Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 March
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०५ मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****`
- भावी पिढ्यांसाठी
जलसुरक्षा आणि जलव्यवस्थेसंदर्भात प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन, बीडमधल्या नांदूर
हवेली ग्रामपंचायतीला स्वच्छ सुजल शक्ति सन्मान पुरस्कारानं गौरव
- राज्यात ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी’ योजनेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
- औरंगाबादचं छत्रपती
संभाजीनगर नामकरण केल्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज जलील यांचं साखळी उपोषण सुरु
- अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामकरण करण्याचा
प्रस्ताव सरकारकडे - राधाकृष्ण विखेपाटील
- बुलडाण्याचं जिजाऊ नगर नामकरण करण्याची सर्वपक्षीय मागणी
- सहा आकडी संकेतांक
नसलेल्या हॉलमार्क सोन्याचे दागिन्याच्या विक्रीवर
एप्रिल महिन्यापासून बंदी
- छत्रपती संभाजीनगर शहर नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या गतीबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त
आणि
· महिला क्रिकेट प्रिमिअर लीगमध्ये पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सवर मुंबई
इंडियन्सचा १४३ धावांनी विजय
****
भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थेसंदर्भात प्रयत्न करण्याचं आवाहन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण, जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल मिशनच्या स्वच्छ सुजल शक्ती
सन्मान २०२३ चं वितरण काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीण भारतात शाळेत जाणाऱ्या मुलींचा वेळ पाणी
आणण्यात जात होता, आता
मात्र हे चित्र बदलत चालल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात जलस्रोतांची
शाश्वतता या संकल्पनेसह जलशक्ती अभियान - पावसाचे पाणी साठवा या मोहिमेचं
उद्घाटनही राष्ट्रपतींनी केलं. जलशक्ती से नारी शक्ती या विषयावरची ध्वनिचित्रफीत
आणि एका टपाल तिकीटाचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. जलशक्ती
मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मानही या
कार्यक्रमात करण्यात आला.
यामध्ये बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्राम पंचायतीला नळाद्वारे नियमित
स्वच्छ पाणी पुरवठा, त्याची
देखभाल आणि व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान २०२३’ देऊन
सन्मानित करण्यात आलं. नांदूर हवेलीच्या सरपंच शेख मन्नाबी मुज़फ्फर पटेल यांनी हा
पुरस्कार स्वीकारला.
या गावामध्ये १०० टक्के नळ जोडणी असून गावातल्या प्रत्येक घरात नळ
असल्याचं घोषित झालं आहे. गावातील सर्व
भागात समान दाबाने पाणी मिळतं, त्यासाठी
जलसुरक्षकाना प्रशिक्षण दिलं असून वारंवार याबाबत माहिती घेतली जाते असं सरपंच
पटेल यांनी सांगितलं. पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत गावात पाणी तपासणी साठीची ‘एफ टी के किट उपलब्ध आहे. त्याद्वारे, पाण्याची नियमित रासायनिक आणि अनुजैविक तपासणी केली जाते.
तसंच, पाण्याचं नियमित क्लोरीनेशन
केलं जातं, अशी माहिती पटेल यांनी
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.
****
देशाचा विकास, वारसा
आणि मूल्य संवर्धनात युवकांनी योगदान देण्याचं आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा
मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांनी
केलं आहे. युवा उत्सव-इंडिया@टू
थाउजंड फोर्टी सेवन चं काल पंजाबमधल्या रोपड इथं ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
झालं, त्यावेळी ते बोलत होते.
देशभरात दीडशे जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये ३१ मार्चपर्यंत युवा उत्सव
आयोजित होणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातल्या १६ जिल्ह्यात ३१
मार्चपर्यंत या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन केलं जाणार आहे.
