Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ नोव्हेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
विधान परिषदेच्या
पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार औरंगाबादचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी
आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या
निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनामुळे ही जागा
रिक्त झाली आहे. परंपरेनुसार सदस्याचं निधन झाल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होते. त्यानुसार
केणेकर यांनी आज माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होत आहे.
धुळे-नंदुरबार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सात जागांचे निकाल आतापर्यंत जाहीर
झाले आहेत, यामध्ये किसान संघर्ष पॅनलला दोन आणि सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलला पाच
जागांवर विजय मिळाला आहे. सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे हर्षवर्धन दहिते, राजेंद्र
देसले, माजी आमदार शरद पाटील, राजवर्धन कदमबांडे आणि सीमाताई रंधे तर महाविकास आघाडीचे
चंद्रकांत रघुवंशी आणि संदीप वळवी विजयी झाले आहेत. बँकेच्या दहा जागांसाठी ही निवडणूक
होत आहे. सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.
जळगाव जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतमोजणीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्य सहकार पॅनलचे सर्व
उमेदवार विजयी झाले असल्याचं रोहीणी खडसे यांनी वार्ताहरांना सांगितलं.
सातारा जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेची मतगणना सुरू आहे.
****
वायू प्रदुषणामुळे
राजधानी दिल्ली मधल्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन माध्यमातून
वर्ग सुरु राहतील. दिल्ली आणि आसपासच्या क्षेत्रासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं
यासंबंधी आदेश जारी केले आहेत. वायू प्रदुषणामुळे दिल्ली प्रशासनानं गेल्या १३ तारखेला
शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा केली होती.
****
केंद्र सरकारनं
राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १ अब्ज ३१ कोटी ५ लाख कोविड लसीच्या मात्रा
उपलब्ध करुन दिल्या आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या २१ कोटी ६४ लाखांहून
अधिक लसीच्या मात्रा उपलब्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
दरम्यान,
देशात आतापर्यंत ६३ कोटी २५ लाख नमुन्यांची तर गेल्या २४ तासात ७ लाख ८३ हजार नमुन्यांची
कोविड चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यातील पाथर्डी इथं झालेल्या दोन दिवसीय उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अहमदनगरच्या
सुदर्शन कोतकर या मल्लानं उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावला.
या गटात नाशिकच्या बाळू बोडखेनं उपविजेतेपद मिळवलं.
****
विधान परिषदेच्या
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चंद्रशेखर
बावनकुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
दरम्यान,
भाजपाचे नागपूरचे नेते छोटू उर्फ रवींद्र भोयर यांनी बावनकुळे यांच्या उमेदवारी बद्दल
नाराजी दर्शवत भारतीय जनता पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपण
काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचं पत्रकारांना सांगितलं.
****
अखिल भारतीय
मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित १४व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी
साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर स्मिता मेहेत्रे भूषवणार आहेत.
या संमेलनाचं उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते होणार असल्याची
घोषणा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी आज सोलापूर इथं पत्रकार परिषदेत केली.
येत्या २५ तारखेला सोलापूर मधल्या निर्मलकुमार फडकुले सभागृहात हे साहित्य संमेलन होणार
आहे.
****
मूळच्या
सोलापूरच्या आणि सध्या तामिळनाडू इथं प्रशासकीय सेवेत पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत
असलेल्या अधिकारी विद्या जयंत कुलकर्णी यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त
संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी त्यांनी पुणे इथं केंद्रीय अन्वेषण
विभागात काम केलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ तारखेला मन की बात या आकाशवाणी वरील शृंखलेच्या माध्यमातून
जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम शृंखलेतला ८३ वा भाग असेल. नमो ॲप आणि माय
गव्ह यावर आपली मतं आणि प्रतिक्रिया पाठवाव्यात असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी जनतेला
केलं आहे.
****
No comments:
Post a Comment