Monday, 5 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०५ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकाळी अहमदाबाद इथं मतदान केलं. अहमदाबाद, बडोदा आणि गांधीनगरसह १४ जिल्ह्यांतल्या ९३ जागांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

उत्तरप्रदेश, ओडिसा, राजस्थान, बिहार आणि छत्तीसगडमध्येही आज काही ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मैनपूरी इथं लोकसभेच्या जागेसाठी तर रामपूर आणि खतौली इथं विधानसभेच्या जागेसाठी मतदान होत आहे. ओडिशामध्ये पदमपूर्, राजस्थानमध्ये सरदारशहर, बिहारमध्ये कुढनी तर छत्तीसगडमध्ये भानुप्रतापनगर इथं विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या सर्व ठिकाणची मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

***

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्ली इथं सुरु होत आहे. पक्षाचे नेते जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, पुढच्या वर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा याबैठकीत आढावा घेतला जाईल, तसंच पक्षाच्या आगामी रणनितीविषयी चर्चा केली जाईल असं सूत्रांनी सांगितलं.

***

औरंगाबाद महानगरपालिकेचा चाळीसावा वर्धापन दिन येत्या ८ डिसेंबरला साजरा केला जाणार आहे. कोविड निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे शासन निर्देशांचं पालन करून अत्यंत साधेपणाने वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र यानिमित्त प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार तसंच माहिती आणि जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांनी दिली आहे.

***

पासष्टाव्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणाच्या मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र गटात कर्नाटकच्या दिव्या टी एस आणि इमरोज या जोडीला १६-४ अशा फरकानं हरवत सुवर्ण पदक पटकावलं. ज्युनिअर गट स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या अंजली आणि सागर या जोडीनं उत्तराखंडच्या यशस्वी आणि अभिनव यांना १८-१६ अशा फरकानं पराभूत करुन सुवर्ण पदक जिंकलं. या गटात महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं.

 

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...