Friday, 4 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात भाग घेण्याकरता नोंदणी करण्यासाठीची आज शेवटची तारीख आहे. या कार्यक्रमाचं हे पाचवं वर्ष आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीचा कार्यक्रमही ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. या कार्यक्रमासाठी इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक तसंच पालकांची निवड ऑनलाईन स्पर्धेच्या मार्फत केली जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात.

****

पदवीधारकांना रोजगार विनिमय कार्यालयात नोंदणी करणं सक्तीचं करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रयत्न नाही. या कार्यालयात नोंदणी करणं ऐच्छिक असल्याचं, केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रत्नेश्वर तेली यांनी स्पष्ट केलं आहे. विविध क्षेत्रातल्या रोजगाराशी संबंधीत “करिअर सेवा प्रकल्प” संपूर्ण देशभर राबवण्याचा संकल्प मंत्रालयानं केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्य सरकारांनी इंधन दरांवरील मूल्यावर्धित करामध्ये कपात करावी जेणेकरून इंधन दर कमी होतील, असं आवाहन, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलं आहे. लोकसभेत वाढत्या इंधन दराबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. डिझेल आणि पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ८९ कोटी ४९ लाख १९ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातल्या विविध ११५ स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करुन पर्यटकांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

****

मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल, यासाठीची प्रक्रिया वेगानं सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली आहे. यासाठीचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्तावावरचा भाषा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल साहित्य अकादमीकडे पाठवला होता. तिथे या अहवालातल्या त्रुटींची पूर्तता झाली आहे. आणि आता हा प्रस्ताव आंतरमंत्रालय स्तरावर विचाराधीन आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...