Sunday, 11 December 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

****

·      हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

·      कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादावर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन

·      वीजदेयक वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

·      उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणारे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात

·      ज्येष्ठ गायिका लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

·      चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

आणि

·      तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा बांगलादेशवर २२७ धावांनी विजय

****

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या लोकार्पणानंतर नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटरपर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला होईल. याचबरोबर नागपूर इथं विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.  १० जिल्हे, २६ तालुके आणि आसपासच्या ३९२ गावांना जोडणाऱ्या या देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड सहा पदरी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे ११ लाख ३१ हजार वृक्षांची लागवड होणार आहे. महामार्गावर दर ५ किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे, मोफत दूरध्वनी सेवा, तसंच ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्सही असणार आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार आहे. सध्या नागपूर ते शिर्डी या अंतरासाठी सुमारे ९०० रुपये पथकर द्यावा लागेल. हा पथकर फास्ट टॅग, कार्ड, वॅालेट, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी दरम्यान मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ इथं पथकर नाका आहे. इतर इंटरचेंजेस धरून १९ नाके आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी महामार्गावर १५ रुग्णवाहिका, १५ शीघ्र प्रतिसाद वाहनं, १२२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काम सुरू झालेल्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आपल्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात होत आहे, ही भाग्याची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते काल नागपूर इथं आले असता, प्रसार माध्यमांशी बोलत होते.

या महामार्गाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी गोव्याला रवाना होतील. गोव्यात २ हजार ८७० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय  विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

****

हिंदूहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्‌घा‌टनासाठी महाराष्ट्रात येत असलेल्या पंतप्रधानांनी उद्‌घा‌टनापूर्वी कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्‌घाटन काल ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले...

 समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला स्वतः पंतप्रधान येतायत पण माझी त्यांनी अझून एक विनंती आहे तुम्ही देशाचे पालक आहात, पालकासारखा बोला. जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची आरेरावी जी सुरु आहे त्याचबद्दल सुध्दा तुम्ही सणकून बोललंच पाहिजे, अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या प्रश्नवरती भूमिकेची वाट बघतो आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या रस्ता कर्नाटक महाराष्ट्रसाठी बंद करत असेल आणि बंद केलेला असेल तर पंतप्रधान म्हणून तुम्ही काय बोलणार आहात आणि महाराष्ट्रला काय दिलासा देणार आहेत ते पहिले बोला आणि मग शिवसेना प्रमुखांच्या नावाने असलेल्या त्या महामार्गचं उदघाटन करा”.

चुकणाऱ्यांचा कान धरण्याचा साहित्यिकांना अधिकार असून, राज्यकर्ते चुकत असतील तर साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून त्यांची चूक दाखवून द्यायला हवी, असं ठाकरे म्हणाले. मराठवाडा ही संतांची भूमी असून, या भूमीनं प्रत्येकाला संस्कार आणि शौर्य दिलं आहे. शेतकरी जशी शेतीची मशागत करतो तशीच साहित्यिक आपल्या बुध्दीची मशागत करत असतात, त्यामुळे साहित्यिकांनी आपली भूमिका परखडपणे मांडायला हवी, असं ठाकरे यांनी नमूद केलं.

संमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक शेषराव मोहिते, स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचीही यावेळी भाषणं झाली. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिरादर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, यांच्यासह साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात कथाकथन, परिसंवाद, कवी संमेलन, प्रकट मुलाखत, बाल मेळावा आदी कार्यक्रम होत आहेत. संमेलनाचा आज समारोप होत आहे.

****

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम लक्षात घेता वीजदेयक वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नये, असे निर्देश ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची वीज खंडीत करु नये, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे.

****

राज्यातील एकही शेतकरी पीक विम्याच्या भरपाई पासून वंचित राहणार नाही, असं राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं माध्यमांशी बोलत होते. राज्यातील ५१ लाख शेतकऱ्यांनी पिक विम्याची भरपाई मिळवण्यासाठी अर्ज केले होते, त्यातील ४९ लाख शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना विम्याचा पहिला हप्ता मिळाला असल्याचं सत्तार म्हणाले. १९ डिसेंबर पर्यंत राज्यातील एकही शेतकरी पीकविमा भरपाई पासून वंचित राहणार नाही, असंही सत्तार म्हणाले.

****

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल पिंपरी चिंचवड इथं शाई फेकणाऱ्यासह तिन जणांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. शाईफेक करणाऱ्या तरुणाची ओळख पटली असून मनोज गरबडे असं त्याचं नाव  आहे.

दरम्यान, पाटील यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ काल कोथरूड इथं राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलं.

