Thursday, 15 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याची केंद्र सरकारची सूचना

·      जाहीर झालेला पुरस्कार रद्द करणं ही राज्य शासनाची कृती 'अघोषित आणिबाणी' असल्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका. लक्ष्मीकांत देशमुख यांच भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

·      उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याची भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची मागणी

·      नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरून आजपासून दोन बसगाड्या चालवण्याची राज्य परिवहन महामंडळाची घोषणा

·      गोवर-रुबेलावर राज्यात आजपासून विशेष लसीकरण मोहीम

णि

·      बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर सहा बाद २७८ धावा

****

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याची सूचना काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. गृहमंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची काल नवी दिल्लीत बैठक घेतली, या बैठकीत अशा प्रकारची समिती स्थापन करण्यावर एकमत झालं. गृहमंत्री शहा यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले...

‘‘जब तक सुप्रीम कोर्ट का इस बारे मे निर्णय नही आता, कोई भी राज्य इसके बारे मे एक दुसरे राज्य पर क्लेम, या तो डिमांड जनरेट नही करेगा। दुसरा दोनो राज्यो से मिलाकर दोनो और से तीन - तीन, छह मंत्री बैठेंगे, और इसपर पर्कोलेशन किस प्रकार से हो इसकी चिंता और चर्चा करेंगे। दोनो राज्योंमे कानुन और व्यवस्था की परिस्थिती ठिक रहे, अन्य आबादी को किसी भी प्रकारकी परेशानी न झेलनी पडे, इसके लिये, एक सिनियर आयपीएस अफसर की अध्यक्षता मे दोनों राज्य कमिटी बनाने के लिए सहमत हुए है। वो कमिटी की चर्चा का आऊटकम और सुप्रीम कोर्ट के फैसले जा इंतजार किया जाएगा।’’

****

 दोन्ही राज्यातल्या विरोधी पक्षांनीही या मुद्याला राजकीय रंग देऊ नये, असं आवाहन करत अमित शहा यांनी, सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणामध्ये वरिष्ठ नेत्यांच्या नावाने केलेल्या बनावट ट्विटमुळे दोन्ही राज्यांमध्ये भावना भडकल्या, अशा बनावट ट्विटच्या संदर्भात एफआयआर नोंदवून गुन्हेगारांना लोकांसमोर आणलं जाईल, असं देखील या बैठकीत निश्चित करण्यात आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, दोन्ही बाजूच्या नागरिकांना त्रास होऊ नये, तसंच मराठी माणसांवर अन्याय होऊ नये अशी महाराष्ट्राची भूमिका असल्याचं सांगितलं. ते म्हणाले..

‘‘ही जी काय बैठक झालेली आहे अतिशय सकारात्मक बैठक आहे. आणि यापुढे अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत, त्या होणार नाहीत. आणि दोन्ही राज्यातली जनता जी आहे, नागरीक आहेत, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. आणि जे काही मुद्दे आम्ही मांडले, मराठी शाळा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, अशा प्रकारची भुमिका आम्ही स्पष्टपणे त्याठिकाणी मांडलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे, त्याचा कुठेही अवमान होऊ नये, याची काळजी दोन्ही राज्यांनी घेतली पाहिजे अशी भुमिका केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली,आणि ती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलेली आहे.’’

****

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, तसंच कर्नाटक पोलिसांना हटवून केंद्र सरकारचे पोलीस दल तैनात करण्याची मागणी, शिवसेना द्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. कोबाड गांधी यांच्या फॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

****

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात तो रद्द करणं आणि निवड समिती बरखास्त करणं, ही राज्य शासनाची कृती 'अघोषित आणिबाणी' असल्याची टीका, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते काल विधानमंडळात विशेष पत्रकार परिषदेत बोलत होते. साहित्य, कला आणि क्रीडासारखी सांस्कृतिक क्षेत्रं राजकारणविरहीत असली पाहिजेत, पुरस्कार्थींची निवड करणं किंवा निवड रद्द करण्यात सरकारचा हस्तक्षेप गैर आणि निषेधार्ह असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, फॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रज्ञा दया पवार, विनोद शिरसाट यांनीदेखील राजीनामा दिला आहे. याशिवाय राज्य वाड्मय पुरस्कात प्राप्त भुरा या पुस्तकाचे लेखक शरद बाविस्कर आणि आनंद करंदीकर यांनी पुरस्कर परत करण्याची घोषणा केली आहे.

फॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करण्यात साहित्य संस्कृती मंडळाची काहीही चूक नसल्याचं स्पष्टीकरण मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी दिलं आहे. शासनाचा निर्णय आम्हाला बंधनकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

तर साहित्य संस्कृती मंडळानं या पुरस्काराची माहिती सरकारला द्यायला हवी होती, तसं न झाल्यानं सरकारला तातडीने पुरस्कार रद्द करावा लागला, असं मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. नक्षली साहित्याच्या गौरवीकरणास राज्य सरकारचा ठाम विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

****

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे. त्या काल कोल्हापूर इथं माध्यमांशी बोलत होत्या. शक्ती कायद्याचं आपण यापूर्वीही स्वागत केलं आहे. या कायद्यातल्या त्रुटी आता दुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे या कायद्याचा महिलांना, मुलींना फायदाच होईल, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.

****

राज्य परिवहन महामंडळानं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून आजपासून दोन बसगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर ते शिर्डी तसंच, नागपूर ते औरंगाबाद बससेवेचा समावेश आहे. या दोन्ही बससेवा शयन तसंच आसन पद्धतीच्या असतील. यामध्ये दोन बाय एक बैठक व्यवस्थेतली ३० आसनं तर त्यावर १५ शयनव्यवस्थेची आसनं असतील. नागपूर - शिर्डी बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री नऊ वाजता, तर नागपूर - औरंगाबाद बस दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री दहा वाजता सुटेल. या दोन्ही बसमुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे चार तासांहून अधिक वेळेची बचत होणार आहे. ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात पूर्ण सवलत, तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असेल.

