Friday, 23 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 August 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

नवी दिल्ली इथं आज पहिल्या अंतराळ दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती अनन्यसाधारण आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याप्रसंगी केलं. इस्रोनं अंतराळ क्षेत्राबरोबरच देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान दिलं आहे, असं त्या म्हणाल्या. चंद्राच्या अध्ययनासाठी इस्रो आणखी योजना आखत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. देश गगनयान मोहिमेची प्रतीक्षा करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते रोबोटिक्स चॅलेंज आणि भारतीय अंतरीक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांच्या योगदानाची प्रशंसा करण्याचा आहे. सरकारनं या क्षेत्राशी संबंधित दूरदृष्टीचे निर्णय घेतले आहेत आणि आगामी काळातही घेऊ असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक इथं थोड्याच वेळात महिलांचं महाशिबीर होणार आहे. यात मुख्यमंत्री शिंदे महिलांशी संवाद साधणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी जळगाव इथं अकरा लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा ‘सामुदायिक गुंतवणूक निधी’ हा पुनरावर्ती निधी यावेळी जारी करण्यात येणार आहे. देशातल्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी कीव इथं राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सरंक्षण ते कृषी क्षेत्र या सर्व द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. युक्रेन इथं सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही यावेळी चर्चा होणार आहे. आज सकाळी कीव इथं पोहचल्यानंतर भारतीय समुदायांना पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, २५ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचा ११३ वा भाग प्रसारित होईल.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.

****

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र देश आहेत आणि मजबूत भागीदार बनण्याची त्यांची इच्छा आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजनाथसिंह यांनी काल वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं.

****

 

 

आदिवासीबहुल भागात शासकीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पीएम-जनमन मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रिय आदिवासी विकास मंत्रालयाकडून २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान, देशातले एक हजार तालुके आणि पंधरा हजार ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

****

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. तर विकृती विरुद्ध संस्कृतीसाठी हा बंद पाळण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन आज साजरा झाला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच त्यांच्यातील कला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना यांनी केलं. शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी शिक्षक, प्राध्यापकांनी सजग राहावं, असं कुलकर्णी म्हणाले. या कार्यक्रमात प्रसिद्ध लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जीवन साधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच गुणवंत विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

****

कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहे. यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...