Sunday, 4 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

येत्या पत्रकार दिनी म्हणजेच ६ जानेवारी २०२३ ला सिंधुदुर्ग इथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीचा उद्घाटन सोहळा होणार आहे. हा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येईल.

****

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच या भवनाचं काम सुरू केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोलापूरसह केरळ आणि गोव्यातही कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी विकासकामांच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रातून बाहेर पडत कर्नाटकमध्ये सामील होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादाची कायदेशीर लढाई लढण्यासाठी दिल्लीत काही विधिज्ञांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी सोलापुरात महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथे काल पोलीसांनी सात वाहनांसह गहू आणि तांदळाचे ८० कट्टे असा एकूण ४० क्विंटल अवैध साठा जप्त केला आहे. स्वस्त धान्य दुकानातून हे धान्य घेऊन काही शिधापत्रिकाधारक दलालांमार्फत बाजारात जास्त किमतीत विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ही कारवाई केली.

****

किल्ले प्रतापगडचं संवर्धन करताना त्याच्या सौंदर्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घेऊन आराखडा तयार करावा, अशा सूचना साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत. किल्ले प्रतापगड संवर्धन आणि महाबळेश्वर सुशोभीकरण आराखडा संदर्भातल्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते.

 प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी वाहनतळ, पिण्याच्या पाण्याच्या सोयीसह विविध सुविधांचाही आरखड्यात प्रामुख्यानं समावेश करावा अश्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

****

भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. आज मीरपूरमध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे. थोड्या वेळात म्हणजे, साडे ११ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

 

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...