Sunday, 18 December 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच तसंच सदस्य पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान

·      महागाई, तसंच महापुरुषांचा अवमानसह विविध मुद्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा

·      संतमहंत तसंच हिंदू दैवतांविरोधात होणाऱ्या विधानांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचं राज्यभरात माफी मागा आंदोल

·      पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं

·      वस्तू आणि सेवा कर पालनात होणाऱ्या अनियमितांना अपराधिक श्रेणीतून वगळण्याचा निर्णय

·      भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवसअखेर बांगलादेशच्या सहा बाद २७२ धावा

·      अंधांसाठीचा टी ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक भारतीय संघानं पटकावला

   आणि

·      फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अर्जेंटिना - फ्रान्स संघात अंतिम सामना

****

 

राज्याच्या ३४ जिल्ह्यात ३४० तालुक्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सरपंच तसंच सदस्य पदासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येईल. मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे.

जालना जिल्ह्यातल्या २६६ पैकी बिनविरोध झालेल्या १३ ग्रामपंचायती वगळता २५३ ग्रामपंचातींसाठी आज मतदान होत आहे. एकूण ८२९ केंद्रांवर मतदान होणार असून यासाठीची आवश्यक तयारी निवडणूक विभागानं पूर्ण केली आहे.

****

बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ६७० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. ६७० सरपंच पदासाठी जिल्ह्यात एक हजार ९३२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर सदस्य पदाच्या दोन हजार १०७ जागांसाठी १२ हजार २१९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातल्या सहा शिक्षकांवर निवडणूक कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांत दोन केंद्राध्यक्ष आणि चार मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. 

****

नांदेड जिल्ह्यात १६० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत या कालावधीत मतदान होईल. ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य पार पाडावं, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात १६६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यामध्ये उस्मानाबाद ४५, तुळजापूर ४८, उमरगा २३, लोहारा १३, कळंब ३०, वाशी चार, भूम दोन आणि परंडा तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

****

औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच तसंच सदस्य पदांसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात सरपंचपदासाठी ६१४ तर सदस्यपदासाठी ३ हजार ६९० उमेदवार रिंगणार आहेत. जिल्ह्यात मुदत संपलेल्या २१९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली होती. परंतु गंगापूरच्या ३ ग्रामपंचायतींबाबत आक्षेप आल्याने त्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करुन उर्वरीत २१६ मतदान होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाच्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू असेल. अत्यावश्यक सेवेतली वाहनं, अत्यावश्यक सेवेतले अधिकारी तसंच कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, अंत्ययात्रा याकरता हे आदेश लागू राहणार नाहीत, असं अपर जिल्हादंडधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

महागाई, बेरोजगारी, पळवलेले उद्योगधंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या अन्य नेत्यांकडून महापुरुषांचा होत असलेला अवमान आदी मुद्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने काल मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महामोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शेकाप नेते जयंत पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तयार केलेल्या महापुरुषांच्या चित्र रथांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या मोर्चानंतर जाहीर सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड करणार नाही असं सांगितलं. ते म्हणाले..

“आज खरं म्हणजे हे, सर्व पक्षाचे झेंडे, ही ताकद महाराष्ट्राची आहे. सर्व पक्ष एकवटलेत. फक्त महाराष्ट्र दोही आहेत, ते या मोर्चामध्ये नाहीयेत आणि स्वतःला जे बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये, त्यांचेविचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, त्यांचे विचार नाहीत ते, त्यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीशी लाचारी करणारे त्यांचे विचार नव्हते, खुर्ची गेली तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता हिच्या बरोबर आम्ही तडजोड करणार नाही, होऊ देणार नाही.”

 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी बोलताना, महापुरुषांविरोधी सातत्याने होणाऱ्या विधानांना विरोध करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले..

“संकट जेव्हा महाराष्ट्रावर असतं, त्या वेळेस महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता, तेव्हा महाराष्ट्र एकजूट होऊन पेटून उठतो, आणि पेटून उठल्यानंतर ध्येय साध्य केल्याशिवाय महाराष्ट्रा शांत बसत नाही, याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे. खरं तर ही वेळ का भावी, महापुरुषांच्या बद्दल अपमानास्पद सातत्याने बोलण्याचं, जे काही आता घडतंय त्याला विरोध केला पाहिजे.”

****

भारतीय जनता पक्षानं या महामोर्चावर कडाडून टीका केली. महाविकास आघाडीचा मोर्चा हा राज्यपालांच्या विरोधात नसून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार चांगलं काम करत असल्याने, भीतीपोटी काढलेला मोर्चा असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून संतमहंत तसंच हिंदू दैवतांविरोधात होणाऱ्या विधानांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभरात माफी मागा आंदोलकरण्यात आलं. राज्यात सुमारे सहाशेहून अधिक ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

यवतमाळ इथं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी देशाची आस्था आणि अस्मिता याबाबत अपशब्द काढणाऱ्यांना जनताच शिक्षा देईल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले...

