Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14
December 2022
Time
18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १४ डिसेंबर
२०२२ सायंकाळी ६.१०
****
·
भारत चीन मुद्यावरून संसदेत
आजही गदारोळ;विरोधकांचा सभात्याग.
·
समृद्धी महामार्गावरून उद्यापासून
दोन बसगाड्या चालवण्याची एसटी महामंडळाची घोषणा.
·
‘चला शहर घडवू’ या मोहिमेत
नागरिकांनी सहभागी व्हावं - औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांचं आवाहन.
आणि
·
युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरचं
रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक.
****
भारत चीन मुद्यावरून संसदेत आजही गदारोळ झाल्यानं, दोन्ही
सदनांचं कामकाज बाधित झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने चीनच्या घुसखोरीवर सविस्तर चर्चेची मागणी केली.
याप्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केलेल निवेदन पुरेसं नाही, असंही खरगे म्हणाले.
उपसभापती हरिवंश यांनी आज या मुद्यावर बोलण्याची परवानगी नाकारत, कालच बोलण्यासाठी
वेळ दिला होता असं सांगितलं. त्यावर काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल
काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी आणि इतर विरोधी
सदस्यांनी सभात्याग केला.
लोकसभेतही विरोधकांनी याच मुद्यावरून सभात्याग केला. लोकसभेत
प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर
चर्चेची मागणी केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावर लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या
बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल, असं सांगत, सदनाचं कामकाज सुरू केलं. त्यानंतर काँग्रेस,
द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स तसंच तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी
सभात्याग केला.
****
भारत संचार निगम लिमिटेड- बीएसएनएलसाठी केंद्र सरकारने
एक लाख ६४ हजार कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या पॅकेजमुळे बीएसएनएलमध्ये
आमुलाग्र बदल होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं.
****
देशात मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या या वर्षात
८४ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. लोकसभेत शून्यकाळात वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष
गोयल यांनी ही माहिती दिली. फक्त पहिल्या श्रेणीच्या शहरांमध्येच नव्हे तर दुसऱ्या
आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमध्येही स्टार्टअप्स वाढत असल्याचं, गोयल यांनी सांगितलं.
****
द्रुतगती महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा
वाढण्याचं वृत्त निराधार असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं
आहे. ते आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात बोलत होते. राष्ट्रीय मार्ग, राज्यमार्ग,
दुपदरी मार्ग किंवा शहरातल्या रस्त्यांची वेगमर्यादाही वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचं,
गडकरी यांनी स्पष्ट केलं.
****
देशात पाच वर्षांखालील बालकांच्या पोषण संकेतांकात सुधारणा
झाली आहे. २०१५-१६ मध्ये प्रतिहजार बालकांपैकी ४३ बालकांचा मृत्यू होत होता, आता हे
प्रमाण प्रतिहजार ३२ झालं आहे. महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
****
महाराष्ट्र - कर्नाटकातील सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय
गृहमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, तसंच कर्नाटक पोलिसांना हटवून केंद्र सरकारचे पोलीस
दल तैनात करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत
यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. कोबाड गांधी यांच्या फॅक्चर्ड
फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याचा राज्य सरकारचा
निर्णय चुकीचा असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
****
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात तो रद्द
करणं आणि निवड समिती बरखास्त करणं, ही राज्य शासनाची कृती ‘अघोषित आणीबाणी’ असल्याची
टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज विधानमंडळात विशेष
पत्रकार परिषदेत बोलत होते. साहित्य, कला आणि क्रीडासारखी सांस्कृतिक क्षेत्रं राजकारणविरहीत
असली पाहिजेत, पुरस्कार्थींची निवड करणं किंवा निवड रद्द करण्यात सरकारचा हस्तक्षेप
गैर आणि निषेधार्ह असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळानं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून उद्यापासून दोन बसगाड्या चालवण्याची घोषणा केली
आहे. यामध्ये नागपूर ते शिर्डी तसंच, नागपूर ते औरंगाबाद बससेवेचा समावेश आहे. या दोन्ही
बससेवा शयन तसंच आसन पद्धतीच्या असतील. यामध्ये दोन बाय एक बैठक व्यवस्थेतली ३० आसनं
तर त्यावर १५ शयनव्यवस्थेची आसनं असतील. नागपूर शिर्डी बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री
९ वाजता तर नागपूर औरंगाबाद बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १० वाजता सुटेल. या दोन्ही
बसमुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे चार तासांहून अधिक वेळेची बचत होणार आहे. ७५ वर्षावरील
ज्येष्ठांना तिकिट दरात १००% सवलत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत असणार
आहे.
