भारतातल्याच जहाज निर्मिती व्यवस्थापनांमध्ये झालेली आहे, यातून नौदलाची आत्मनिर्भर भारतासाठीची वचनबद्धता दिसून येते असं मत राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

कोविन या डिजिटल मंचावर एक नवीन सुविधा देण्यात आली असून याद्वारे आपण आपल्या लसीकरणाविषयी माहिती जाणून घेऊ शकता. या अॅपद्वारे पर्यटन कंपन्यांना ग्राहकांच्या लसीकरणाची स्थिती माहीत होऊ शकते तसंच या सुविधेमुळे इतर अनेक संस्था आणि कार्यालयं सुरु करण्यात सुलभता येऊ शकणार आहे, अस केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज याबाबतचं पत्र जारी केलं.

****

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आघाडी सरकारला प्रत्यक्षात आणता आली नसल्याचं सांगत, महाआघाडी सरकारनं पीक विमा काढणाऱ्या कंपन्यांसाठी फायदेशीर अटी तयार केल्यानं राज्यातल्या तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा काढलाच नाही, असंही बागडे यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात बंद पाळणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेतृत्वाला राज्यात संकटग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी वेळ काढता आला नाही अशी टीकाही बागडे यांनी केली.

****

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा लाख रुपयांची मदत आज जाहीर केली. ढुमणे यांच्या पतींना वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. ताडोबा-अंधारी प्रकल्पात व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक स्वाती कर्तव्यावर असताना, वाघानं त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता.

****

कृषिपंपाच्या वीजबिलातल्या थकबाकीत सुमारे सहासष्ट टक्के सूट मिळवण्याची संधी राज्य शासनानं महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. यात औरंगाबाद परिमंडळातल्या साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधले एक हजार आठशे अठरा कोटी बेचाळीस लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल आणि सुधारित थकबाकीपैकी पन्नास टक्के रक्कम मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उरलेली थकबाकीही माफ होणार आहे. या योजनेचा लाभ घेत औरंगाबाद परिमंडळातले दोन हजार आठशे चोपन्न शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत.

दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत भाग न घेणाऱ्या आणि चालू वीजबिलांचाही भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. महावितरणवरचं आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असं आवाहन महावितरणनं केलं आहे. आतापर्यंत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या त्रेपन्न  हजार नऊशे एक शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज कोलकाता इथं खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन सामने जिंकून भारतानं दोन - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

या मालिकेनंतर दोन्ही संघात दोन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. पहिली कसोटी येत्या २५ नोव्हेंबरपासून कानपूर इथं तर दुसरी कसोटी तीन डिसेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे.

****

जागतिक वारसा सप्ताह निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद इथल्या देवगिरी किल्ल्यावर आज हेरीटेज वॉक घेण्यात आला. इतिहास तज्ज्ञ डॉ. रफत कुरेशी, दुलारी कुरेशी, पत्रकार आदित्य वाघमारे यांनी किल्ल्याची निर्मिती, यादवकालीन स्थापत्यकला, दख्खनी उर्दू आणि मराठी भाषांचा इतिहास, किल्यावर भेट देणारे परदेशी प्रवासी याबाबत सविस्तर माहिती दिली. पुरातत्त्व अधीक्षक डॉक्टर मिलनकुमार चावले यांनी उपस्थितांचं स्वागत करून पुरातत्व विभागाकडून केल्या जात असलेल्या कामाची माहिती दिली. मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीच्या वतीनं, छोट्या गावांमध्ये विखुरलेल्या प्राचीन मूर्ती, मंदिरं, बारवा यांच्या जतन आणि संरक्षणासाठी जनजागृती मोहिम चालवण्यात येत असल्याची माहिती श्रीकांत उमरीकर यांनी यावेळी  दिली. सुमारे दोनशे नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 04 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...