Friday, 9 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या एका शिष्टमंडळानं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळांनं त्यांना महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावरुन राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. शिष्टमंडळात अरविंद सावंत, फौजिया खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच काँग्रेसच्या खासदारांचा समावेश होता.

****

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुंबई शहर तसंच शेजारच्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयानं आज परवानगी दिली. २०१८ मध्ये उच्च न्यायालयानं एका आदेशान्वये राज्यातील खारफुटीची झाडं तोडण्यावर बंदी घातली होती. मात्र कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पांसाठी झाडे तोडायची असल्यास प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाकडून परवानगी घेण्याची मुभा दिली होती.  त्यानुसार नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशननं मुंबई शहर तसंच शेजारच्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील खारफुटीची झाडं तोडायला परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या पीठानं त्यांचा हा परवानगी अर्ज आज मंजूर केला आहे.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या कथित विधानाप्रकरणी राज्यपालांविरोधात जनतेत असंतोष निर्माण झाला असल्याचं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. राज्यपाल हे छोटं पद नसून राज्यपालांविरोधात राष्ट्रपती तसंच पंतप्रधान कार्यालायाला पत्र पाठवलं आहे. या पत्राची दखल राष्ट्रपतींनी घेतली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यपालांनी केलेल्या व्यक्तव्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार नसल्याचं सांगत यासंदर्भात प्रक्रियेनुसार कारवाई होईल अशी खात्री वाटत असल्याचं ते यावेळी म्हणाले. 

****

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी हिंगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. दिल्ली इथं संसद परिसरात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, संच विविध पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र शासनानं सुरु केलेल्या दिव्यांग मंत्रालयाला केंद्र शासनाकडून निधी मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****

छतावर असलेल्या सौर संच योजनेला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध राहणार आहे. ग्राहकांनी कोणत्याही विक्रेत्याला राष्ट्रीय पोर्टलवरील अर्जाच्या शुल्कापोटी कोणतही अतिरिक्त शुल्क किंवा संबंधित वितरण कंपनीच्या विहित नसलेलं कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. तसंच याबाबत शुल्काची मागणी केल्यास, एमएनआरई ॲट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा संबंधित वितरण कंपनीला कळवावं असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सांगली जिल्ह्यातील मिरज इथं गेल्या तीन महिन्यांपासून जनावरांच्या लंपी प्रार्दुभावामुळं बंद असलेला म्हशींचा बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महादेव कोरे यांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार हा मिरज इथं भरवला जातो, मात्र सध्या हा बाजार भरत नसल्यानं यावर अवलंबून असणाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं कोरे यांनी म्हटलं आहे.

****

कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीला आजपासून  सुरुवात होत आहे. उपांत्यपूर्व फेरीसाठीचा पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात आज रात्री साडेआठ वाजता खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यात मध्यरात्री साडेबारा वाजता होईल.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयनं बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी तसंच श्रीलंका, न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सामन्यांच्या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. पुढील वर्षी ३ जानेवारीला मुंबईत टी ट्वेन्टी सामन्यानं या मालिकेची सुरुवात होईल. पुणे, राजकोट, गुवाहाटी आणि कोलकाता आदी ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या महिलांच्या पाच टी ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज खेळला जाणार आहे. मुंबईत डी वाय पाटील मैदानावर संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना येत्या रविवारी याच मैदानावर खेळवला जाईल.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...