याअंतर्गत काल जळगाव इथं खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते या युवा उत्सवचं
उद्घाटन झालं. या उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या पंचप्राण वर
विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात मुख्यत्वे गुलामी की हर सोच से मुक्ती यावर
चित्रकला स्पर्धा, कविता
लेखन स्पर्धा, भाषण स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र स्पर्धा आदींचा समावेश आहे. विजयी स्पर्धकांना
खासदार पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अंत्योदय साधण्यासाठी प्रशासनाचा चेहरा मानवी
असण्याची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत काल
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार, ग्रामीण
रोजगार हमी योजना महाराष्ट्र आणि शासनाच्या १७ विभागांच्या योजनांचं अभिसरण करून
तयार करण्यात आलेल्या ‘सुविधा
संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. राज्यात आज ६४ लाख कामगार २७ हजार ग्राम पंचायतींच्या माध्यमातून
काम करत असून त्यांच्या माध्यमातून ८ लाखांपेक्षा अधिक शाश्वत संपदा निर्माण होत
असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मनरेगा सुविधा संपन्न कुटुंब
आणि ग्रामसमृद्धी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासनानं
करावं, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. नोकरी करण्यापेक्षा शेती केली तर मोठा लाभ होईल , 'काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे हात तयार करा' असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
शिक्षक, पदवीधर मतदार
संघातील निवडणुकींसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकत्याच पार
पडलेल्या पुण्यातील कसबा -पिंपरी चिचवडच्या
पोटनिवडणुकींचे निकाल बदलाचे संकेत दाखवतात. आताच ठोस निष्कर्ष काढणं योग्य नसलं
तरी आगामी निवडणुकांमध्ये बदल आणखी प्रकर्षानं पहायला मिळेल असं राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. बारामती इथं वार्ताहरांशी काल ते बोलत होते.
महाविकास आघाडीला मिळत असलेलं यश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँडमध्ये निवडून आलेल्या १२ पैकी ७ जागा, निवडणूक आयोगाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, कांद्याचे पडलेले दर अश्या मुद्द्यांवर पवार यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावर
टीका केली. केरळ, तामिळनाडू
या राज्यांमध्ये भाजप सत्तेवर येण्याची शक्यता नाही आणि दिल्ली, आंध्र प्रदेश, हैद्राबाद, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये
भाजप नाही असं शरद पवार म्हणाले.
****
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केल्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज
जलील यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी
कार्यालयाबाहेर हे उपोषण करण्यात येत आहे. औरंगाबादचं नामांतर करण्याऐवजी नवीन शहर
वसवून त्याला छत्रपती संभाजीनगर नाव द्यावं, असं आवाहन खासदार जलील यांनी केलं. ते म्हणाले…
आमचं एकच म्हणणं
आहे की औरंगाबादचं नाव होतं ते औरंगाबादच ठेवायला पाहिजे. आणि समजा सरकारला असं वाटत
असेल नाही कोणाचं नाव द्यायचं आहे, तर एक नवीन शहर उभारा. आणि त्या शहराला तुम्ही तुम्हाला
जे नाव द्यायचं ते द्या, आमचं काही म्हणणं नसणार. तुम्ही एक चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं
शहर उभारा आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या.
याच साखळी उपोषणात काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन घोषणाबाजी केली.
मात्र हा सर्व प्रकार आयोजकांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणाला फोटोसह
उपोषणास्थळावरून बाहेर काढलं. आंदोलनात अडसर
आणण्यासाठी काही लोकांनी हा प्रकार केल्याची प्रतिक्रिया खासदार जलील यांनी
व्यक्त केली.
****
अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण करण्याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव सरकारकडे
असून त्याबाबतचा निर्णय केला जाईल, असं
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल सोलापूर इथं
वार्ताहरांशी बोलत होते. जिल्ह्याचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं असा
प्रस्ताव असून त्याला सर्वांचाच पाठिंबा आहे, अहिल्यादेवी यांचं जन्मगाव नगर जिल्ह्यात आहे. त्यांचं नाव जिल्ह्याला देणं
भूषणावहच आहे असं विखे पाटील यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्याचं नाव जिजाऊ नगर करावं अशी मागणी करण्यात येत आहे. राजमाता
जिजाऊ यांचं जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेडराजा इथं काल सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीनं
तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाझेर काझी, शिवसेनेचे छगन मेहेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते
****
गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष
न्यायालयात १५ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. वर्ष २००२ मध्ये घडलेल्या या
प्रकरणातले, हर्षद सोलंकी आणि मफत गोहील
हे २ आरोपी गेल्या १० वर्षांपासून कारागृहात आहेत. १३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांना
न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. या दोन आरोपींबाबत निर्णय येण्याची शक्यता
होती. मात्र निकालाचं वाचन पूर्ण न झाल्यानं आता १५ मार्चला पुढील सुनावणी होणार
आहे.
****
सहा आकडी संकेतांक नसलेल्या हॉलमार्क सोन्याचे दागिने आणि सोन्याची इतर
कलाकुसर यांच्या विक्रीवर पुढील एप्रिल महिन्यापासून बंदी आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जारी केलेल्या
प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नवीन
पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या गतीबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नाराजी
व्यक्त केली आहे. आतापर्यंत या योजनेचं केवळ २० टक्के काम
पूर्ण झालं आहे. शहराला पाणीपुरवठा
करण्यासाठीची नवीन पाणीपुरवठा योजना, महामेट्रो प्रकल्प, गॅसवाहिनी
आदी महत्त्वाच्या योजनांबाबत मंत्री डॉ. कराड यांनी काल आढावा बैठक घेतली.
