Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date: 23
August 2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
आज
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथल्या
कार्यक्रमात अंतराळ दिनाच्या देशवासियांना तसंच वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. इस्रोच्या
कामगिरीचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. चंद्रयान मोहिमेचं यश देशासाठी आनंददायी क्षण
होता, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
****
राज्य
शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या उपस्थितीत नाशिक इथं महिलांचं महाशिबीर होणार आहे. यात मुख्यमंत्री शिंदे महिलांशी
संवाद साधणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
उपस्थित राहणार आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी जळगाव इथं अकरा लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचं
दूरस्थ पद्धतीनं वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान लखपती दीदींशी
संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा ‘सामुदायिक
गुंतवणूक निधी’ हा पुनरावर्ती निधी यावेळी जारी करण्यात येणार आहे. देशातल्या विविध
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमात दूर दृश्य प्रणालीच्या
माध्यमातून सहभागी होणार आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी कीव इथं राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. या
भेटीदरम्यान, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सरंक्षण ते कृषी क्षेत्र या सर्व द्विपक्षीय संबंधांवर चर्चा
करणार आहेत. युक्रेन इथं सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही यावेळी चर्चा होणार
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेनच्या ऐतिहासिक भेटीमुळं द्विपक्षीय संबंध
अधिक दृढ आणि विस्तारण्यास मदत होईल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पोलंड मधल्या वॉर्सा इथं राजर्षि
छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक, जामसाहिब
नवानगर या युध्द स्मारकांना भेट दिली. तसंच
भारतीय नागरिकांशी संवाद साधला. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय
संबंधांबाबत चर्चा केली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी, २५
तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचा ११३ वा भाग प्रसारित
होईल.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात
आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर
होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकनंतर हा निकाल पाहता येईल.
****
स्वित्झर्लंड
इथं सुरू असलेल्या लोझॉन डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं
दुसरं स्थान पटकावलं आहे. ८९ पूर्णांक ४९ मीटर भाला फेकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
पुढच्या महिन्यात होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम स्पर्धेसाठी नीरज पात्र ठरला आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन आज साजरा
होत आहे. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात जीवन साधना पुरस्कार वितरण करण्यात येत आहे.
यावेळी विद्यापीठाशी संलग्नित सर्व
महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.
****
आकाशवाणी
हे ज्ञान आणि मनोरंजनाचं माध्यम आहे, ते टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असं प्रतिपादन पश्चिम क्षेत्राचे अपर महासंचालक-कन्टेन्ट विश्वनाथ कंबलियाल यांनी
केलं. आकाशवाणीच्या क्षेत्रीय कार्यक्रम समन्वय समितीची बैठक नागपूर इथं आज आयोजित
करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
नंदुरबार
जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यात तहसिल कार्यालयातले पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे
यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.
डोईफोडे यांनी तक्रारदारांकडे त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी एक हजार पाचशे रूपयांच्या
लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने एक हजार रुपये दिल्यानंतरही कार्ड बनवून मिळाले
नाही त्यामुळे डोईफोडे यांनी उर्वरित पैश्यांची मागणी केली. यावेळी उर्वरित पाचशे रुपयांच्या
लाचेचा स्विकारत करतांना डोईफोडे यांना अटक करण्यात आली.
****
जॉर्डनमधील
अम्मान इथं सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगिरांनी
चमकदार कामगिरी करत चार वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. पुलकीतने ६५ किलो वजनी गटात, मानसी लाथरने ७३ किलो वजनी गटात, नेहा सांगवानने ५७ किलो तर अदिती कुमारीने ४३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. ग्रीको रोमन शैलीत रोनक दहिया ११० किलो वजनी गटात
आणि साईनाथ पारधीने ५१किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.
****
No comments:
Post a Comment