****

जळगाव इथल्या प्रसिद्ध राजमल लखीचंद सराफा पेढीवर केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयच्या पथकानं काल छापा घातला. पेढीच्या जळगाव तसंच नाशिक इथल्या शाखा, वाहन विक्रीची दालनं तसंच निवासस्थानी छापा घालून, बँकेच्या कर्जाशी संबंधित कागदपत्रं सीबीआय पथकानं ताब्यात घेतली. भारतीय स्टेट बँकेच्या थकीत कर्जापोटी ही कारवाई करण्यात आली. थकीत कर्जापोटी बँकेने गहाण असलेल्या मालमत्तांची विक्री केली, तरीही पंधराशे कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला, त्यावरून बँकेने सीबीआयकडे तक्रार केल्यानं, ही कारवाई करण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ डिसेंबरला आकाशवाणीरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचा हा ९६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनीं आपले विचार किंवा सूचना, नमो अॅपवर आणि माय जीओव्ही फोरमवर तसंच एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवू शकतात.

****

गोवर-रुबेलावर विशेष लसीकरण मोहीम राज्यात आजपासून २५ तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातल्या मुलांना एमआर-वन आणि एमआर-टू लसी देण्यात येतील. लसीकरण आवश्यक असलेल्या मुलांचा शोध आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात घेतला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात दोन टप्प्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आजपासून २५ डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा, तर १५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ असा दुसरा टप्पा असेल. पहिल्या टप्प्यात नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातल्या, तर दुसऱ्या टप्प्यात १६ महिने ते दोन वर्ष वयोगटातल्या लसीकरण न झालेल्या बालकांचं प्राधान्यानं लसीकरण करण्यात येणार आहे.

****

जी-२० राष्ट्रसमूह आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'चला शहर घडवू या' या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे. जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ला रोजी अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर विविध स्थळांना भेटी देणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काल आढावा घेतला. औरंगाबाद शहरासह जिल्ह्याची विविधता दाखवण्याची ही एक संधी असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तालुक्यातून भाजप तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवबंधन बांधून या सर्वांचं स्वागत केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, पैठणचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परिक्षा येत्या २२ तारखेपासून सुरु होणार आहेत. परिक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी ही माहिती दिली. पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परिक्षा यापूर्वीच सुरु झाल्या आहेत.

****

शासकीय थकहमी पोटी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तीन कोटी ३ लाख रुपये मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या १३ सहकारी संस्थांना एकूण ९६ कोटी ५३ लाख रुपये या बँकांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

****

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव, समता पर्व आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, समाज कल्याण विभागाच्या वतीनं काल नांदेड इथं, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. शैक्षणिक तसंच क्रीडा क्षेत्रात दिव्यांग विद्यार्थ्यांचं कर्तृत्व सामान्य शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं, त्या यावेळी म्हणाल्या.

****

औरंगाबाद तालुक्यातल्या ३५ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या पार्श्वभूमीवर सहा आणि १२ डिसेंबरला मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठीच्या प्रशिक्षणाला अनेक कर्मचारी गैरहजर राहिले. या कर्मचाऱ्यांनी आज औरंगाबाद तहसील कार्यालयात प्रशिक्षणासाठी हजर राहावं, अन्यथा त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईचे निर्देश तहसीलदार ज्योती पवार यांनी दिले आहेत.

****

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने काल पहिल्या दिवसअखेर सहा बाद २७८ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा ९०, ऋषभ पंत ४६, कर्णधार के एल राहुल २२, शुभमन गिल २०, अक्षर पटेल १४ तर विराट कोहली एक धाव करून बाद झाला. काल खेळ थांबला तेव्हा श्रेयस अय्यर ८२ धावांवर खेळत होता.

****

कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना दरम्यान येत्या रविवारी होणार आहे. काल झालेल्या दुसर्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा दोन - शून्य असा पराभव केला. तिसर्या स्थानासाठी शनिवारी क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात सामना होणार आहे.

****

१८ व्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. येत्या १७ आणि १८ डिसेंबर रोजी गोव्या म्हापसा इथं हे संमेलन होणार आहे.

****

औरंगाबाद शहरात औषध विक्री करणाऱ्या दुकानदारांनी अंमली पदार्थाचा अंश असणाऱ्या औषधांची विक्री करताना रुग्णांचं आधारकार्ड आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा चिठ्ठीची खातरजमा करावी,शी सूचना पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी केली आहे. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. याच्या तपासणीसाठी शहरात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

****

लातूर जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होत असून, २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर १७, १८ आणि मतमोजणी दिवशी म्हणजेच २० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील मद्यविक्री बंद राहील.

****

धुळे शहर आणि परिसरात काल दुपारी साडेतीन वाजेनंतर अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळं शेतीला फटका बसणार असल्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

नाशिक शहरासह परिसरामध्ये काल दुपारी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा हलक्या सरी कोसळल्या. मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा या भागात सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. औरंगाबाद शहर आणि परिसरातही मध्यरात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

****

परळी वैजनाथ - मिरज एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आजपासून ही गाडी परळीहून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि संध्याकाळी साडेसहा वाजता मिरजला पोहोचेल अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या केंब्रिज शाळेजवळ असलेल्या वळणावर ट्रक आणि दुचाकीची समोरासमोरधडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी हा अपघात झाला. सतीश आणि अमोल मोगल अशी मृतांची नावं असून, ते मसोड इथले रहीवाशी होते.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...