Thursday, 23 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक : 23.03.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३  मार्च २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा स्मृतिदिन आज हुतात्मा दिन म्हणून पाळला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अतुलनीय योगदान देणार्या या महान नायकांचं बलिदान, देशवासियांच्या कायम स्मरणात राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात, विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात सातत्यानं व्यत्यय येत असल्यामुळे, राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीही सभागृहाचं कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचं आवाहन करण्यासाठी बैठक बोलावली होती.

****

जी 20 देशांची दोन दिवसांची संशोधन आणि नवोन्मेश प्रोत्साहन परिषद आजपासून आसाममधल्या दिब्रुगड इथं सुरू होणार आहे. शाश्वत आणि चक्रीय जैव-अर्थव्यवस्था निर्माण करण्यासंदर्भात या परिषदेत चर्चा होणार आहे.

दरम्यान, जी 20 देशांच्या शाश्वत आर्थिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीची सांगता आज राजस्थानातल्या उदयपूरमध्ये होत आहे.

****

भारतीय सैन्यदलाने सैनिकांना दिल्या जाणाऱ्या शिध्यामध्ये भरड धान्याचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे तब्बल पन्नास वर्षांनंतर, सैनिकांना देशी आणि पारंपारिक धान्यांचा पुरवठा सुनिश्चित होईल.

****

जालना इथं नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्यातर्फे उर्दू शायर राय हरिश्यचंद्र साहनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा दु:खी राज्य काव्य पुरस्कार लेखक, कवी, पत्रकार विजय चोरमारे यांना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सर्व क्षेत्रात कवितेची रसमिसळ व्हावी अशी अपेक्षा मंजुळे यांनी यावेळी केलेल्या भाषणात व्यक्त केली.

****

महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारताच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करत चार पदकं निश्चित केली आहेत. लवलीना बोर्गोहेन, नितू घनघास, निखत झरीन आणि स्विटी बोरा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धीवर मात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...