Friday, 23 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.08.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 August 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      बदलापूर प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची सरकार मागणी करणार - मुख्यमंत्र्यांची माहिती

·      बदलापूर प्रकरणी बंद घोषित करणं बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, उद्याचा महाविकास आघाडीचा बंद मागे घेण्याचं शरद पवार यांचं आवाहन

·      नेपाळमध्ये प्रवासी बस दरीत कोसळून महाराष्ट्रातल्या १४ भाविकांचा मृत्यू

·      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन साजरा

आणि

·      अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात जालना इथल्या फरार डॉ.दिलीपसिंग राजपूत याला जळगाव जिल्ह्यातून अटक

****

बदलापूर इथं झालेली घटना दुर्देवी असून, यातल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची सरकार मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं आज महिला सक्षक्तीकरण अभियानाअंतर्गत महाशिबिर घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. लाडकी बहिण योजनेबरोबरच आता सुरक्षीत बहिण योजनाही राबवण्यात येईल, असं सांगताना त्यांनी, बदलापूर प्रकरणावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केला.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ३१ ऑगस्ट नंतरही या योजनेचे अर्ज भरता येतील आणि तीन महिन्यांची एकत्रित रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले

ज्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत, ३१ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरले नाहीत, पात्र नाही झालं, सप्टेंबरमध्ये तुमचे फॉर्म भरले तरीसुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे तिन्ही महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार.

 

ज्या महिलांना अद्याप रक्कम मिळालेली नाही, त्यांच्या अर्जातील त्रूटी दूर झाल्यानंतर त्यांना ती दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध योजनांची माहिती देणारे ३० स्टॉल्स उभारण्यात आले होते.

****

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र अशाप्रकारे बंद घोषित करणं बेकायदेशीर असून, कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. महाविकास आघाडीच्या या बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर आज तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अशाप्रकारे बंद घोषित करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उद्याचा बंद मागे घ्यावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. या प्रकरणी सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता, हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता, असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

 

महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेचा कृषी विभाग आणि विदर्भातल्या जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी उंबरकर यांच्याकडे आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी जळगाव इथं येणार आहेत. त्यावेळी ११ लाख लखपती दीदींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दीदींबरोबर ते यावेळी संवाद साधतील. पंतप्रधान यावेळी राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील.

****

मानवी शरीरावर वाईट परिणाम करणाऱ्या १५६ औषधांवर केंद्र शासनानं बंदी घातली आहे. यात प्रतिजैविकं, वेदनाशामक आणि जीवनसत्वांच्या औषधांचा समावेश आहे. बंदी घातलेल्या १५६ औषधांमध्ये काही अनुचित मिश्रण असल्याचं निदर्शनास आलं असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या विशेष समितीनं केलेल्या तपासणीनंतर हा निर्णय घेतल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे.

****

नेपाळमध्ये एक प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातल्या १४ भाविकांचा मृत्यू झाला. सुमारे ४३ भाविकांसह ही बस पोखरा इथून काठमांडूला जात असताना मार्सयांगडी नदीत कोसळून हा अपघात झाला. हे सर्व भाविक जळगावचे रहिवासी असून, राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातल्या महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून, जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मृतदेह राज्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात असून, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन आज साजरा झाला. यानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी तसंच त्यांच्यातील कला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं, कुलकर्णी यावेळी म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी शिक्षक, प्राध्यापकांनी सजग राहावं, असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात प्रसिद्ध लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जीवन साधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच गुणवंत विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

****

अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार डॉ.दिलीपसिंग राजपूत याला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज जळगाव जिल्ह्यातल्या पळसखेडा मिराचे इथून अटक केली. राजपूत याच्या भोकरदन इथल्या अवैध गर्भलिंगनिदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनानं गेल्या महिन्यात संयुक्तरित्या कारवाई करत सोनोग्राफी मशीनसह रोख रक्कम आणि गर्भपातासाठी वापरलेल्या जाणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर तो फरार झाला होता. दरम्यान, राजपूत याला आज न्यायालयानं २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुधारित निर्देशानुसार चलनामधून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा आता टपाल विभागामार्फत आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे चलनातून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा असतील, त्यांनी त्या बदलून घेण्याचं आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ आणि विभाग मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचं उद्घाटन मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांच्या हस्ते झालं. रोजगार योजनेअंतर्गत मध निर्मिती योजनेचा लाभ गावांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक गाव हे ‘मधाचे गाव’ म्हणून करण्यात येईल, अशी माहिती साठे यांनी दिली. या कार्यशाळेतले प्रशिक्षित कर्मचारी शासनाच्या रोजगार योजना लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आणि उद्या आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना या योजनांचा लाभ सुलभतेने घेता यावा यासाठी जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही शिबिरं होत आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करुन वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या शिबिरांचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज दुसऱ्या दिवशी विविध भागातल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन, माहिती जाणून घेतली. कृषी उत्पन्नावर आधारित विविध विषयांवरचे परिसंवाद तसंच चर्चासत्र योवळी घेण्यात आले.

****

धाराशिव इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांचा ग्राम विकासामध्ये सहभागया विषयावर सिंधुदुर्ग इथले भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर यांचं व्याख्यान झालं. बायोगॅस निर्मिती प्रकल्पाची यशोगाथा त्यांनी यावेळी विषद केली.

****

जालना जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, भोकरदन तालुक्यात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पद्मावती धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या भागातल्या २५ गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...