Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० फेब्रुवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
राज्यात
आगामी आर्थिक वर्षात रेल्वे विकासासाठी साडे १३ हजार कोटी रुपये निधी जारी.
·
निवडणूक
आयोग बरखास्त करून निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमण्याची उद्धव ठाकरे यांची
मागणी.
·
भाजप
आणि शिंदे गटाचं लोकसभेसाठी समीकरण योग्य वेळी जाहीर करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस.
आणि
·
राज्यात
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरवात.
****
रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात रेल्वेविकासासाठी
सुमारे १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील
१२३ रेल्वे स्थानकांचा अमृत स्टेशन म्हणून तर विविध स्थानकांचा ४ हजार ९६२ कोटी रुपये
खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. औरंगाबाद तसंच जालना रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी
अनुक्रमे ३९० आणि १७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अमृत स्थानकांमध्ये औरंगाबाद, जालना, लातूर, हिंगोली,
नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि अहमदनगरसह भोकर, गंगाखेड, धर्माबाद, हिमायत नगर, मानवत
रोड, मुदखेड, परळी वैजनाथ, परतूर, पूर्णा, रोटेगाव, सेलू, उमरी, किनवट आदी स्थानकांचा
समावेश आहे. या योजनेत रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने
अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये प्रवाशांसह व्यावसायिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून
दिल्या जाणार आहेत. सर्व श्रेणीच्या स्थानकांवर सुमारे ६०० मीटर लांबीचे उच्चस्तरीय
फलाटही तयार केले जाणार आहेत.
****
निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणूक प्रक्रियेने निवडणूक
आयुक्त नेमण्यात यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते
आज मुंबईत मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलत होते. हा निकाल आपल्याला अमान्य
असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं. पक्षनाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायचं असेल, तर आमच्याकडून
शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र का लिहून घेतली, असा प्रश्न ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला
केला आहे. ते म्हणाले –
निवडणूक
आयोगाने आम्हाला शपथपत्र सादर करायला सांगितली. प्रतिज्ञापत्र मग सदस्य संख्या दाखवा.
आता त्याच्यामध्ये चार-सहा महिने गेले. शंभर रूपयांच्या स्टँप पेपरवर आपण ती शपथपत्र
दाखल केली. त्यांनी सांगितलेल्या फॉरमॅटमध्ये आम्ही ती दाखल केली. आता एवढा लाखोंनी
आम्ही सगळा हा उपद्व्याप केल्यानंतर अचानक जर का निवडणूक आयोग असं म्हणायला लागला
की ते काही चालणार नाही. तुमचे जे निवडून आलेले होते त्यांच्या संख्येनुसार हे पक्ष
कोणाचा ठरवला जाईल. जर का तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला एवढी मेहनत करायला
का लावली? का माझ्या शिवसैनिकांना पदरमोड करायला सांगितली? का शंभर रूपयांच्या स्टँप
पेपरवरती तुम्ही आमची प्रतिज्ञापत्र घेतली?
****
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण निवडणूक चिन्ह
शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गटानं
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र आजच्या कामकाजाच्या यादीत ठाकरे गटाच्या
याचिकेचा समावेश नसून, उद्याच्या यादीत समावेशासाठी ठाकरे गटाला पुन्हा विनंती करावी
लागणार आहे.
दरम्यान, राज्यातल्या संत्तासंघर्षासंदर्भात ठाकरे आणि
शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवरदेखील उद्यापासून सर्वोच्च न्यायालयाच्या
पाच सदस्यीय घटनापीठापुढे पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गटाच्या १६ सदस्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यपालांनी
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करणं, विधानसभा अध्यक्षांची
निवड, शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड अशा ठाकरे आणि शिंदे गटानं एकमेकांविरुद्ध
दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांचा यात समावेश आहे.
****
पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटानं
आज विधीमंडळात शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह
काही आमदार यावेळी उपस्थित होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भाजप आणि शिंदे गटाचं लोकसभेसाठी समीकरण ठरलेलं असून,
योग्य वेळी ते जाहीर करू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते
आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएतून खासदार निवडून येतील हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे
कोणीही संभ्रम निर्माण करू नये, असं फडणवीस यांनी नमूद केलं.
****
दरम्यान, कोल्हापूर इथल्या कणेरी मठात ‘पंचमहाभूत बोध’
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहभागी
झाले. यावेळी अवघ्या २० मिनिटांमध्ये ५० कलाकारांच्या सहभागातून तयार केलेल्या कलाकृतीतून
पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
****
राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंह यांची
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गगराणी
हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तर विकास खरगे हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान
सचिव म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन -मित्रा या
राज्य सरकारच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह
परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला
उद्यापासून सुरुवात होत आहे. कोविड नंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत
आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमधून दोन लाख ६० हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा
देणार आहेत. यंदाच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा
निर्णय मंडळाने रद्द केला असून, परीक्षेच्या नियोजित वेळेनंतर विद्यार्थ्यांना अतिरिक्त
दहा मिनिटं देण्यात येणार आहेत. परीक्षेचं साहित्य केंद्रांना वितरीत झालं असून, तणावमुक्त
आणि कॉपीमुक्त परीक्षेला विद्यार्थ्यांनी सामोरं जावं, असं आवाहन शिक्षण मंडळाचे औरंगाबाद
विभागीय सचिव व्ही व्ही जोशी यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद इथं उद्यापासून देशातल्या पश्चिम विभागातल्या
विद्यापीठांच्या कुलगुरुंची परिषद होणार आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज या
संस्थेच्या माध्यमातून आयोजित या दोन दिवसीय परिषेदेचं यजमानपद यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाला मिळालं आहे. शहरातल्या रामा इंटरनॅशनल इथं ही परिषद होणार असल्याची
माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. या परिषदेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान
आणि गुजरात राज्यातील जवळपास १५० विद्यापीठांचे कुलगुरु सहभागी होणार आहेत.
****
मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांना लिहिलेले एक बनावट पत्र मिळाल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी
नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली.
आपल्या मंत्रिपदाच्या काळातील पत्रांच्या आधारे बनावट पत्र तयार केले जात असल्याची
तक्रार चव्हाण यांनी यापूर्वीच नांदेड जिल्हा पोलिसांत केली आहे. त्या प्रकरणाची ३१
जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे.
****
छत्तीसगड राज्यात महाराष्ट्र सीमेलगत नक्षलवाद्यांनी केलेल्या
हल्ल्यात पोलिस दलातील दोन सैनिक हुतात्मा झाले असून इतर एक जण जखमी झाला आहे. आज सकाळी
हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला असून जंगलात शोधमोहीम
सुरु करण्यात आली आहे.
****
राज्यभरातल्या विद्यापीठातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी
आजपासून बेमुदत संप आंदोलनाला सुरुवात केली. औरंगाबाद, धुळे, सोलापूर इथल्या कर्मचाऱ्यांनी
आंदोलनात सहभाग घेतला आहे. राज्यातली १३ विद्यापीठं आणि अनुदानित महाविद्यालयांतल्या
कर्मचाऱ्यांना सापत्न वागूणक दिली जात असल्याच्या विरोधात हा बेमुदत संप करण्याचा निर्धार
कर्मचारी महासंघानं केला असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर
यांनी दिली आहे.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी - ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा साखळी सामना आयर्लंडसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार
संध्याकाळी साडे सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेत भारत आतापर्यंत झालेल्या
तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून ग्रूप बी मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर
कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी के. एल. राहुल तसंच जसप्रीत
बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. राहुलला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून
टाकण्यात आलं आहे. इंदूर आणि अहमदाबाद इथं हे सामने खेळले जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment