Tuesday, 23 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 23.05.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 May 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

देशाच्या बहुतांश भागात सध्या तीव्र उष्ण हवामान आहे आणि काही ठिकाणी पारा ४४ अंशांच्या पुढे पोहचला आहे. राजधानी नवी दिल्लीत काल ४६ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं.

आजही दिल्लीसह देशभरात कालप्रमाणेच उष्ण झळा जाणवतील असं भारतीय हवामान विज्ञान केंद्रानं म्हटलं आहे.

****

 “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे ” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या काल झालेल्या इडी चौकशीनंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते. “महाविकास आघाडीत एकजूट राहील आणि ती कायम असावी” अशीच आमची भूमिका असल्याचंही अजित पवार यांनी  यावेळी सांगितलं. 

****

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजाजवळ आज पहाटे एसटी बस आणि ट्रक  अपघातातल्या मृतांची संख्या ८ वर पोहचली आहे. या अपघातात एकूण १३ प्रवासी जखमी झाले. ही बस छत्रपती संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. जखमींवर सिंदखेडराजा इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

****

हिंगोली जिल्ह्यातले प्रगतीशील शेतकरी नारायणराव पतंगे यांचं काल अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर आज कळमनुरी तालुक्यात मौजे कवडी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात  मळेवाड इथं प्रशासन आपल्या दारी अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जात तहसीलदार अरुण उंडे यांनी दाखल्यांचं वितरण केलं आहे. असा उपक्रम करणारी मळेवाड-कोंडुरे  ही पहिली ग्रामपंचायत ठरली असल्याचं उपसरपंच हेमंत मराठे यांनी सांगितलं. राज्य सरकारनं संपूर्ण राज्यभर प्रशासन आपल्या दारी अभियान सुरू केलं आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांनी या अभियानांतर्गत 'दाखला आपल्या दारी' या  शिबिराचं आयोजन केलं. 

****

पुरातन वाडे किंवा कला हरवू नयेत, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव न पडता संस्कृतीची जपणूक व्हावी या दृष्टीनं सांस्कृतिक धोरणासाठी, पुरक माहितीचा अहवाल ऑक्टोबर महिन्यात शासनाला सादर करण्यात येईल, अशी माहिती शासनाच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे. 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी राज्य शासनाने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समिती गठीत केली आहे.  १२ अशासकीय सदस्यांच्या या समितीच्या नाशिकमधल्या बैठकीनंतर पत्रकारांशी काल ते बोलत होते. दहा वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून ही समिती काम करत आहे. उपसमित्यांमध्ये त्या-त्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश असून ही समिती राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन तिथल्या संघटना, कार्यकर्ते यांचीशी संवाद साधून त्यांच्या समस्या तसंच प्रश्न जाणून घेत असल्याची माहिती डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी दिली.

****

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. नवी जागतिक क्रमवारी काल  जाहीर झाली. त्यात नीरजने १ हजार ४५५ गुण मिळवले असून त्यानं ग्रॅनाडाचा जगज्जेता अँडरसन पीटर्स याच्यापेक्षा २२ गुणांची आघाडी घेतली आहे. जागतिक क्रीडास्पर्धेत पहिलं स्थान मिळवणारा तो  पहिला भारतीय ठरला आहे.

****

अकोला जिल्ह्यात  आजपासून पर्यावरणपूरक  जीवन पद्धती अभियान राबवण्यात येणार आहे. येत्या २८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या अभियानात पर्यावरण पूरक जीवन पद्धती संदर्भात जिल्हाभरात  जनजागृती करण्यात येणार आहे. 

पर्यावरण ऱ्हासाची किंमत मानवाला सर्वच क्षेत्रात चुकवावी लागत आहे. हवामान बदल, अन्नधान्याचे पोषणमूल्य घटक, उत्पादन खर्च वाढ तसंच जमीन आणि पाणी यांचं प्रदूषण असे दुष्परिणाम मानवाला आणि प्राण्यांनाही भोगावे लागत आहेत. शेतीत पर्यावरण- पूरक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन चांगलं येतं आणि सोबतच पर्यावरणाचं रक्षणही होतं असं मत कृषी तज्ज्ञांनी या कार्यशाळेत व्यक्त केलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...