आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ मार्च २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
युवा उत्सव-इंडिया@2047 ला आजपासून
प्रारंभ होत आहे. केंद्रीय युवा व्यवहार
आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते आज या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. देशभरातल्या १२ ठिकाणी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यात
महाराष्ट्रातल्या जळगावचा समावेश असून, राज्यातल्या १६ जिल्ह्यात
आजपासून ३१ मार्चपर्यंत या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन केलं जाणार आहे.
***
मध्यप्रदेशमध्ये भोपाळ इथं आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म परिषदेचं उद्घाटन काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
हस्ते झालं. धर्म - धम्माची भावना भारताच्या अंर्तमनावर कोरली असून, धर्माच्या आधारावरच मानवतावादाचा पाया रचला
गेला असल्याचं, राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं.
***
जनौषधीचा प्रसार करण्यासाठी आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत
काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि रेल्वेमंत्री
अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत जन औषधी रेल्वे गाडीला हिरवा झेंडा
दाखवून रवाना केलं. नऊ हजाराहून अधिक केंद्रांद्वारे
परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेल्या जेनेरिक औषधांबद्दल या रेल्वेच्या माध्यमातून
जनजागृती करण्यात येत आहे. पुणे ते दानापूर ही चार राज्यांतून प्रवास करणारी जनऔषधी रेल्वे देखील काल रवाना झाली.
***
देशातल्या प्रमुख गहू उत्पादक राज्यांमधली गव्हाच्या पिकाची स्थिती सामान्य असून, पिकावर उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं, सरकारनं स्पष्ट केलं आहे. गव्हाच्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी
आणि शेतकरी कल्याण विभागानं गठीत केलेल्या समितीनं आपल्या बैठकीत हे सर्वेक्षण सादर
केलं.
***
धाराशिव
जिल्ह्यात आजपासून १०
मार्च दरम्यान गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. नऊ महिने ते पाच
वर्ष वयोगटातल्या बालकांना घरोघरी जाऊन ही लस दिली जाणार आहे.
***
मराठवाड्यात पुढच्या काही दिवसांत अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात
आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज आणि उद्या, जालना तसंच बीड
जिल्ह्यात पाच, सहा आणि सात तारखेला, तर परभणी जिल्ह्यात सात तारखेला पावसाची शक्यता
आहे.
//************//
No comments:
Post a Comment