Thursday, 15 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१५ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केन्द्र शासनानं डिजिटल प्रक्रियेच्या माध्यमातून फलोत्पादन प्रकल्पांना अवघ्या ४५ दिवसांत मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रकल्प विना विलंब मिळण्यासाठी देशभरातल्या शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री तसंच राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय फलोत्पादन संचालक मंडळाच्या ३२ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही नवी सुलभ रचना एक जानेवारीपासून लागू होणार आहे.

****

राष्ट्रीय उर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय उर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल झालं. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनातील इमारत या श्रेणीत लातूर इथल्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

****

जी-२० परिषदेसाठी जगभरातून मुंबईत आलेल्या विविध देशाच्या प्रतिनिधींना राज्यातली पर्यटनस्थळं, ऐतिहासिक वारसास्थळं, कृषी पर्यटन, वन्यजीव पर्यटनाची माहिती मिळावी, यासाठी सांताक्रूझ इथल्या ग्रँड हयातमधे छोटेखानी प्रदर्शन उभारलं आहे. या माध्यमातून पर्यटन स्थळांची माहिती जागतिक पातळीवर पोहचण्यात मदत होईल, असं पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.

****

ऑप्टीमिस्ट एशियन अॅण्ड ओशिनियन नौकानयन चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेचं उद्घाटन काल मुंबईत आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र,गुजरात आणि गोवा क्षेत्रिय मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल हरमिंदर सिंग कहलॉन यांच्या हस्ते झालं. आजपासून गिरगाव चौपाटी इथं या स्पर्धेला सुरुवात हो आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान सुरु असलेल्या पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या काल मुंबईत झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा २१ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १७३ धावा केल्या. भारतीय संघ प्रत्यूत्तरादाखल २० षटकात १५१ धावाच करु शकला. पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया दोन - एकनं आघाडीवर आहे.

 

//*********//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...