Tuesday, 2 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 02.04.2024, रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date – 02 April 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.

****

·      बँकांशी निगडित आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी धोरण निश्चितीची गरज-रिजर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग

·      व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात तर राज्यात वीजेचे दहा टक्के वाढीव दर लागू

आणि

·      लातूर जिल्ह्यात मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडण्याची मोहिम

****

देशातल्या सर्व नागरिकांना बँकेतले आर्थिक व्यवहार सोप्या पद्धतीनं करता यावे यासाठी धोरण निश्चित करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयच्या स्थापनेला ९० ‍‍‍वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, काल मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गव्हर्नर शक्तिकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. भारताची बँक व्यवस्था जगात आदर्श मानली जात असल्याचं सांगत, आरबीआयमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शाश्वत आणि गतिमान आर्थिक प्रगतीसाठी आरबीआयला सतत प्रयत्नरत राहावं लागणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी नव्वद रुपयांच्या विशेष नाण्याचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. परवा चार तारखेपर्यंत या टप्प्यासाठी अर्ज भरता येणार आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी काल शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अपक्ष उमेदवार गोविंद देशमुख यांनी चार, तर अपक्ष उमेदवार आप्पासाहेब कदम यांनी देखील काल दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

****

हिंगोली लोकसभा मतदारसंघात काल अभिनव भारत जनसेवा पक्षाचे रवि जाधव यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. हिंगोली मतदारसंघात आतापर्यंत दोन अर्ज दाखल झाले आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काल दोन अर्ज दाखल झाले. काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. यवतमाळ-वाशिम तसंच बुलडाणा मतदार संघात काल प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं, आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. अकोला इथून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

आगामी दोन ते अडीच महिन्याच्या काळात देशात उष्मा वाढणार आहे. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता सर्व यंत्रणांनी योग्य ती काळजी घेतल्याची माहिती, केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. एप्रिल ते जून दरम्यान देशाच्या मध्य, उत्तर आणि दक्षिण भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश या भागाला उष्णतेच्या लाटेला सामोरं जावं लागणार असल्याचं, भूविज्ञान खात्याचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं.

****

तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३० ते ३२ रुपयांनी कपात केली आहे. आता मुंबईत एका व्यावसायिक सिलिंडरची किंमत एक हजार ७१७ रुपये इतकी झाली आहे.

****

राज्यात कालपासून नवीन वीज दर लागू झाले. इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे १० टक्के दरवाढीचा बोजा महावितरणच्या ग्राहकांवर पडणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्च २०२३ च्या आदेशानुसार ही दरवाढ करण्यात आली. दोन वर्षांसाठी दोन टप्प्यांत वीज दरवाढ होईल. घरगुती संवर्गातल्या सिंगल फेजसाठी पूर्वीच्या ११६ रुपयांऐवजी आता १२८ रुपये आकारले जातील, थ्री फेजसाठी पूर्वीच्या ३८५ रुपयांऐवजी ४२५ रुपये लागणार आहेत. वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या ४७० रुपयांऐवजी ५१७ रुपये द्यावे लागतील.

दरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळ - एमएआरसीने ठरवलेल्या दरानुसार वीजदर ठरवले असून, त्याचा बोजा छोट्या विद्युत ग्राहकांवर पडणार नाही, अशी त्या दराची रचना केली असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिलं.

****

सेवानिवृत्त वेतनधारकांचं निवृत्ती वेतन आता शासनाच्या ई- कुबेर प्रणालीद्वारे रिझर्व बॅंकेमार्फत पेन्शनधारकांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी पेन्शनधारकांनी आपलं बॅंक खातं परस्पर न बदलता ते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावं, असं आवाहन वरिष्ठ कोषागार कार्यालयाच्या सहाय्यक संचालक सुषमा बुरकुले यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडण्याची मोहिम महापालिकेतर्फे सुरू करण्यात येत आहे. यामुळे आज धनेगांव धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असून, नागरीकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. या जलवाहिनीवरील वॉल्वमध्ये अनेक ठिकाणी छेडछाड करून पाण्याची चोरी केली जात असल्याचं निदर्शनास आल्यानं, ही कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, संभाव्य पाणी टंचाईचं संकट लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची आज सांगता होणार आहे. नाथषष्ठी यात्रेनिमित्त काल आणि परवाही पैठण इथं अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. नाथवंशजांच्या हस्ते काल्याच्या प्रसादाची हंडी फोडून आज या यात्रेची सांगता होईल.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. आजपासून पदवी अभ्यासक्रमाच्या, १६ एप्रिलपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तर २९ एप्रिलपासून विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तीन मे पासून शिक्षण आणि शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या तर १३ मे पासून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातल्या सर्व संलग्नित महाविद्यालयात एकूण १०५ केंद्रावर या परीक्षा घेण्यात येतील. या परीक्षेचे निकाल ३० दिवसांत जाहीर करण्यासाठी विद्यापीठानं चार संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकूण १४ मूल्यांकन केंद्र तयार केले आहेत.

****

टपाली मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. अन्य एका बैठकीत बोलताना स्वामी यांनी, ग्रामीण तसंच शहरी भागातल्या महिला बचत गटांच्या सदस्यांना मतदान जनजागृती उपक्रम- स्वीप मध्ये सहभागी करुन घेण्याचे निर्देश दिले.

****

हिंगोली लोकसभा मतदार संघात मतदान जनजागृती रथाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी काल हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. 'मी मतदान करणारच' या स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करुन पारधी यांनी या उपक्रमाचंही उद्घाटन केलं. या मतदान जनजागृती रथाद्वारे शहरातल्या प्रत्येक वार्ड आणि ग्रामीण भागात जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

****

नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या विष्णुपुरी इथंल्या जिल्हा परिषद हायस्कूल या पर्यावरण पूरक मतदार केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी या मतदान केंद्राची कल्पना आणि कार्यपद्धती, तसंच मतदान केंद्राच्या वैशिष्ट्यांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली, अशा मतदान केंद्रामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिक पर्यावरणपूरक बनवण्यात मदत होईल, असा विश्वास निर्माण झाल्याचं त्या म्हणाल्या.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विक्रमी कर वसुलीबद्दल आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. नव्या आर्थिक वर्षात ५०० कोटी कर वसुलीचं उद्दीष्ट निर्धारित करून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महापालिकेनं गेल्या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर तसंच पाणी पट्टीचं एकूण ४८० कोटी रुपये कर संकलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे, त्यापैकी १८२ कोटी ७८ लाख रुपये महसूल वसूल करण्यात मनपाला यश आलं आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वाधिक ४१ अंश सेल्सियस तापमान सोलापूर इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल बीड, अकोला आणि जळगाव इथं ४० अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच बुलडाणा इथं ३८ पूर्णांक चार, परभणी ३६ पूर्णांक पाच, तर नांदेड इथं ३६ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...