Sunday, 4 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 August 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवला

·      पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम

आणि

·      पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची उपान्त्य फेरीत धडक, तर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीत पराभव

****

मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २९ हजार ४१४ घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग वाढवून आजपासून ३५ हजार दोन घनफूट प्रतिसेकंद इतका केला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करायची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. सिंहगड, एकता नगर भागातल्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.

ताम्हिणी घाटासह पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते बंद केले आहेत. पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसंच धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला असून उजनी धरण ९० टक्यांहून अधिक भरलं आहे.

****

पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे तसंच त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या भागात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराचे १०५ सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमात एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचं आयोजन करण्यात येत असून, यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जाणार आहेत. प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केलं आहे. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मारलेश्वर, अष्टविनायक दर्शन, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर, दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलींचा यात समावेश आहे.

****

महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या यात्रेच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे आदींची निवड करण्यात आली आहे.

****

भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीत महायुती सोबतच जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. नंदुरबार इथं आज झालेल्या जिल्हास्तरीय विस्तारित बैठकीत त्या बोलत होत्या. एकनाथ खडसे यांच्याबाबतीत पक्षाचे अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील असं रक्षा खडसे यांनी सांगितलं.

****

अठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज मुंबईत झालेला बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली इथल्या सरहद संस्थेत हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उपान्त्य फेरी गाठली आहे. उपान्त्यपूर्व सामन्यात आज भारताने इंग्लंडचा पेनल्टी शूट आऊटमध्ये चार - दोन असा पराभव केला. सामन्याची वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ एक - एक अशा बरोबरीत होते. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताचा गोलकीपर पी आर श्रीजेश यानं इंग्लंडचे दोन गोल रोखले. भारताकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय आणि राजकुमार पालनं गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

तर दुसरीकडे बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीत पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात लक्ष्यला डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसन कडून २२ - २०, २१ - १४ असा पराभव पत्करावा लागला. आता कांस्य पदकासाठी लक्ष्यचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडुसोबत होणार आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुर असलेल्या दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतासमोर २४१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेनं निर्धारित षटकात नऊ बाद २४० धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने तीन, कुलदीप यादवने दोन, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

लातूर इथं आज सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीनं ‘चला सावली पेरुया’ या वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची प्रेरणा शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सांगली-साताऱ्यात वृक्ष लागवडीसाठी पाच लाख वृक्षांच्या बिया पाठवण्यात आल्या असून, लातूर जिल्ह्यासह पंधरा लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उप्रकम पोहोचवण्याचं उद्दीष्ट असल्याचं शिंदे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.

****

दरम्यान, लातूर जिल्ह्यात ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानाअंतर्गत येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी बेल वृक्षाची लागवड करून बेल वनांची निर्मिती करावी, यासाठी जिल्ह्यातल्या वृक्षप्रेमी संघटनांनी पुढाकार घ्यावा, तसंच नारळी पौर्णिमेला प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला एक रोप भेट द्यावं, अशा पद्धतीने सण साजरे करून नागरिकांनी आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या जल कायदा, धोरण आणि शासन या नव्या अभ्यासक्रमाचं औपचारिक उद्घाटन आज माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं. विद्यापीठाने मागील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. जल व्यवस्थापनासाठी सर्व राज्यांनी एकत्रितपणे एका दिशेने प्रयत्न करण्याची गरज, प्रभू यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठाचे कुलगुरू ए. लक्ष्मीनाथ, गोदावरी विकास महामंडळाचे कार्य़कारी संचालक संतोष तीरमनवार, उद्योजक राम भोगले यावेळी उपस्थित होते.

****

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात आतापर्यंत २५ हजार ८६ ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. यात १०१ पूर्णांक १८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवल्यामुळे राज्याने शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला. या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचं अभिनंदन केलं असून, ग्राहकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असं आवाहन केलं आहे.

****

वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना, श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.

****

सांगली इथं आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांतिसिंह नाना पाटील चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात ४५ संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी कृषी, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसंच शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

****

नांदेड जिल्ह्यातले बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, नांदेडचे विकास माने आणि अनुप पाटील या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसंच जिल्ह्यात डॉ. सचिन खल्लाळ आणि क्रांती डोंबे यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...