Friday, 22 February 2019

text- AIR News Bulletin Aurangabad 22.02.2019 Evining Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

व्हिडिओकॉन उद्योगसमूहाचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. धूत यांच्यासह, आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्याविरोधातही सीबीआयनं लूकआऊट नोटीस जारी केली आहे. सुमारे एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेले हे तिघे आरोपी, देशाबाहेर पळून जावू नयेत, यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

****

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणी अटक झालेल्या राजीव सक्सेना याच्या अंतरिम जामिनाची मुदत दिल्ली न्यायालयानं २५ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. सक्सेना यानं, न्यायालयाकडे जामीन मागताना, आपल्याला रक्ताचा कर्करोग तसंच हृदयविकार असल्याचं कारण दिलं होतं. त्यावर न्यायालयानं गेल्या चौदा तारखेला सक्सेनाला सात दिवसांचा जामीन मंजूर केला होता, त्याची मुदत आता २५ तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला, सक्सेनाच्या प्रकृतीविषयी सविस्तर अहवाल देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे.

****

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन हस्तकांना उत्तरप्रदेशात लखनौ इथून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली. काश्मीरमधल्या कुलगाम आणि पुलवामा इथले रहिवासी असलेले हे दोघे, स्थानिक युवकांनी, त्यांच्या संघटनेत सामील व्हावं, यासाठी कार्यरत होते, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

प्रत्येक नागरिकाच्या डिजिटल समावेशासाठी भारत वेगाने पुढे जात असल्याचं, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत, डिजिटल इंडिया २०१८ पुरस्कार समारंभात ते बोलत होते. जागतिक स्तरावर डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या दिशेने देश आघाडीवर असून, सध्या देशात १७ कोटी शेतकरी डिजिटल कार्ड धारक असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २३ आणि २४ फेब्रुवारीला मतदार नोंदणीसाठी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्य निवडणूक विभागानं ही माहिती दिली. विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत, मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी ही दोन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अधिक माहिती साठी १ ९ ५ ० ह्या निशुल्क क्रमांकावर तसंच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र शासनानं १० वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांची रोखे विक्रीस काढले असून ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या, अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट इथल्या कार्यालयात २६ फेब्रुवारीला हा लिलाव होणार आहे.

****

राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावासह सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असं आश्वासन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. परभणी इथं आयोजीत राज्यस्तरीय कृषी आणि पशू पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते आज बोलत होते. सततची नापिकी, दुष्काळ ही संकटं शेतकऱ्यांपुढे उभी असल्यामुळे, शेतकरी जगला पाहिजे, हे धोरण शासनानं अवलंबलं, तरच शेतकरी तरेल. असंही मुंडे यावेळी म्हणाले.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी मुख्यमंत्र्यांचं नांदेडच्या गुरु गोविंदसिंहजी विमानतळावर आगमन झालं. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. केंद्रीय परिवहन मंत्री नीतिन गडकरी यांचंही नांदेड विमानतळावर आगमन झालं. मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथल्या कार्यक्रमांना हजेरी लावून, सायंकाळी परळीकडे प्रस्थान केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर ६६ धावांनी विजय मिळवला. मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या आजच्या सामन्यात, भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत, इंग्लंड संघासमोर २०३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, मात्र इंग्लंडचा संघ ४१ व्या षटकांत अवघ्या १३६ धावांवर सर्वबाद झाला. आठ षटकांत २५ धावा देत चार बळी घेणारी भारताची एकता बिष्ट, सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. मालिकेत पुढचा सामना सोमवारी २५ तारखेला मुंबईतच होणार आहे.

****

No comments: