Friday, 18 February 2022

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 February 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा..

****

** रेल्वे वाहतुकीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याला सरकारचं प्राधान्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही; ठाणे-दिवा दरम्यान दोन अतिरिक्त मार्गिकांचं लोकार्पण

** अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ जणांना फाशी तर ११ जणांना आजन्म कारावास

** शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण केलेल्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण

आणि

** भारत - वेस्ट इंडिज दरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज दुसरा सामना

****

स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबई शहराचं मोठं योगदान असून, मुंबईत रेल्वे वाहतुकीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा या दोन स्थानकांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त मार्गिकांचं लोकार्पण तसंच ३६ नव्या उपनगरी गाड्यांना दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महारांजांना वंदन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला. रेल्वे सेवेच्या आधुनिकीकरणासोबतच मुंबईतल्या १९ स्थानकांचं ही आधुनिकीकरण केलं जाईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. अहमदाबाद -मुंबई द्रुतगती रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण व्हावा, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशात पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे विस्टाडोम कोच तयार होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वाहतुकीचे मार्ग म्हणजे विकासाच्या रक्तवाहिन्या असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी, यापुढेही केंद्र सरकारचं सहाय्य असंच मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

****

२००८ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद सत्र न्यायालयानं ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. २६ जुलै २००८ ला अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते, यात ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण जखमी झाले होते.

****

सक्तवसुली संचालनालय - ईडीने दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकर याला अटक केली आहे. ईडीने मुंबईत नुकतेच काही ठिकाणी छापे घातले होते. त्यानंतर ईडीने इकबालच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती, न्यायालयानं ती मान्य केली. आज ईडीने चौकशीदरम्यान इकबाल याला अटक केली, त्याला विशेष न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयानं इकबालला सात दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे.

****

शिवसेना नेते माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

****

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या साजरी होत आहे. आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद शहरात क्रांती चौकातल्या नूतनीकरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. शिवछत्रपतींचं हे देशातलं सर्वाधिक उंचीचं शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातले शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतरा आणि परिसराचं सौंदर्यीकरण औरंगाबाद महानगरपालिकेनं पूर्ण केलं आहे.

दरम्यान, या परिसरात रात्री १२ वाजेनंतर कोणताही कार्यक्रम होणार नाही, अशी सूचना, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे.

****

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं यंदाची शिवजयंती वैचारिक शिवजयंती म्हणून साजरी केली जात आहे. उद्या शिवजयंतीनिमित्तानं प्रसिद्ध विचारवंत दिवंगत गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता, हे पुस्तक वितरित केलं जाणार आहे. औरंगाबाद शहरात क्रांतीचौक इथं उद्या सकाळी सात वाजेपासून हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहे.

****

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं राणे यांना नोटीस बजावली आहे. राणे यांच्या जुहू इथल्या अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले आहे का याची पालिका तपासणी करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या अंधेरी इथल्या के वेस्ट विभागानं बंगल्यात जाऊन छायाचित्र आणि मोजमापं घेण्यासाठी येणार असल्याचं या नोटीसीद्वारे कळवलं आहे. बंगला उभारताना दिलेल्या मंजुरी नुसार बांधकाम केले नसल्यास किंवा त्यात काही बदल केले असल्यास ते बांधकाम पालिकेकडून तोडलं जाण्याची शक्यता आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कोलकाता इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

भारताचे आद्य क्रांतिगुरू गुरुवर्य लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज लहुजी सैनिक संघ आणि लहु प्रहार संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. मुख्य कार्यक्रम सिडको परिसरातील आद्य क्रांतीगुरु गुरुवर्य लहुजी साळवे यांच्या पुतळ्या जवळ घेण्यात आला, या प्रसंगी लहू प्रहार चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष पवार यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्यातल्या दोन राज्य मार्गांवरील अपघाताच्या मालिकांना कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित एजन्सीच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी परभणी इथं खानापूर नाका भागात आज रास्तारोको आंदोलन केलं. परभणी ते ताडकळस तसंच परभणी ते झिरोफाटा या दोन्ही रस्त्यांची कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 October 2026 Time 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...