Tuesday, 26 February 2019

AIR NEWS BULLETIN, ARUANGABAD 26.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 भारतातल्या संभाव्य आत्मघाती हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी, भारतीय वायूसेनेनं आज पहाटे पाकिस्तानात बालाकोट इथल्या दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी कारवाई केल्याचं, परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांसाठी एक निवेदन जारी करताना, बोलत होते.



 जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं पुलवामा इथं १४ फेब्रुवारीला आत्मघातकी हल्ला केला. यापूर्वी पठाणकोट हवाई तळावर तसंच संसदेवरही, याच संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.



 ही संघटना असे आणखी हल्ले करण्यासाठी, आत्मघाती पथकं तयार करत असल्याचं खात्रीशीर वृत्त प्राप्त झालं होतं, त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून, ही कारवाई केल्याचं गोखले म्हणाले.



 पाकिस्तानात गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करण्याबाबत भारतानं पाकिस्तानला वारंवार सूचित केलं होतं, मात्र पाकिस्ताननं असे कोणतेही दहशतवादी तळ असल्याचा इन्कार करत, त्याबाबत काहीही कारवाई केली नव्हती.



 त्यामुळे भारतानं आज पहाटे ही असैन्य कारवाई केली. कारवाई झालेला जैश ए मोहम्मदचा हा तळ नागरी वसाहतीपासून दूर, जंगलातल्या एका टेकडीवर होता. त्यामुळे या कारवाईत जैशचे दहशतवादी मोठ्या प्रमाणात मारले गेले, मात्र, पाकिस्तानच्या नागरी वसाहतींना कोणतंही नुकसान पोहोचलं नसल्याचं, गोखले यांनी स्पष्ट केलं.



 या कारवाईनंतर तरी, पाकिस्ताननं जैश ए मोहम्मद सह इतर सर्व दहतशवादी संघटनांचे सर्व तळ नष्ट करावेत, असा स्पष्ट इशारा, परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानला दिला आहे.



 दरम्यान भारतानं आज केलेल्या कारवाईला उत्तर देण्याचे संकेत, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी दिले असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 वायूसेनेनं आज पहाटे केलेल्या या लक्ष्यभेदी कारवाईचं, राज्य विधानसभेनं एकमुखानं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हा अभिनंदनाचा ठराव मांडताना, दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त करून, सुरक्षा जवानांचं बलिदान व्यर्थ न ठरू दिल्याबद्दल, सैन्य दलाचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. शिवसेनेचे सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नसीम खान, शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत, वायूसेनेचं कौतुक केलं.



 दरम्यान, विधानसभेत आज पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या, यासंदर्भात सदनात सध्या चर्चा सुरू आहे.



 पुण्यात कर्णबधीर तरुणांवर झालेल्या लाठीमाराचा मुद्दा आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत उपस्थित केला. या पोलिसांवर गृहखात्यानं कारवाई करावी, अशी मागणी आमदार कडू यांनी केली.



 समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी, औरंगाबाद इथं गेल्या वर्षी झालेल्या दंगल प्रकरणात अनेक दुकानं भस्मसात झाली होती, या कडे लक्ष वेधलं. या दुकानदारांना अद्याप काहीही नुकसान भरपाई मिळाली नाही, ती लवकरात लवकर देण्याची मागणी आझमी यांनी केली.

****



 गेल्या चार वर्षांसाठीचे गांधी शांतता पुरस्कार, आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. सन १९९५ साली, महात्मा गांधीच्या १२५ व्या जयंतीनिमित्त, गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. २०१५ चा पुरस्कार कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद केंद्राला, २०१६ चा पुरस्कार अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल यांना विभागून, २०१७ चा पुरस्कार एकल अभियान ट्रस्ट यांना तर भारतात आणि जागतिक कुष्ठरोगाच्या निर्मूलनात सहकार्य केल्याबद्दल, जपानच्या योहेई ससाकावा या संस्थेला २०१८ चा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहिंसक आणि गांधीवादी मार्गाने, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्ती तसंच संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. एक कोटी रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
 रामजन्मभूमी - बाबरी मशीद खटल्याची सुनावणी, आज सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली. या सुनावणीसाठी, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींचं पीठ स्थापन करण्यात आलं आहे. अयोध्या इथल्या दोन पूर्णांक सत्त्याहत्तर  एकर जागेबाबत २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात चौदा याचिका दाखल करण्यात आल्या, या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी या पीठासमोर होत आहे. हे प्रकरण, न्यायालयाकडून नियुक्त मध्यस्थाकडे सोपण्यासंदर्भात येत्या पाच मार्च रोजी सर्वोच्च न्यायालय निर्णय सुनावण्याची शक्यता आहे.
*****
***




No comments: