Sunday, 2 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 April 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भाजप शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत.  दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या समर्थनगर भागातून आज सावरकर गौरव यात्रेला सुरुवात हो आहे. ही यात्रा मराठवाड्यातल्या सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामधून प्रवास करणार आहे.

***

छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी काल या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, या सभेल मोठा जनसमुदाय येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

***

केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या स्थापनेला उद्या ६० वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या विभागाच्या हीरक महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. सीबीआय मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस पदक आणि सर्वोत्तम तपास अधिकारी पदक देऊन पुरस्कारार्थी कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते याप्रसंगी गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या पुणे आणि नागपूर इथं उभारण्यात आलेल्या सीबीआय कार्यालय परिसरांचं उद्घाटनही करण्यात येईल. पंतप्रधान मोदी, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या हीरक महोत्सवाच्या अनुषंगानं डाक तिकीट आणि स्मारक नाण्याचं अनावरण देखील करणार असून सीबीआयच्या ट्वीटर खात्याचा प्रारंभ ही ते करतील.

***

जी २० अंतर्गत उर्जा रुपांतरण कार्य समुहाची दुसरी बैठक आजपासून गुजरातच्या गांधीनगर इथे सुरु होत आहे. या बैठकीत जी २० देशातले, विशेष आमंत्रित देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय संघटनांचे १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या बैठकीत उर्जेच्या प्राथमिक क्षेत्रांवर सखोल चर्चा होणार आहे. या कार्यसमुहाची पहिली बैठक या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाली. जी २० च्या सदस्य देशांनी या बैठकीत उर्जा क्षेत्रातल्या तांत्रिक त्रुटींवर समाधान, उर्जा हस्तांतरणासाठी कमी संसाधनात आर्थिक उपलब्धतता, उर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण आपूर्ती, उर्जा रुपांतरणाला प्रोत्साहन आदी ६ प्राथमिक क्षेत्र निश्चित केले. पहिल्या बैठकीतल्या या प्रमुख निष्कर्षांवर आजपासून सुरु होत असलेल्या बैठकीत पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे.

***

गेल्या २४ तासात देशभरात २ हजार ९९४ नवे कोरोना विषाणुबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात नवी दिल्लीतल्या ४१६ रुग्णांचा समावेश आहे. देशात सध्या १६ हजार ३५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या आजारातून बरे होण्याचा राष्ट्रीय दर सध्या ९८ पूर्णांक ७७ टक्के आहे.

***

नंदुरबार जिल्ह्यातील धडगावात गांजाची शेती करणाऱ्यावर पोलिसांनी काल धडक कारवाई केली. धडगाव तालुक्यातील निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका आमराईजवळ रुपजा सिंग पाडवी गांजाची बेकायदेशीर ४ हजार ७९० झाडं वापरत असल्याचं आढळलं. या कारवाईत ४५ लाख ३९ हजार रुपये किमतीचा ६५० किलो गांजा पोलीसांनी जप्त केला. पाडवी याच्यावर नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

***

माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं आज गुजरातमध्ये जामनगर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. दुर्राणी यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले होते. १९६९ साली प्रदर्शित झालेला एक मासूम तसंच १९७३ साली प्रदर्शित झालेल्या चरित्र या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दुर्राणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

***

इंडियन प्रीमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज २ सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी साडे ३ वाजता हैद्राबाद इथे सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल तर दुसरा सामना सायंकाळी बेंगळुरु इथं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं दिल्ली कॅपिटल्सचा तर पंजाब किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे.

 

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...