Saturday, 4 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.02.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 February 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.

****

२०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकास तसंच आर्थिक एकत्रीकरण अशा दोन्हींचं उद्दिष्ट उत्तम प्रकारे साध्य करण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीतारामन आज मुंबईत दौऱ्यावर असून, त्यांनी अर्थसंकल्पासंदर्भात भागधारकांशी संवाद साधला. विकासावर लक्ष केंद्रीत करून सातत्याने अर्थव्यवस्थेची वाढ करणाऱ्या देशांमध्ये, जगातील एखाद दुसरा अपवाद वगळता भारतच आहे. ही वाढ अशीच चालू ठेवण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. 

***

ई-लिलावाद्वारे गव्हाची दुसरी विक्री येत्या १५ फेब्रुवारी रोजी देशभरात होणार आहे. भारतीय अन्न महामंडळाने एक आणि दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या ई-लिलावातल्या सर्व विजेत्या बोलीदारांना देशभरातल्या संबंधित डेपोमधून ताबडतोब साठा उचलण्याचे निर्देश दिले आहेत. ई-लिलावात विकला जाणारा गहू उचलल्यानंतर आणि आटा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर किमती आणखी घसरतील, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितलं. 

***

पुणे जिल्ह्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा मतदारसंघातून हेमंत रासने यांना, तर चिंचवड इथून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

***

मुंबई महानगरपालिकेचा २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आज सादर केला. मुंबईच्या सुशोभीकरणासाठी एक हजार ७२९ कोटीची अंदाजी तरतूद करण्यात आली आहे. २०३० पर्यंत मुंबई शहराला पायाभूत सुविधांनी युक्त आनंदी शहर बनवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचं चहल यांनी सांगितलं. पर्यावरणासाठी नेट झिरो ही संकल्पना अंमलात आणली असून, वातावरण कृती आराखडा तयार करण्याचं काम प्रगती पथावर आहे. तसंच स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी 'मुंबई वायू प्रदूषण कृती योजना' आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.

***

आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागासाठी माय जी ओ व्ही अॅपद्वारे एक नाद मधुर कविता अर्थात जिंगल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. समजायला सोपी आणि आपलंसं करेल अशी २५ ते ३० सेकंदांची धून या स्पर्धेसाठी अपेक्षित आहे. सर्वोत्कृष्ट जिंगलला अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका देता येतील. 

***

सध्या केवळ पुणे-अहमदनगर मार्गावर सुरु असलेल्या ‘शिवाई’ या एस टी महामंडळाच्या ई-गाड्यांची सेवा, लवकरच पुणे ते - दादर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर या मार्गांवर सुरु होणार आहे. याकरता आणखी ५० शिवाई गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असून, संबंधित आगारांकडे त्यांचं वाटप झाल्यानंतर ही सेवा सुरु होणार आहे. तसंच एस टी महामंडळाच्या पुणे विभागात १५ वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या गाड्यांचा वापर लवकरच बंद केला जाणार असून, त्यांच्या जागी नव्या शिवाई गाड्या दाखल होणार आहेत.

***

औरंगाबाद महापालिकेने व्यावसायिक नळांच्या अधिकच्या पाणी वापरास लगाम लावण्यासाठी मिटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्यावसायिक मालमत्ताधारकांच्या प्रभाग कार्यालयनिहाय याद्या तयार करून तातडीने सादर करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे. येत्या आठ दिवसात व्यावसायिक नळांना मिटर बसवण्याचं काम सुरू केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

***

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय एकात्मता यात्रा आज औरंगाबाद इथं संध्याकाळी पाच वाजता दाखल होणार आहे. ईशान्य भारतातील तरुण आणि इतर राज्यांमधील बंधुत्वाची भावना वाढवण्याच्या उद्देशानं या अंतरराज्य छात्र जीवनदर्शन यात्रेचं आयोजन करण्यात येतं. औरंगाबाद शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ही यात्रा दाखल होणार असून तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

***

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद पंचायत समितीमधल्या अशोक खेडकर या कृषी अधिकाऱ्यास चार हजार रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं. कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता आणि कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षकांना पाठवण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

***

नांदेड जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातल्या शुन्य ते १८ वर्षे वयापर्यंतची बालकं आणि किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नियोजन केलं आहे. या मोहिमेसाठी सुमारे ३०० वैद्यकीय तपासणी पथकं तयार करण्यात आली असून, उपलब्ध मनुष्यबळ आणि जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा-सुविधा यांचा यात अंर्तभाव करण्यात आला असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.

 

//**********//

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...