“महाराष्ट्र द्रोही असेल की देश द्रोही असेल, यांच्यावर चाल केलीच पाहिजे, जे लोक या देशाची आस्था, अस्मिता , प्रभु राम, प्रभु कृष्णाबद्दल अपशब्द काढतात, जे महामानवांच्या संदर्भात अपशब्द काढतात. ज्यांना विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे  माहित  नाही असे महाराष्ट्र द्रोही व देश द्रोही यांना जनतेनं शिक्षा दिलीच पाहिजे.”

 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयक पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क इथं अपमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यात ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी इथं भाजप पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी भुट्टो यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचं दहन करून निषेध व्यक्त केला.

दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते आणि मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वात राज्यातील शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना यासंदर्भातलं निवेदन दिलं.

****

 

वस्तू आणि सेवा कर - जीएसटी पालनात होणाऱ्या अनियमितांना अपराधिक श्रेणीतून वगळण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. जीएसटी परिषदेची ४८ वी बैठक काल दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीनंतर सीतारामन यांनी ही माहिती दिली. पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलवरचा जीएसटी आता १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जैव इंधनाच्या वापराला चालना मिळेल तसंच कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी होईल, असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. डाळींच्या फोलपटांवरच्या भुसा करमुक्त करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. या फोलपटांवर आतापर्यंत पाच टक्के जीएसटी आकारला जात होता.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या पुढाकाराने येत्या २६ डिसेंबरला विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर शेतकरी शेतमजुरांचा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा येत्या मंगळवारी २० तारखेला यवतमाळ जिल्ह्यात वणी इथून नागपूरकडे प्रयाण करेल. वरोरा, नांदुरी, बरबटी, बुटीबोरी मार्गे २५ तारखेला हा मोर्चा नागपुरात दीक्षाभूमीवर मुक्कामी पोहोचणार असून, २६ डिसेंबरला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या २८ जिल्ह्यातले शेतकरी शेतमजूर या मोर्चात सहभागी होणार आहेत.

****

हिंगोली इथं अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यासाठी गेलेल्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकांनी काल दगडफेक केली. यात एक कर्मचारी जखमी झाला असून काही वाहनांचं नुकसान झालं आहे. शुक्रवारी जलेश्वर तलाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती, मात्र आज ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम थांबवून उर्वरित मोहिम उद्या सोमवारी राबवण्यात येणार आहे, त्यासाठीच्या सूचना देण्यासाठी हे पथक गेलं असतांना हल्ला झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

 

भारत आणि बांगलादेश यांच्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवसअखेर बांगलादेशनं सहा बाद २७२ धावा केल्या. या सामन्यात विजयासाठी भारतानं आज बांगलादेशचे चार गडी बाद करणं आवश्यक आहे, तर बांगलादेशला विजयासाठी २४१ धावांची आवश्यकता आहे.

****

अंधांसाठीचा टी ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक भारतीय संघानं पटकावला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघानं बांगलादेश संघाचा १२० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं वीस षटकात २७७ धावा केल्या. विजयासाठी २७८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशाचा संघ १५७ धावांत सर्वबाद झाला. याआधीही भारतानं २०१२ आणि २०१७ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. यावर्षी स्पर्धेत भारतासह, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे देश सहभागी झाले होते.

****

मुंबई इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील महिला ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा सात धावांनी पराभव झाला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी बाद १८८ धावा केल्या. भारतीय संघ वीस षटकांत सर्व बाद १८१ धावा करू शकला. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ ३-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना मंगळवारी होणार आहे.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अर्जेंटिना आणि फ्रान्स संघात अंतिम सामना होत आहे. फिफा स्पर्धेच्या इतिहासात फ्रान्स हा सलग दुसऱ्या वेळेस विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिलाच संघ आहे. तर अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सी यानं हा अंतिम विश्वचषक असल्याचं जाहीर केल्यानं, दोन्ही संघांसाठी हा अंतिम सामना अटीतटीचा ठरण्याचा अंदाज आहे.

तिसऱ्या क्रमांकासाठी मोरक्को आणि क्रोएशिया यांच्यात काल झालेल्या सामन्यात क्रोएशियाने मोरोक्कोचा २-१ असा पराभव केला.

****

भारतानं एफ आय एच महिला हॉकी नेशन्स चषक स्पर्धा जिंकली आहे. काल व्हॅलेन्सिया झालेल्या अंतिम फेरीत भारतीय संघानं स्पेनचा १-० असा पराभव केला. या सामन्यात भारताच्या गुरजीत कौरने एकमेव गोल केला. भारतीय हॉकी मंडळाने संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी २ लाख रुपये आणि सहकाऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. यासह, भारतीय संघ २०२३ - २४ मधील एफ आय एच प्रो लीगसाठी देखील पात्र ठरला आहे.

****

नांदेड रेल्वे विभागातील पेनगंगा हे रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी मध्यरात्री पासून कायमचं बंद करण्यात आलं आहे. विभागात पूर्णा ते अकोला सेक्शन मधील हे स्थानक असून या रेल्वेस्थानकावर यापुढे कोणतीही रेल्वे गाडी थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वे कडून कळवण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...