Monday, 5 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:05.08.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 August 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      मुंबई, पुण्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम, प्रशासनाला सतर्कतेच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

·      राज्य परिवहन महामंडळाचा श्रावणात एसटी संगे तीर्थाटनहा उपक्रम

·      अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिल्लीत होणार आयोजन

·      बीड जिल्ह्यात दूध भेसळीविरोधात कारवाई, १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त

आणि

·      पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठी लढत, ऍथलेटीक्स स्पर्धांना आजपासून सुरुवात  

****

मुंबईसह राज्यभरात काल पावसाचा जोर कायम असल्यानं अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ३५ हजार दोन घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, तसंच मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्या परिसरातल्या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते बंद केले आहेत. पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

दरम्यान, पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे तसंच त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या भागात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराचे १०५ सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हवामान विभागानं पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

****

नाशिक जिल्हयात काल दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक धरणांमधला विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या गंगापूर धरणातून आठ हजार १००, दारणा धरणातून २२ हजार ३८३ तर नांदूरमध्यमेश्वर मधून ५४ हजार २३३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

दरम्यान, नाशिक शहरात गोदावरी नदीला आलेल्या पुरात एक जण वाहून गेला. महावितरणमध्ये अभियंता असलेला यग्नेश पवार हा रामकुंडाजवळ पुजाविधी करत असताना पाय घसरुन नदीत पडल्यानं वाहून गेला. कालपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. मालेगाव तालुक्यातल्या मालधे गिरणा नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेले सुमारे १२ जण पुराचं पाणी वाढल्याने पात्रातल्या एका टेकडीवर अडकले असून, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातून २७ हजार, तर निळवंडे धरणातून सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडलं जात आहे. यंदा पहिल्यांदाच नगर जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडलं जात आहे.

गेल्या तीन दिवसात जायकवाडी धरणात सहा टीएमसी पाणी दाखल झालं असून, धरणाचा पाणीसाठा सात टक्क्यांनी वाढला आहे.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त श्रावणात एसटी संगे तीर्थाटनहा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमात एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचं आयोजन करण्यात येत असून, यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जाणार आहेत. प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केलं. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मारलेश्वर, अष्टविनायक दर्शन, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर, दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलींचा यात समावेश आहे.

****

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यानं शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला आहे. या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत २५ हजार ८६ ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. यात १०१ पूर्णांक १८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे.

****

अठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या काल मुंबईत झालेला बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली इथल्या सरहद संस्थेत हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. येत्या पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी पुण्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलन मार्गदर्शन समितीच्या बैठकीत संमेलन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

****

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या कडा इथं काल अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी ११ लाख ८५ हजार ६८ रूपये किंमतीची १३ हजार ३६८ किलो रासायनिक भुकटी जप्त केली. तसंच बीड, अहमदनगर आणि धाराशिव इथं काल विभागातर्फे विविध ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत लाख ८७ हजार ६७२ रुपयांची ६ हजार ९४२ किलो भेसळ जप्त करण्यात आली.

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उपान्त्य फेरी गाठली आहे. उपान्त्यपूर्व सामन्यात भारताने इंग्लंडचा पेनल्टी शूट आऊटमध्ये चार - दोन असा पराभव केला. सामन्याची वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ एक - एक अशा बरोबरीत होते. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताचा गोलकीपर पी आर श्रीजेश यानं इंग्लंडचे दोन गोल रोखले. भारताकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय आणि राजकुमार पालनं गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आज कांस्यपदकासाठी खेळणार आहे. काल उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या विक्टर अक्सेलसेनकडून त्याला पराभव पत्कारावा लागला. महिला टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांचा चमू उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी खेळेल. ऍथलेटीक्स स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बीड इथला अविनाश साबळे तीनशे मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.

****

कोलंबो इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला श्रीलंकेकडून ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं ५० षटकात २४० धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला भारताचा संघ ४३व्या षटकात २०८ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेनं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता.

****

श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदीरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदीरात भाविकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह खुलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या देवस्थानांना, श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.

****

लातूर इथं काल सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीनं चला सावली पेरुयाया वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची प्रेरणा शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

****

दरम्यान, लातूर जिल्ह्यात माझं लातूर, हरित लातूरअभियानाअंतर्गत येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी एक कुटुंब, एक झाडउपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी बेल वृक्षाची लागवड करून बेल वनांची निर्मिती करावी, यासाठी जिल्ह्यातल्या वृक्षप्रेमी संघटनांनी पुढाकार घ्यावा, तसंच नारळी पौर्णिमेला प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला एक रोप भेट द्यावं, अशा पद्धतीने सण साजरे करून नागरिकांनी आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी नुकतीच भोकर तालुक्यातल्या मातुळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राच्या कार्याची पाहणी केली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...