Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****
पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानानं आज सकाळी हवाई हद्दीचा भंग करत भारतीय
अवकाशात प्रवेश केला. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात घुसलेल्या या विमानाला, भारताच्या
हवाई गस्ती पथकानं तत्काळ पिटाळून लावलं, मात्र या विमानानं, या भागात काही बॉम्ब टाकल्याचं
वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
****
भारतीय हवाई दलाचं
एक जेट विमान आज सकाळी दहाच्या सुमाराला जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात कोसळलं.
या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतला. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर,
श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगढ आणि अमृतसर ही विमानतळं, नागरी वाहतुकीसाठी तात्पुरती
बंद करण्यात आली आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं ही माहिती दिली.
****
पाकिस्तानच्या हवाई
हद्दीत आलेली दोन भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचा आणि एका वैमानिकाला पकडल्याचा दावा
पाकिस्ताननं केला आहे. पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी एका ट्वीट
संदेशात हा दावा केला असून, पाडलेल्या विमानांपैकी एक पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये
आणि एक जम्मू काश्मीरमध्ये पडल्याचं त्यात म्हटलं आहे.
दरम्यान पाकिस्तानचे
पंतप्रधान इम्रान खान यांनी आज अण्वस्त्र संबंधित निर्णयाधिकार असणाऱ्या उच्च
समितीची बैठक बोलावल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. भारतानं केलेल्या
हवाई कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीनं काल घेतलेल्या
बैठकीमध्ये ही बैठक बोलावण्याचा निर्णय झाला होता. भारताबरोबरच्या सध्याच्या तणावपूर्ण
स्थितीच्या पार्श्वभूमीवर , पाकिस्तान संसदेचं विशेष सत्रही आज बोलावलं आहे.
****
जम्मू काश्मीरच्या
शोपियां जिल्ह्याच्या मेमंढर भागात आज पहाटे सुरक्षा दलांनी जैश ए मोहम्मद संघटनेच्या
दोन अतिरेक्यांना ठार केलं. या भागात हे अतिरेकी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर
सेना, केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं या भागाची घेराबंदी
करून शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात हे अतिरेकी मारले गेले.
चकमकीच्या ठिकाणावरून शस्तास्त्रं आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला.
****
युवकांनी स्वप्नपूर्ती
साठी धावतानाच, नवभारताच्या उभारणीत मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत राष्ट्रीय युवा संसद महोत्सव पुरस्कार प्रदान
केल्यानंतर बोलत होते. नागपूरच्या श्वेता उमरे हिला पंतप्रधानांच्या हस्ते प्रथम पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं. माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
पाकिस्तानातल्या
दहशवादी तळांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीनसह इतरही कोणत्या देशानं पाकिस्तानची
बाजू घेतलेली नाही, यावरून, दहशतवादाला आश्रय देणाऱ्या शक्तींबाबत जग आता फार संयमी
भूमिका घेऊ शकत नाही, हे स्पष्ट झालं आहे, असं पाकिस्तानचे अमेरिकेतले माजी राजदूत
यू.एस.हक्कानी यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन इथे वृत्तसंस्थांशी बोलताना हक्कानी यांनी,
चीननं पाकिस्तानला पाठिंबा न देता, केवळ दोन्ही देशांनी संयम राखावा, असं आवाहन केलं
आहे, याकडे लक्ष वेधलं.
****
ज्येष्ठ विचारवंत
एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. याआधी या प्रकरणाचा तपास कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून
सुरू होता. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकानं या दोन हत्यांमध्ये
काही समान दुवे असल्याचं न्यायालयाला सांगितल्यानंतर न्यायालयानं हे निर्देश दिले.
****
राज्याच्या विधानसभेत
आज, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका, आणि नानाजी देशमुख
यांना भारतरत्न दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला.
या प्रस्तावाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.
दरम्यान,राज्याच्या
दुष्कळी भागात पुरेशा प्रमाणात चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी आज विरोधी
पक्षांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि अन्य विरोधी पक्षांनी यावेळी भाजप सरकार विरोधी घोषणा दिल्या.
*****
***
No comments:
Post a Comment