Saturday, 20 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.07.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 July 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा जालना जिल्ह्यातल्या आपल्या अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाही. दलित समाजाला न्याय द्यायचा नाही. लाडका भाऊ, लाडकी बहीण अशा योजना आणून सर्वांना वेड्यात काढायचं आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. दोन्ही सदनांचं कामकाज या अधिवेशन काळात सुरळीत होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन या बैठकीत विरोधी पक्षांना करण्यात येणार आहे. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून, मंगळवारी २३ तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे.

****

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन उद्या रविवारी पुणे इथं होणार आहे. या अधिवेशनात सुमारे ५ हजार ३०० पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

****

नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी शिरलं आहे. नाग नाल्याशेजारी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी हवामान खात्यानं १८ ते २१ जुलैदरम्यान वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या ऑरेंज अलर्टनुसार नागरिकांना दक्ष राहून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती आणि गडचिरोलीतही दमदार पाऊस सुरू आहे.

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगड, गजापूर इथं अतिक्रमण हटाव आंदोलनादरम्यान झालेल्या दंगलीचे पडसाद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या पिंपरी राजा गावातही उमटले. सामाजिक माध्यमांवरून आक्षेपार्ह आशय प्रसारित केल्याच्या कारणावरून भावना दुखावल्या गेल्याने दोन गटांत काल रात्री तणाव निर्माण झाला. त्यामुळे गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं करमाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रताप नवघरे यांनी सांगितलं आहे.

****

राज्यातल्या सहकारी संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत शासनानं निर्णय घेतला आहे. या योजनेचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. याचा लाभ घेण्यासाठी सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्प, शीतकरण केंद्र, तसंच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांकडे अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर कृषी विज्ञान केंद्रात गुरुवारी २५ जुलै रोजी आंबा-उत्तम कृषी पध्दती या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी १० वाजेपासून सुरू होणाऱ्या या शिबिरात नवीन आंबा लागवड, जुन्या बागा आणि बहाराचं व्यवस्थापन, फळप्रक्रिया, निर्यात आणि विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.

****

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे सुवर्ण महोत्सवी वर्ष मासिक संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीच्या सभागृहात आज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या सभेत सावनी गोगटे यांचं शास्त्रीय गायन होणार आहे.

****

प्रत्येक नागरिकानं कुटुंबाला विश्वासात घेऊन देहदान आणि अवयवदानासाठी पुढं यावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काल ते बोलत होते.

****

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं थायलंड आणि मलेशिया यांच्यात दुपारी दोन वाजता, तर श्रीलंका आणि बांग्लादेश दरम्यान संध्याकाळी सात वाजता सामना होणार आहे. दरम्यान, काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.

*

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 06 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 06 July 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...