शहरासाठीचे हे तीनही महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती
कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देशही डॉ. कराड यांनी या बैठकीत दिले. राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी तसंच संबंधित प्रकल्पांचे ठेकेदार यावेळी
उपस्थित होते.
****
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत धाराशिव जिल्ह्याकडून "शैक्षणिक
क्षेत्रात करण्यात आलेल्या अभिनंदनीय कामगिरीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे
यांना अपर सचिव सुनिल शिंदे आणि अवर मुख्य सचिव तसंच विकास आयुक्त डॉ. राजगोपाल
देवरा यांच्याकडून प्रशस्ती पत्र देण्यात आलं आहे. नीति आयोगाच्या मिशन संचालकांनी
मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, नोव्हेंबर
महिन्यात धाराशिव जिल्ह्यानं "शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान मिळवलं असून
तीन कोटी रुपये अतिरिक्त निधी मिळण्यास धाराशिव जिल्हा पात्र ठरल्याचं म्हटलं आहे.
****
डिजिटल युगात महिला शिक्षकांनी विविध विषयात पारंगत असण्याची आवश्यकता नांदेड
जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी
व्यक्त केली आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण
विभागाच्या वतीनं काल नांदेड इथं डिजिटल एज्युकेशन फॉर वुमेन या कार्यक्रमात त्या
बोलत होत्या. वाडी-तांड्यावर विद्यार्थ्यांना शिकवताना अनेक आव्हानं तसंच अडचणी
आहेत ,मात्र त्या अडचणींवर मात करून
विद्यार्थी आणि पालकांमध्ये कौशल्याची छाप पाडणारीच शिक्षिका पुढे जाऊ शकते, असा विश्वासही वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केला.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त काल जालना जिल्हा कृषी
विभागाच्या वतीनं शहरातून मिलेट दौड काढण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय
ते गांधी चमन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह जिल्हा
प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी
आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. मानवी आहारात तृणधान्याचा समावेश
अत्यंत महत्त्वाचा असून, या
पिकांचं कमी होत असलेलं क्षेत्र वाढवणं गरजेचं असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी
रणदिवे यांनी रॅलीच्या समारोप प्रसंगी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं.
****
नांदेड इथं आयोजित कुसुम महोत्सवाची सांगता आदिशक्ती कलाविष्कार
नृत्य-संगीताचा जागर आणि विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या
महिलांचा नवदुर्गां पुरस्कार देऊन करण्यात आली. प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य
करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रीता माहूरे, शकीला शेख, डॉ.
ललिता मनूरकर यांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
****
महिला क्रिकेट प्रिमिअर लीगला कालपासून नवी मुंबईत सुरूवात झाली. या स्पर्धेत
एकूण ५ संघ खेळणार आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, मुंबई इंडियन्सचं, बेथ मुनीला गुजरात जायंट्सचं, स्मृती
मंधाना रॉयल चॅलेजर्स बंगलोर संघाचं, ऑस्ट्रेलियाची यशस्वी कर्णधार मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सचं, तर ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ऍलिसा हिली युपी वॉरिअर्सचं
नेतृत्व करत आहे.
या स्पर्धेत काल पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघानं गुजरात जायंट्स
चा १४३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं २० षटकात ५
बाद २०७ अशी धावसंख्या उभारली. २०८ धावांचं लक्ष्य घेऊन फलंदाजी करणारा गुजरात
जायंट्सचा संघ १५ षटक आणि एका चेंडूत ९ बाद ६४ धावाच करु शकला.
****
ज्येष्ठ साहित्यिक तसंच आंबेडकर
साहित्य समीक्षक हरीश खंडेराव यांचं काल ठाण्यात
वृद्धपकाळाने निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल
अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई आकाशवाणीत उच्च अधिकारी असलेले खंडेराव यांचं
महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद इथल्या मिलिंद महाविद्यालयात झालं होतं.
महाविद्यालयात त्यांना मिलिंद कुमार म्हणून गौरवण्यात आलं होतं. खंडेराव यांच्या
अनेक साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग रायासिंग घुनावत यांना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दहा हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहात पकडलं. एका
व्यक्तीकडून तक्रारदाराचे पैसे काढून
देण्यासाठी आणि तक्रारदाराला मदत करण्यासाठी पंचासमक्ष २० हजार रुपयेची लाचेची
मागणी करून १० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेतांना काल ही कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment