Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****.
पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीर
सैनिकांच्या हौतात्म्यानंतर देशभरामधल्या लोकांच्या मनामध्ये संतापाची तीव्र भावना
निर्माण झाली आहे. दहशतवादाचं
समूळ उच्चाटन करण्यासाठी या वीरांचं हौतात्म्य
निरंतर प्रेरणा देत राहील, असा
विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आकाशवाणीच्या मन की बात या
कार्यक्रमाद्वारे त्यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. आपण सर्वांनी जातीयवाद, संप्रदायवाद, प्रांतवाद आणि इतर सर्व मतभेदांना विसरून आज देशापुढे उभे ठाकलेल्या
या आव्हानाला तोंड दिलं पाहिजे, असं
सांगत शहीदांच्या कुटुंबीयांच्या दृढ निर्धाराचे दाखले त्यांनी दिले.
नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं काम
अतिशय कमी वेळात पूर्ण झालं असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं. दिल्लीतील इंडिया
गेट आणि अमर जवान ज्योत भागाजवळच बनवण्यात आलेलं हे स्मारक उद्या लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार
आहे. सैनिकांचं आपल्यावर असलेलं ऋण चुकतं करण्याचा हा प्रयत्न आहे. या स्मारकाला नागरिकांनी भेट द्यावी, या भेटीची छायाचित्रे समाज माध्यमां द्वारे शेअर करावीत, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
तळागाळातल्या लोकांसाठी निष्काम भावनेने कार्य करणाऱ्या कर्मयोगी लोकांना यंदा पद्म पुरस्कार प्रदान
करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ओडिशाचे दैतारी नायक, गुजरातचे
अब्दुल गफूर खत्री, मराठवाड्यातील गो सेवक शब्बीर सैयद यांच्यासह अनेकांच्या कार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख
केला. दूरचित्रवाणी, नियतकालिकं किंवा वर्तमानपत्रांमध्ये कधीही पहिल्या
पानावर न झळकलेल्या,
प्रसिद्धीच्या झगमगाटाच्या दुनियेपासून
खूप दूर असलेल्यांचा परिचय देशाला झाला, हेच
या पुरस्कारांचं मोठं यश असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गेल्या पाच महिन्यांमध्ये जवळपास बारा लाख गरीब कुटुंबांनी प्रधानमंत्री
जन आरोग्य योजनेचा लाभ घेतल्याचं पंतप्रधान म्हणाले.
इंग्रजांशी झुंज देणारे भगवान बिरसा
मुंडा, उद्योगांची मुहूर्तमेढ रोवणारे जमशेदजी टाटा आणि माजी
पंतप्रधान मोरारजी देसाई यांना
जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी अभिवादन केलं. काही दिवसांतच येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
तसंच दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी देशभरातील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा
दिल्या.
मन की बात या कार्यक्रमाच्या
माध्यमातून आपण कोट्यवधी कुटुंबांबरोबर दर महिन्याला संवाद साधतो, ही गोष्ट
अतिशय सुखद अनुभूती देणारी आहे, असं
ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीमुळे यानंतरची
मन की बात मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. त्यावेळी पुन्हा नागरिकांशी संवाद साधताना आनंद वाटेल, असंही त्यांनी
म्हटलं.
****
दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पंतप्रधानांनी
आज उत्तरप्रदेशात गोरखपूर इथून प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत कमाल पाच एकरापर्यंत
जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये, तीन टप्प्यात मिळणार आहेत. या योजनेचा
पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला. कांडला गोरखपूर गॅसवाहिनीच्या
कोनशिलेचं अनावरणही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
पाचशे हेक्टर क्षमता असणाऱ्या तलावांच्या मासेमारी
कंत्राटासाठी आता लीज आकारली जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल भंडारा जिल्ह्यात साकोली इथं, विविध विकास
कामांचं भूमिपूजन केल्यानंतर बोलत होते. या तलावांचं कंत्राट फक्त मासेमारी संस्थांनाच देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धानाला पाचशे
रुपये बोनस देण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
****
बीडपासून जवळ असलेल्या पाली इथं
सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी दहाच्या सुमारास अल्टो कार आणि
माल ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर तीन जण
गंभीर जखमी झाले. जखमींवर बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं
कळवलं आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या ९० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
होत आहे. अनेक मतदान केंद्रांसमोर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत. सकाळी
९ पर्यंत सरासरी १० ते १२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात नागापूर इथं आज सातवी बौध्द धम्म परिषद होत आहे. आज सकाळी
नऊ वाजता धम्म ध्वजारोहणानं या परिषदेला प्रारंभ झाला. या परिषदेत जाहीर सभा, प्रवचन, तसंच
बुध्द -भीम गीतांसह विविध कार्यक्रम
घेण्यात येणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment