Wednesday, 7 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०७ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत असून येत्या २९ तारखेपर्यंत ते चालणार आहे. या २३ दिवसाच्या अधिवेशनात १७ बैठका होणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. या अधिवेशनात विधायक कामकाज आणि इतर मुद्द्यांवर रचनात्मक चर्चा अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यसभेचे सभापती म्हणून या अधिवेशनात काम पाहतील आणि अश्या स्वरुपाचं हे पहिलं सत्र असेल.

***

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज होत आहे. दिल्लीतल्या ४२ केंद्रांवर ही मतमोजणी होत असून या सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असल्याचं दिल्लीचे राज्य मुख्य निवडणूक आयुक्त विजय देव यांनी सांगितलं. दिल्लीतल्या अडीचशे प्रभागांसाठी गेल्या ४ तारखेला मतदानप्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी १ हजार ३४९ उमेदवार रिंगणात असून यात ७०९ महिलांचा समावेश आहे.

***

भारतीय संविधान दिनाच्या औचित्यानं पर्यटन संचालनालयाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचा शुभारंभ करण्यात आला. या टूर सर्किटमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत स्थळं आणि बुद्धिस्ट स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक इथे पर्यटकांसाठी पर्यटन संचालनालयामार्फत गेल्या ३ आणि ४ डिसेंबर रोजी आयोजित नि:शुल्क सहलीत ४०६ पर्यटक सहभागी झाले होते.

***

लातूर शहर महानगरपालिकेच्या सुमारे ८५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी वाढ लागू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे.

****

भारत आणि बांगलादेश याच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज बांगलादेशातील मिरपूर इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत रविवारी झालेला पहिला सामना जिंकून बांगलादेशानं मालिकेत एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे. थोड्या वेळात म्हणजे साडे अकरा वाजता हा सामना सुरु होईल.

 

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...