Tuesday, 23 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 23.05.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

देशातील बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचं काम आजपासून सुरू झालं आहे. जमा होणाऱ्या या नोटांचा लेखाजोखा सर्व बँकांनी ठेवावा, असे निर्देश काल भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

 देशभरातील बँकांच्या खात्यात दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. गेल्या १९ तारखेला रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबतची घोषणा केली होती.

***

जी - ट्वेंटी अंतर्गत पर्यावरण आणि जलवायू कार्यगटाची तिसरी बैठक आज मुंबईत होत आहे. तर आपत्ती काळातल्या जोखीमा कमी करण्यासाठी कार्यरत कार्यगटाची दुसरी बैठकही मुंबईत होत आहे  तसंच पर्यटन कार्यसमुहाची तिसरी बैठक आज जम्मू काश्मिरच्या श्रीनगर इथं होत आहे.

***

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर काल रात्री एक ट्र्क आणि प्रवासी वाहनात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला; तर सात जण गंभीर जखमी झाले. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. 

***

बीड जिल्ह्यात आजपासून दोन जून या कालावधीत मोफत दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे, या शिबिरात तपासणीनंतर दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार सुमारे पाच हजार दिव्यांगाना कृत्रिम अवयव आणि साधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

***

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष अजय कुमार हे आज रात्री दोन दिवसांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी ते सोनपेठ तालुक्यात भाऊचा तांडा इथं जाऊन मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांची भेट घेतील. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांबाबत ते प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.

***

शासनानं दिलल्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात बांबूची लागवड करण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी काल बैठक घेतली. जिल्ह्यात बांबू लागवड कुठं - कुठं करता येईल, याचं नियोजन करण्यासाठी, संबंधित विभागांनी संयुक्तपणे संशोधन करावं, तसंच जिल्हा परिषदेच्या कोणकोणत्या शाळांना बांबूचं नैसर्गिक कुंपण करता येईल, याबाबतही जिल्हा परिषदेकडून आढावा घेतला जावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिले.

***


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...