Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; २६ कॅबिनेट तर १० राज्यमंत्र्यांना शपथ
Ø आपले मंत्रिमंडळ
ही अनुभवी आणि उत्तम नेत्यांची “बेस्ट टीम”
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Ø आठ जानेवारीला राज्य विधिमंडळाचं विशेष
अधिवेशन
आणि
Ø पंचायत समिती सभापती निवडणुकीत हिंगोली
जिल्ह्यात शिवसेना, जालना आणि लातूर जिल्ह्यात भाजप तर बीड जिल्ह्यात काँग्रेस आघाडीचं
वर्चस्व
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि
गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी
उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील,
धनंजय मुंडे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, राजेश
टोपे, बाळासाहेब पाटील यांनी, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण,
विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमित
देशमुख, के. सी. पाडवी, अस्लम शेख यांनी पद आणि गोपनीयतेची
शपथ घेतली.
शिवसेनेच्या कोट्यातून संजय राठोड, गुलाबराव पाटील,
अनिल परब, उदय सामंत, दादा
भुसे, संदीपान भुमरे, शंकरराव गडाख,
आणि आदित्य ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
राज्यमंत्री म्हणून, शिवसेनेचे
अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर, राष्ट्रवादी
काँग्रेसचे दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, तर
काँग्रेसचे सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांनी काल शपथ घेतली.
****
जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले
अनुभवी आणि उत्तम नेते मंत्रिमंडळात असून ही एक “बेस्ट टीम” असल्याचं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल झालेल्या
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र
आलेलो असलो, तरी राज्यासाठी हिताचा विचार आपल्याला करायचा आहे, आपली ही बेस्ट टीम
राज्याला अधिक प्रगतीपथावर नेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, येत्या आठ जानेवारीला राज्य विधिमंडळाचं
विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. संविधानाच्या अनुच्छेद ३३४ नुसार अनुसूचित जाती-जमातीच्या लोकसभा
तसंच विधानसभेत आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय संसदेनं संमत केला आहे,
या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.
****
मुख्यमंत्र्यांनी राज्यात नागरिकता सुधारणा कायद्याची
अंमलबजावणी करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
केली आहे. ते काल साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे स्वत: मुंबईतून बांगलादेशींना
बाहेर काढण्याची भाषा बोलत होते, त्यावर त्यांनी कायम राहावं असं आठवले म्हणाले.
****
नागरिकत्व कायद्याचा प्रारंभ कॉंग्रेस पक्षाच्या
काळातच झाला, मात्र आता या कायद्यातील तरतुदी बाबत काँग्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत
असल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. ते काल नाशिक
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. घुसखोरांना नागरिकत्व देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा
अट्टहास असल्याचं सांगत, नागरिकत्व कायद्याच्या विरोधात राबवल्या जात असलेल्या मोहिमेला जनजागरण अभियान राबवून उत्तर दिलं जाईल, असं चौहान
यांनी सांगितलं.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याला
पाठिंबा देण्यासाठी सांगलीत काल शिवप्रतिष्ठानतर्फे जनजागृती फेरी काढण्यात
आली. हिंदुत्ववादी संघटनांनी या रॅलीला पाठिंबा दिला होता. संघटनेचे मार्गदर्शक
संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संदेश फेरीत
कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर महाराज, खासदार संजय पाटील,
आमदार सुरेश खाडे, आदी नेते सहभागी झाले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत इथंही काल नागरिकत्व सुधारणा
कायद्याच्या समर्थनार्थ भव्य जनजागरण फेरी काढण्यात आली या फेरीत नागरिक मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते.
परभणी इथं राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीच्यावतीने
काल जनजागरण फेरी काढण्यात आली. विविध पक्ष, संघटना, तसंच महिलांनी या जनजागरण फेरीत
सहभाग घेतला.
जालना जिल्ह्यात परतूर इथंही काल नागरिकत्व सुधारणा
कायद्याच्या समर्थनात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीनं संदेश फेरी काढण्यात आली. उपविभागीय
कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीत नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
लोकसंग्रही कार्यकर्ते सन्मार्गी जीवनाचा मार्ग दाखवतात,
त्यांचे अनुकरण आणि आचरणातून समाजाला नवी प्रेरणा मिळते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. काल अंबाजोगाई इथं, भारतीय इतिहास संकलन
योजनेचे महासचिव तथा संघाचे प्रचारक डॉ. शरद हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात
भागवत बोलत होते. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यावेळी उपस्थित होत्या.
निरपेक्ष भावनेने केलेलं कार्य उदासीनता दूर ठेवतं, हेबाळकर कुटुंबाने निरपेक्ष भावनेनं
राष्ट्रकार्यात आयुष्य समर्पित केलं, या शब्दांत शांताक्कांनी हेबाळकर यांचा गौरव केला.
