Tuesday, 2 November 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.11.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा.

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. बाराव्या फेरीच्या मोजणीनंतर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर १४ हजार १७५ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत झालेल्या मोजणीनंतर अंतापूरकर यांना ४४ हजार ३४४, भाजपचे सुभाष साबणे यांना ३० हजार १६९, तर वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले यांना चार हजार ४६४ मतं मिळाली. या निवडणुकीसाठी शनिवार ३० ऑक्टोबर रोजी सरासरी ६३ पूर्णांक ९५ टक्के मतदान झालं होतं.

****

भारतात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या १०६ कोटी ८५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. यापैकी ७३ कोटी ४३ लाख जणांना पहिली मात्रा, तर ३३ कोटी ३६ लाख जणांना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. आतापर्यंत या लसीच्या १०६ कोटी ८५ लाख ७१ हजार ८७९ नागरीकांना लस देण्यात आली.

दरम्यान, देशात काल नव्या दहा हजार ४२३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४२ लाख ९६ हजार २३७ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५८ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १५ हजार २१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३६ लाख ८३ हजार ५८१ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५३ हजार ७७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतल्या परभणी जिल्ह्यातील ५ हजार ८०४ पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेलं नाही. यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रलंबित आधार प्रमाणीकरण तसंच जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येत असून लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालयाशी आणि बँक शाखेशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केलं आहे.

नांदेड जिल्ह्यातही महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतल्या ५ हजार ७५२ पात्र शेतकऱ्यांनी अद्यापही आधार कार्ड प्रमाणिकरण केले नाही. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपले आधार कार्ड प्रमाणीकरण करून घ्यावं असं आवाहन सहकारी संस्था जिल्हा निबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केलं आहे.

****

परभणी शहरातल्या नागरिकांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिवाळी हरित आणि पर्यावरण पूरक साजरी करण्याचं आवाहन, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे. भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार १२५ डेसिबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री आणि वापर करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचं, त्यांनी सांगितलं. विविध सण-उत्सवातलं निर्माल्य जलप्रदूषण होऊ नये यासाठी विहीर आणि तलावात न टाकता, त्यांचा वापर आपल्याच घरातल्या परसबागेत वृक्षांना खत करण्यासाठी करावा, असं पवार यांनी सांगितलं आहे.

****

पुणे इथून निघालेल्या विजय ज्योतीचं नाशिकरोड आर्टिलरी सेंटर इथून, काल देवळाली इथल्या वायुसेना स्टेशनमध्ये आगमन झालं. याप्रसंगी सैनिकांकडून दाखवण्यात आलेल्या युद्धजन्य प्रात्यक्षिकांनी, युद्धप्रसंगाच्या आठवणी ताज्या केल्या, तसंच शहिदांच्या शौर्याला नमन केलं. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

****

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यासाठी, शासनाकडून ४२५ कोटी सात लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यापैकी ३५७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी, जिल्ह्यातल्या विविध बँकांकडे वर्ग करण्यात आला असून, दोन दिवसांमध्ये हे अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश, पालकमंत्री राजेश टोपे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

****

आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत नांदेड जिल्ह्यात ग्राम पंचायती, शाळा, बाजार पेठेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं एक हजार ४६० गावांमध्ये दहा लाख १३ हजार ३८३ लोकांना कायदेविषयक माहिती देण्यात आली.

****

नाशिक शहरात विनापरवानगी संपूर्ण झाड तोडल्यास एक लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय नाशिक महापालिकेनं घेतला आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे फौजदारी कारवाई देखील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

****

बीड जिल्ह्यातले दुकानदार तसंच व्यावसायिकांनी स्वत:चं आणि आपापल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावं, अन्यथा दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशारा, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत असून, दुकानदार हे सुपर स्प्रेडर ठरू नये, यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचं पालन करण्याची सूचना त्यांनी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...