Friday, 23 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आल्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. या निर्णयाच्या निषेधार्थ आज विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याचं, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. जयंत पाटील यांचं नीलंबन मागे घ्यावं अशी आमची मागणी असून, त्यांना मुद्दामहून अडकवलं जात आहे, असं पवार म्हणाले. त्याचसोबत विरोधकांकडून पायऱ्यांवरच प्रतिसभागृह भरवण्यात आलं आहे.

विधानसभेत अकरा वाजता सुरू होणारं नियमित कामकाज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घातलेल्या बहिष्कारमुळे किमान तीन वेळा तहकूब करण्यात आलं.

****

प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. आठ ऑक्टोबरला नाशिक - औरंगाबाद मार्गावर खाजगी बसला झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स आणि प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केला होता.

****

भाजप आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुक्ता टिळक यांनी लोकांचे मुद्दे मांडून स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आणि महापौरपदाच्या काळात उल्लेखनीय काम केलं असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या केसरीवाडा इथं मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज वेळापत्रकानुसार निर्धारित सहा दिवस आधीच संस्थगित झालं. लोकसभेत आजचं कामकाज सुरु होताच अध्यक्ष ओम बिरला यांनी ही घोषणा केली. अधिवेशन काळात लोकसभेत १३ बैठकांच्या माध्यमातून सात विधेयकं पारित केली, तर नऊ विधेयकं माडण्यात आली, असं त्यांनी सांगितलं.

****

कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय आज सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होईल. तर येत्या मंगळवारी देशभरातल्या रुग्णालयांमध्ये कोरोना तयारीबाबत चाचणीही घेतली जाणार आहे.

दरम्यान, भारतीय विमानतळांवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातल्या किमान दोन टक्के प्रवाशांची कोविड चाचणी करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे.

****

भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसी घेतलेलेही भारत बायोटेकची लस घेऊ शकतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद नगर परिषदेअंतर्गत मंजूर असलेल्या विविध विकासकामांना देण्यात आलेली स्थगिती उठवण्यासाठी मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अनिल खोचरे यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. उस्मानाबाद नगर परिषदेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत विविध विकासकामांना स्थगिती दिली असून, ती उठवून मंजूर कामं पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी खोचरे यांनी केली आहे.

****

देवीच्या साडे तीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आजपासून मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सप्तश्रृंग गडावरील विश्वस्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी नव्या वर्षाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

भारत आणि बांग्लादेशदरम्यान ढाका इथं सुरु असलेल्या दुसर्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा दुसरा दिवस असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार बाद १६१ धावा झाल्या होत्या. ॠषभ पंत ५१, श्रेयस अय्यर २९ धावांवर खेळत होते. काल सामन्याच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशचा पहिला डाव २२७ धावांवर संपुष्टात आला.

****

उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये ही लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्लीमध्ये दाट धुकं पसरलं असून, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी काल किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचत वाढ नोंदवण्यात आली. पुढचे दोन दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरड राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...