****
गोवर-रुबेलावर विशेष लसीकरण मोहीम राज्यात उद्यापासून
२५ तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातल्या मुलांना एमआर-वन
आणि एमआर-टू लसी देण्यात येतील. लसीकरण आवश्यक असलेल्या मुलांचा शोध आशा आणि अंगणवाडी
कार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात घेतला जात आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ डिसेंबरला आकाशवाणीरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचा हा ९६वा
भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीक आपले विचार किंवा सूचना, नमो अॅपवर आणि माय जीओव्ही
फोरमवर तसंच एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवू
शकतात.
****
जी-२० राष्ट्रसमूह आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर
‘चला शहर घडवू या’ या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी
अस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे.
जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३
रोजी अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर विविध स्थळांना भेटी देणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी
पाण्डेय यांनी आज आढावा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद शहरासह जिल्ह्याची
विविधता दाखवण्याची ही एक संधी असल्याचं पाण्डेय यांनी म्हटलं आहे. या प्रतिनिधींच्या
निवास, सुरक्षा, वाहतूक तसंच इतर अनुषांगिक व्यवस्थेसोबतच वेरुळ, अजिंठा इथल्या सोयीसुविधा,
रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक आणि पाणी पुरवठा व्यवस्थेचाही
यावेळी आढावा घेण्यात आला.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी कालव्यात ट्रॅक्टर कोसळून
पाच जण ठार झाले. यात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. ऊसतोड मजुरांना घेऊन
जाणारा हा ट्रॅक्टर पंढरपूरजवळ कळंब परिसरात कालव्यात कोसळला. हे ऊस तोड कामगार मध्य
प्रदेशातील असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये
पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावत त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाशी बरोबरी
केली आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत गोवा विरुद्ध राजस्थान या सामन्यात अर्जुनने गोवा
संघाकडून खेळताना १७८ चेंडूत शंभर धावा केल्या. १९८८ साली रणजी स्पर्धेत पदार्पणाच्या
सामन्यात सचिनने गुजरातविरुद्ध मुंबईकडून खेळताना १२९ चेंडूत शतक झळकावलं होतं.
****
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या
दिवसअखेर सहा बाद २७८ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा ९०, ऋषभ पंत ४६, कर्णधार के
एल राहुल २२, शुभमन गिल २०, अक्षर पटेल १४ तर विराट कोहली एक धाव करून बाद झाला. आजचा
खेळ थांबला तेव्हा श्रेयस अय्यर ८२ धावांवर खेळत होता.
****
शासकीय थकहमी पोटी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेला तीन कोटी ३ लाख रुपये मिळणार आहेत. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. राज्यातील १३ सहकारी संस्थांना एकूण ९६ कोटी ५३ लाख रुपये या बँकांना देण्याचा
निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
शैक्षणिक तसंच क्रीडा क्षेत्रात दिव्यांग विद्यार्थ्यांचं
कर्तृत्व सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं, नांदेड जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव, समता पर्व आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज
कल्याण विभागाच्या वतीनं आज नांदेड इथं पोलीस परेड ग्राउंड इथं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्या
बोलत होत्या.
****
१८ व्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड
इथले ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment