आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जूलै २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी इथल्या बचाव कार्याला, आज सकाळी पुन्हा सुरूवात झाली. मात्र पाऊस, धुके आणि चिखलामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या दरड दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून, आणखी शंभर गावकरी बेपत्ता आहेत. आतापर्यंत १०३ जणांना वाचवण्यात आलं आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात आजही पाऊस सुरु असून, रेड अलर्ट देण्यात आला आहे.
***
नांदेड जिल्ह्यात देगलूर आणि बिलोली तालुक्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे खरीप पिकं पाण्यात बुडाली असून, नदीकाठच्या शेतजमीनीवरची सुपिक माती खरडली गेली आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.
हवामान विभागानं दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यामुळे ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि नांदेड या जिल्ह्यातल्या शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
***
भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रानिल विक्रमसिंघे यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान परस्पर हिताच्या विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. तसंच विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत.
***
मध्य प्रदेशात इंदूर इथं होत असलेल्या जी - 20 देशांच्या कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीला, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. काल या बैठकीत, जागतिक स्तरावरील कौशल्य तफावत भरुन काढण्यासाठी संयुक्त पावलं उचलण्यावर, तसंच सामाजिक सुरक्षा, कामगार सन्मान आणि कल्याणासाठी शाश्वत निधी देण्याविषयी सहमती झाली.
***
रजास्थानची राजधानी जयपूरमध्ये आज भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता चार पूर्णांक चार इतकी नोंदवली गेली. यामुळे कुठल्याही जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
//***********//
No comments:
Post a Comment