Friday, 22 February 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 22.02.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२  फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****

·       दुष्काळ घोषित झालेल्या साडेचार हजार गावांना विविध सवलती देणारा शासन निर्णय जारी

·       लोकसभेसाठी युती करताना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला एकही जागा न देणे हा अन्याय- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

·       कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ

आणि

·      मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखिल भारतीय किसान महासभेचा महामोर्चा स्थगित

****

राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या १५१ तालुक्यातल्या चार हजार, ५१८ गावांसाठी विविध सवलती राज्य सरकारनं जाहीर केल्या असून याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यानुसार या सर्व गावांना जमीन महसूलात सूट देण्यात आली असून सहकारी कर्जाचं पुर्नगठण केलं जाणार आहे. याशिवाय शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीज बिलात साडे तेहतीस टक्के सवलतही जाहीर करण्यात आली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजना कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यकतेनुसार टँकरद्वारा पाणीपुरवठा, शेत पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतींचा यामध्ये समावेश आहे.

****

लोकसभेसाठी युती करताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं एकही जागा न देण्याचा निर्णय घेऊन अन्याय केल्याची भावना काल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईची एक जागा आपण मागितली होती असं ते म्हणाले.

मागच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये साताऱ्याची जागा आरपीआयला दिली होती.आणि ती जागा शिवसेनेच्या कोट्यातली होती.तर आत्ता मी इच्छा व्यक्त केली होती. रिपब्लिकन पक्षाला जास्त जागा मागून त्यांना अडचणीत आणण्याची आमची भूमिका अजिबात नव्हती. आज पुन्हा नाही, एक जागा मला दक्षिण मध्य मुंबईची त्या मतदार संघामध्ये मी 98 मध्ये निवडूण आलो होतो. ईशान्य मुंबई मतदार संघ ही माझ्यासाठी चांगला आहे. त्यामुळे चर्चा करून मी माझी भूमिका मांडली होती. पण रिपब्लिकन पक्षाला एकही जागा न सोडणं हे थोडसं  मनाला खटकण्यासारखा निर्णय झाला आहे.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून पुढील धोरण ठरवणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

****

राज्यात, आर्थिक दुर्बलांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘आपला दवाखाना’ योजना सुरू केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल, आयुष्यमान भारत अभियानांतर्गत परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवेसाठी राज्यातल्या १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचं लोकार्पण  शिंदेंच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात ‘आपला दवाखाना’ची शंभर केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात बारावीच्या परिक्षेला काल सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या परीक्षेत नक्कल करण्याचे ७५ प्रकार उघडकीस आले. राज्यभरात एकूण १४ लाख, ९१ हजार, ३०६ विद्यार्थी नऊ विभागीय केंद्रांच्या माध्यमातून ही परिक्षा देत आहेत.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्याच्या चपुरवाडीचे बाळासाहेब दोडपले यांची काल राज्य सरकारनं नियुक्ती केली. त्यांना राज्य मंत्री पदाचा दर्जा असणार आहे.

****

राज्य सरकारनं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्ष असेल, या फेरनियुक्तीबद्दल रहाटकर यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्याही त्या अध्यक्ष आहेत.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर आठ पूर्णांक ५५ टक्क्यांवरून आठ पूर्णांक ६५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ही व्याज दरवाढ लागू असणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

धनगर समाज आरक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणासाठी या समाजाच्या शिष्टमंडळानं काल सुरुवातीला ठाकरेंची भेट घेतली. त्यांना पाठिंबा देत ठाकरे यांनी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतचं निवेदन सादर केलं.

****

मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखिल भारतीय किसान महासभेचा नाशिकहून मुंबईकडे निघालेला महामोर्चा काल रात्री उशिरा स्थगित करण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी आंदोलनाचे नेते कॉमरेड अशोक ढवळे, अजित नवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांनी चर्चा केली.त्यानंतर हा निर्णय झाला. शेतकरी कर्ज माफी, वन हक्क दावे मंजूर करणं, महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे जाऊ न देणं यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता.

****

सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्यावतीनं चार वर्षात बारा लाख दिव्यांगांना कृत्रिम उपकरणांचं वाटप करण्यात आलं असून, त्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम सरकार करत असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. काल जालना इथं, दिव्यांगांसाठी आयोजित सहायक उपकरण वितरण शिबिरात ते काल बोलत होते. या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना प्रातिनिधिक स्वरुपात तीन चाकी सायकल, श्रवण यंत्र, ब्रेल कीट, स्मॉर्ट फोन आदी २३ प्रकाराच्या सहित्याचं वाटप करण्यात आलं.

****

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. २०१२ पासून २०१८ पर्यंतचे हे पुरस्कार अनुक्रमे भारती आपटे, विमल साळवे, मंगल खिंवसरा, अंजली रावते वाघमारे, डॉक्टर गीता लाटकर, आणि आस्मा निखत यांना जाहीर झाले आहेत. परवा शनिवारी २३ फेब्रुवारीला, नांदेड इथं कुसुम नाट्यगृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पाच हजार रुपये, आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

ज्येष्ठ लेखक, संपादक आणि गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त, श्रीधर माडगूळकर यांचं काल दुपारी पुण्यातल्या, एका खाजगी रूग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. माडगुळकरांचं जिप्सी हे मासिक, 'आठी आठी चौसष्ट' ही कादंबरी तसंच “मंतरलेल्या आठवणी”  हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

****

प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार बडजात्या यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे वडील असलेले राजकुमार बडजात्या यांनी, राजश्री प्रॉडक्शन या आपल्या चित्रपट कंपनीच्या माध्यमातून, नदिया के पार, चितचोर, मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, विवाह, प्रेम रतन धन पायो, अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली होती.

****

बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांना लाच घेतल्या प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर निलंबित करण्यात आलं आहे. बीड जिल्हा पुरवठा विभागात धान्याच्या अपहारप्रकणी संबंधीतांना अनुरुप चौकशीचा अहवाल देण्यासाठीहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती, त्यापैकी पाच लाख रुपये स्वीकारताना त्यांच्यासह अन्य एक जणाला पकडण्यात आलं होतं.

****

औरंगाबाद इथं काल सहा लाख तीस हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. शहरातल्या शिवशंकर कॉलनीमध्ये किरायाच्या खोलीत हा गुटखा साठवून ठेवण्यात आला होता. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या पुढाकारानं ही कारवाई करण्यात आली.

****

औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, स्वातंत्र्यसैनिक प्राध्यापक दिनकर बोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षीचं पहिलं पुष्प ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. किशोर बेडकिहाळ गुंफणार आहेत.

//**********//


No comments: