Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
· मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळं राज्यातल्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला
चालना मिळेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास.
· पैठणचे संदीप जगदाळे, परभणीचे बा. बा. कोटंबे यांना मध्य प्रदेश सरकारचा भा. रा.
तांबे साहित्य पुरस्कार जाहीर.
· सीमाप्रश्न, महापुरुषांचे राजकीय नेत्यांकडून होत असलेले अपमान, बेरोजगारी याविरोधात
महाविकास आघाडीचा परवा मुंबईत मोर्चा.
आणि
· पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ४०४ धावा केल्यानंतर भारतानं बांगलादेशाचा डाव
आठ बाद १३३ धावांवर रोखला.
****
मुंबई ते अमेरिकेतल्या सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळं महाराष्ट्रातील औद्योगिक
आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त
केला आहे. एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय
नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी
दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री बोलत होते. या थेट सेवेमुळे सिलिकॉन व्हॅली
मुंबई, पुणे शहराला जोडली जाईल. राज्यातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला याचा मोठा
लाभ होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईहून सुरू झालेली ही थेट सेवा आतापर्यंतचा
सर्वांत लांब अंतराचा हवाई प्रवास आहे. आठवड्यातून तीन वेळेला ही सेवा दिली जाणार आहे.
हवाईसेवेच्या क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचं सिंदीया म्हणाले.
जगात भारत हे नागरी हवाई उड्डाण क्षेत्रातला तिसऱ्या क्रमांकाचा देश असून हवाई प्रवास
सेवेला अधिक बळ देण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
मुंबईत आज G-20 विकास कार्यगटाच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी शाश्वत विकासाच्या ध्येयाला
गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा झाली. सहभागी प्रतिनिधी, समस्या
आणि त्यातील अंतर ओळखून त्यावरच्या मोजमापावर या बैठकीमध्ये लक्ष केंद्रित करत आहेत.
हे प्रतिनिधी डेटासंबधी भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपायांवर चर्चा करत आहेत. भारतानं
विकासासाठी डेटावरील G-20 उपक्रमाचा प्रस्ताव दिला आहे. डेटाचं विभाजन कमी करण्यासाठी
क्षमता निर्माण जोडणीद्वारे डेटाच्या क्षमतेनुरुप उपयोगात मदत होईल. यामुळे शाश्वत
विकास उद्दिष्टं साध्य करण्याच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढवण्यातही मदत होईल, असं भारतानं
म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढीनंतरही या वर्षी
गेल्या सहा एप्रिलपासून सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या
दरामध्ये वाढ केलेली नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप पूरी यांनी आज लोकसभेत एका लेखी
उत्तरात ही माहिती दिली. देश आपल्या गरजेच्या पंच्याऐंशी टक्क्यांहून अधिक कच्च्या
तेलाची आयात करतो. यामुळे देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजाराशी
जोडलेल्या असल्याचंही पुरी यांनी सांगितलं.
****
प्रसारण क्षेत्रात व्यवसाय आणि पूर्तता सुलभता आणण्यावर केंद्र सरकार भर देत आहे
असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी आज सांगितलं. ते राज्यसभेत पुरवणी
प्रश्नाला उत्तर देत होते. अपलिंकीग आणि डाऊनलिंकींगसाठी पूर्वी वेगवेगळी मार्गदर्शक
तत्वं होती, मात्र आता दोन्हींसाठी एकच मार्गदर्शिका असल्याचं त्यांनी सांगितलं. आता
थेट प्रसारणासाठी परवानगी घ्यावी लागत नाही फक्त पूर्व नोंदणी करणं गरजेचं असतं. प्रसारण
क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात
आली असल्याचं ते म्हणाले.
****
मध्य प्रदेश शासनाचे २०२० आणि २०१९ चे अखिल भारतीय भा. रा. तांबे कृती पुरस्कार
आज जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी दोन साहित्यकृतींना हा पुरस्कार दिला जातो. २०२०
साठीचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांच्या ‘सुपारी डॉट कॉम’ या नाट्य लेखनाला
तर सुचेता घोरपडे यांच्या ‘खुरपं’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. २०१९ चे पुरस्कार औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथले संदीप जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कविता संग्रहाला आणि
परभणीच्या बा. बा. कोटंबे यांच्या कदाचित कादंबरीला जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय भा.
रा. तांबे कृती पुरस्काराचं स्वरूप ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं
आहे. ‘मराठी गौरव दिना’ निमित्त येत्या २७ फेब्रुवारीला भोपाळ इथं पुरस्कारांचं वितरण
होणार आहे.
****
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न, महापुरुषांचे राजकीय नेत्यांकडून होत असलेले अपमान,
बेरोजगारी याविरोधात महाविकास आघाडीतर्फे परवा मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार असल्याची
माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईत पवार यांच्या
निवासस्थानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस
पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण तसेच अन्य विरोधी पक्ष नेत्यांच्या समवेत या संदर्भात
झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील अनेक संघटना या मोर्चात
सहभागी होणार असून तो शांततेत पार पडेल असं पवार यांनी सांगितलं. मोर्चाद्वारे मांडले
जाणारे प्रश्न हे कोणत्याही एका पक्षाचे प्रश्न नाहीत, हे सामाजिक प्रश्न आहेत त्यामुळे
राज्यातल्या तमाम नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेतून करतो
असं पवार म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिमेच्या पहिल्या फेरीला
आज प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत २५ डिसेंबरपर्यंत लसीकरण केलं जाणार आहे. गोवर रुबेला
लसीची चुकलेली मात्रा या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये अवश्य घ्य्या असं आवाहन भोकर ग्रामीण
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे यांनी केलं आहे. या मोहिमेची उस्मानाबाद
जिल्हास्तरीय सुरुवात उस्मानाबाद तालुक्यातील सांजा इथल्या आरोग्य वर्धीनी केंद्रात
आज झाली.
****
भारतानं बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर
बांगलादेश संघाचा डाव आठ बाद १३३ धावांवर रोखला. छत्तोग्राम इथं सुरू या सामन्यात कालच्या
सहा बाद २७८ धावसंख्येवरुन पुढं खेळताना भारतानं ४०४ धावा केल्या. श्रेयस अय्यर ८२
धावांवर बाद झाल्यानंतर आर. अश्र्विननं ५८
तर कुलदिप यादवनं ४० महत्त्वपूर्ण धावा केल्या. ताईजुल इस्लाम आणि मेहीदी हसन यांनी
प्रत्येकी चार गडी बाद केले. कुलदीपनं चार तर मोहम्मद सिराजनं तीन गडी बाद करत बांगलादेशच्या
डावाची दाणादाण उडवली. बांगलादेश संघ पहिल्या डावात २७१ धावांनी पिछाडीवर आहे.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी
नाट्य स्पर्धेत लातूर-नांदेड केंद्रातून परभणी इथलं दानव आणि लातूरचं अबीर गुलाल या
नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. गोपाळ फाऊंडेशनच्या दानवला प्रथम तर शकुंतलादेवी
सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अबीर गुलालला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. परभणीच्या
क्रांती हुतात्मा संस्थेच्या सृजन्मय सभा नाटकास तृतीय पारितोषिक मिळालं आहे.
****
विभागीय आयुक्त डॉ.सुनील केंद्रेकर यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या
रामेश्वर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. त्यांनी यावेळी स्वतः विद्यार्थ्यांची
शाळा घेतली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याचे रब्बीचे
पहिले आवर्तन येत्या १५ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीत झाला. उजनी प्रकल्पाच्या
कालवा सल्लागार समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना
आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्यावरची पाणी पट्टी वसुली तसंच त्याबाबतचं व्यवस्थापन
करणं वाढत्या सिंचन क्षेत्रामुळं आणि मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे पाटबंधारे विभागाला
कठीण जात आहे. त्यामुळं ते व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याचा
पर्याय अवलंबवावा, असे निर्देश विखे पाटील यावेळी यांनी दिले.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाचा एक वक्र दरवाजा आज १ फुटानं उघडून अकराशे घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. सिंचनाची मागणी वाढल्यामुळे पाणी
सोडण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उच्च शिक्षणमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल
केलेल्या विधानाच्या निषेधासाठी धुळ्यामध्ये आज सर्वपक्षीय विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी
आक्रोश मोर्चा काढला. त्यांचं मंत्रिपद बरखास्त करण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना
देण्यात आलं. पाटील यांनी या प्रकरणी माफी मागताना हे प्रकरण थांबवण्याचं आवाहन यापूर्वीच
केलं आहे.
****
No comments:
Post a Comment