याप्रकरणी शाईफेक करणं ही झुंडशाही आहे, अशी झुंडशाही सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

****

ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव बंधनकारक करणाऱ्या परिपत्रकास आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. जिल्हापरिषदेमार्फत नियुक्ती केल्या जाणाऱ्या वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणं बंधनकारक करणारं नऊ सप्टेंबर २०१९ रोजी जारी केलेलं परिपत्रक अन्यायकारक आहे, तसंच ते परिपत्रक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१ च्या कलम २४८ चं पालन न करता आणि उच्च न्यायालयानं दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगानं काढलेलं नाही, असं या याचिकेत म्हटलं आहे. ही याचिका सुनावणीसाठी आली असता खंडपीठानं राज्य शासन आणि औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि धुळे जिल्हा परिषदांना नोटीस बजावली. याबाबत पुढील सुनावणी २३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

****

ज्येष्ठ गायिका लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचनाबाईंचं काल राहत्या घरी निधन झालं होतं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी पहिली लावणी गायलेल्या सुलोचनाबाईंनी मला नेसव शालू नवा, खेळताना रंग बाई होळीचा या आणि अशा असंख्य लावण्या गाऊन साठ वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी काही गुजराती चित्रपटातून तसंच उर्दू नाटकातून भूमिकाही साकारल्या. त्यांना महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह भारत सरकारच्या पद्मश्री या नागरी सन्मानानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं होतं.

शालीनतेनं सादर होणाऱ्या ठसकेबाज लावणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुलोचना बाईंनी ‘रंगल्या रात्री’ या सिनेमासाठी पहिल्यांदा लावणी गायली आणि फडावरची लावणी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय झाली. मराठीसह हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषांमधूनही त्यांनी अनेक गाणी गायली. लावणी गायनाचे अनेक कार्यक्रम केले. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातला ठराविक हिस्सा त्या धार्मिक संस्थांना देत, तसंच गरजूंपर्यंत पोहोचवत. माझे गाणे माझे जगणे, या आत्मचरित्रातून त्यांनी लावणीच्या अनेक आठवणी जागवल्या आहेत. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागंल कोल्हा, मला हो म्हणतात लवंगी मिरची किंवा कसं काय पाटील बरं हाय का.. या सुलोचनाबाईंनी गायलेल्या लावण्या रसिकांच्या मनात चिरकाळ ताज्या राहतील, यात काही शंका नाही...

सुलोचनाबाईंच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.

मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरांत आणि मनामनात पोहचवणाऱ्या सूरसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषद निवडणुकीसाठी काल चार जिल्हयातील १७ मतदान केंद्रावर विक्रमी ९८ टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यातील अधिसभेच्या २९ तर विद्या परिषदेच्या ८ जागांची तसंच ३८ अभ्यासमंडळाची ही निवडणूक प्रक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. मतमोजणी १३ डिसेंबरला होणार आहे.

****

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंडौस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र्, मराठवाडा तसंच विदर्भातल्या १४ जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होण्याची शक्यता असून यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड आणि हिंगोलीचा समावेश आहे.

****

 

तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात काल भारतानं बांगलादेशवर २२७ धावांनी विजय मिळवला. मात्र बांगलादेशनं पहिले दोन सामने जिंकत, तीन सामन्यांची ही मालिका याआधीच जिंकली होती. काल झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शिखर धवनसोबत सलामीला आलेल्या इशान किशनचं द्वीशतक आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघानं ५० षटकांत आठ बाद ४०९ धावा करत, बांगलादेशसमोर ४१० धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र बांगलादेशचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले, ३४ व्या षटकांत १८२ धावा झालेल्या असताना, उमरान मलिकने बांगलादेशचा दहावा बळी घेत, भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूरनं तीन, उमरान मलिक आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन तर वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक बळी घेतला.

१३१ चेंडूत २४ चौकार आणि १० षटकारांच्या सहाय्यानं २१० धावा करणारा ईशान किशन सामनावीर तर बांगलादेशचा मेहदी हसन मीराज मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

दरम्यान, या दोन्ही संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार असून, पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

****

कतारमध्ये सुरु अस्सलेल्या फीफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपउपांत्य फेरीत, इंग्लंडच्या संघाचा २-१ असा पराभव करत फ्रांसनं उपान्त्य फेरीत काल प्रवेश केला तर अन्य सामन्यात मोरक्कोनं पोर्तुगालचा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली. आता मोरक्को आणि फ्रान्स तर क्रोएशिया आणि अर्जेंटीना या संघांमध्ये उपान्त्य फेरीचे सामने होणार आहेत.

****

उस्मानाबाद इथं झालेल्या २३ वर्षाखालील पुरुष आणि महिला राज्यस्तरीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत विविध प्रकारात प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना काल पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले तसंच राज्य ॲथलेटिक्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना पदकं प्रदान करण्यात आली.

****

लातूर शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी लघु, मध्यम आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यात उपाययोजना करण्यात येतील, असं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितलं आहे. वाहतूक कोंडीचं व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, बाह्यमार्ग आदी आवश्यक प्रस्ताव तयार केले जातील, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

राज्यात गोवर-रुबेलाचा उद्रेक वाढत असून, या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेनं सतर्क राहावं, अशा सूचना परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या आहेत. गोवर आणि रुबेलाबाबत पालकांनी घाबरून न जाता बालकाचं लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद शहरानजीकच्या चितेगाव इथं जिल्हास्तरीय इज्तेमाला कालपासून सुरुवात झाली. चितेगाव इथे ३०० एकर जागेवर या इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

 

 

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 17 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...