शरद हेबाळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शरयू हेबाळकर यांचा यावेळी शाल आणि सन्मानपत्र
देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना हेबाळकर यांनी अंबाजोगाईकरांच्या
कायम ऋणात राहू, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
मराठवाड्यात काल हिंगोली, जालना, लातूर आणि बीड इथं
पंचायत समिती सभापती पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये हिंगोली
जिल्ह्यात शिवसेना, जालना आणि लातूर जिल्ह्यात भाजप तर बीड जिल्ह्यात काँग्रेस आघाडीचं
वर्चस्व राहिलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पाचपैकी
तीन पंचायत समित्यांची सभापती पदं शिवसेनेनं तर काँग्रेस तसंच भाजपला प्रत्येकी एक
सभापती पद मिळवता आलं. हिंगोली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुमनबाई
झुळझुळे, सेनगाव -शिवसेनेच्या छाया संजय हेंबाडे, औंढा - शिवसेनेच्या संगीता ढेकळे, कळमनुरी -
काँग्रेसच्या पंचफुलाबाई अशोक बेले, तर वसमत पंचायत समितीच्या सभापती पदी
भाजपाच्या ज्योती विश्वनाथ धसे यांची निवड झाली आहे .
जालना जिल्ह्यात जालना पंचायत समिती वगळता उर्वरित
सात ठिकाणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. जिल्ह्यात चार जागांवर भाजप, तर शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन सभापती पदं मिळवली. जालना पंचायत समितीच्या
सभापतीपदी शिवसेनेच्या विमल पाखरे, बदनापूर - शिवसेनेच्या शिला शिंदे, भोकरदन - भाजपाच्या
वैशाली गावंडे, परतूर - भाजपाच्या मनकर्णा येवले, जाफराबाद - भाजपच्या विमल गोरे, मंठा
- भाजपाच्या शिल्पा पवार, अंबड - राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव खटके, तसंच घनसावंगी
पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत रक्ताटे यांची निवड झाली
आहे.
लातूर जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांपैकी भाजपनं
सात तर काँग्रेसनं तीन पंचायत समित्यांची सभापतीपदं पटकावली.
लातूर पंचायत समितीच्या सभापती पदावर काँग्रेसच्या
सरस्वती पाटील, औसा काँग्रेसच्या अर्चना गायकवाड, आणि जळकोट पंचायत समितीच्या सभापती
पदावर काँग्रेसचे बालाजी ताकबीडे बिनविरोध निवडून आले.
निलंगा पंचायत समितीच्या सभापती पदावर भाजपच्या राधा
सुरेश बिरादार, शिरुर अनंतपाळ भाजपचे डॉ नरेश चलमले, देवणी भाजपच्या चित्रकला बिरादार,
चाकूर भाजपच्या जानाबाई बडे, रेणापूर भाजपचे रमेश सोनवणे, अहमदपूर पंचायत समितीच्या
सभापती पदावर भाजपच्या गंगासागर जाभाडे हे सर्व जण बिनविरोध निवडून आले.
उदगीर पंचायत समितीत भाजपाचे दोन सदस्य फुटल्यामुळे
कॉंग्रेस आणि भाजपाला समसमान मतं मिळाली, त्यामुळे इथे चिठ्ठी काढून निर्णय झाला, यात
सभापती पदी भाजपाचे विजय पाटील विजयी झाले. अहमदपूर इथं उपसभापतीपदाच्या निवडणुकीत
समसमान मतं पडल्यानं चिठ्ठी काढण्यात आली, त्यात भाजपा बंडखोर बालाजी गुट्टे विजयी
झाले.
देवणी उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल
झाले होते, त्यापैकी दोन अवैध ठरले तर एकाने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक आज होण्याची
शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातल्या अकरा पंचायत समित्यांपैकी दहा
पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती यांच्या निवडी सोमवारी झाल्या. दहापैकी सहा पंचायत
समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस- काँग्रेस यांचं वर्चस्व राहिलं असून तीन पंचायत समित्या
भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. पाटोदा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकाही उमेदवाराचा
अर्ज वेळेत पोहचला नाही, त्यामुळे ही निवडणूक आज होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामातल्या स्वातंत्र्यसैनिक चंदाबाई
जरीवाला यांचं रविवारी रात्री अमेरिकेत न्यू जर्सी इथं निधन झालं, त्या ९६ वर्षांच्या
होत्या. गेली चार वर्षे त्यांचं अमेरिकेत मुलाकडे वास्तव्य होतं. त्यांच्या पार्थिव
देहावर न्यू जर्सी इथंच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेलू शाखेतून
डासाळा इथल्या शाखेत रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून रोख
तीन लाख रुपये चोरट्यांनी लुटून नेले. पाथरी
रस्त्यावर देऊळगाव पाटीजवळ काल सकाळी ही घटना घडली.
****
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसेसावळी शाखेतून
अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे एक कोटी ६६ लाख रुपयांचा
ऐवज चोरुन नेल्याचं काल उघडकीस आलं.
****
औरंगाबाद विभागाची पदवीधर मतदार संघाची अंतिम यादी
काल जाहीर करण्यात आली. ही यादी विभागीय आयुक्त कार्यालय, विभागातील सर्व जिल्हाधिकारी
कार्यालयं, उप-विभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि संकेतस्थळावर पाहण्यासाठी
उपलब्ध असल्याचं, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
*****
***