Thursday, 28 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८   फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतानं उधळला; पाकिस्तानचं एक विमान पाडलं

v कारवाई दरम्यान, भारतानं एक मिग २१ विमान गमावलं; पाकिस्तानच्या ताब्यातल्या वैमानिकाची सुटका करण्याची मागणी

v कृषी, रस्ते, ऊर्जा आणि आदिवासी विभागासाठी भरीव तरतुदी असलेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधी मंडळात सादर

आणि

vविश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मात्र टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव; मालिकाही गमावली

****



 भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव काल भारतानं उधळून लावला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. या कारवाईत भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाचं एक विमान पाडलं. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं. या कारवाईत भारतानं एक मिग-२१ विमान गमावलं. या विमानाचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात आहे, असं ते म्हणाले.



 दरम्यान, या जखमी वैमानिकाची दृश्य फीत काल पाकिस्ताननं जारी केली. मात्र असं करून, पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा तसंच जिनेव्हा कराराचं उल्लंघन केल्याचं भारतानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं या वैमानिकाला तातडीनं सुरक्षित परत पाठवावं, असं भारतानं, पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून सांगितलं.



 रम्यान, जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात हवाई दलाचं एक मालवाहू हेलिकॉप्टर कोसळून हवाई दलाचे सहा अधिकारी ठार झाले. यात एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला.

****



 वायू दलानं परवा पाकिस्तानात केलेल्या हवाई कारवाईचं, विरोधी पक्षांनी स्वागत केलं आहे. काल नवी दिल्लीत २१ विरोधी पक्षांची बैठक झाली, या बैठकीत सर्व विरोधी पक्ष सैन्यदलासोबत भक्कमपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, द्रविड मुनेत्र कळघमचे तिरुची शिवा आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

****



 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल कृषी, रस्ते, ऊर्जा आणि आदिवासी विभागासाठी भरीव अशा तरतुदी असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत या अर्थसंकल्पाचं वाचन केलं. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याची ग्वाही सरकारनं दिली. शेतकऱ्यांना सन्मानानं जगता यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातला शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार, असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होत असल्याने राज्याच्या तिजोरीत १९ हजार ७८४ कोटी रुपये इतकी महसुली तूट अपेक्षित असल्याचं ते म्हणाले.



सन 2019-20 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 3 लक्ष 14 हजार 498 कोटी रुपये व महसुली खर्च हा  3 लक्ष 34 हजार 273 कोटी खर्च अंदाजीत केला. परिणामी 19 हजार 784 कोटी रुपये महसुली तूट येत आहे. अनावश्यक खर्चात बचत करून व महसूल वसूली अधिक प्रभावीपणे करून हि तूट मर्यादीत करण्याचा मी प्रयत्न करेणं.



 राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती देताना, मुनगंटीवार यांनी, गेल्या १५वर्षांच्या तुलनेत राज्यावर कर्जाचा बोजा स्थल उत्पन्नाच्या १४ पूर्णांक ८२ शतांश टक्के एवढा असल्याचं सांगितलं.



 सामाजिक विकास विभागासाठी तीन हजार १८० कोटी, इतर मागासवर्गीय कल्याणासाठी दोन हजार ८९२ कोटी, महिला बालविकास दोन हजार ९२१ कोटी, अल्पसंख्याक विकास ४६२ कोटी, गर्भवती आणि स्तन्यदा मातांच्या पोषण आहार योजनेसाठी एक हजार ९७ कोटी, शेती तसंच उद्योगांना तर सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी पाच हजार २१० कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.



 औरंगाबादसह आठ शहरांमध्ये राबवल्या जात असलेल्या स्मार्ट सिटी योजनेसाठी चोवीसशे कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत चारशे कोटी रुपये वाढ, राज्यातल्या ३८५ शहरांत राबवल्या जात असलेल्या, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सहा हजार ८९५ कोटी, मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना, अल्पदरांत धान्य पुरवठ्यासाठी ८९६ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे.

****



 शेती- सिंचन, आरोग्य, महिला आणि बाल विकास या क्षेत्रांसह प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोक कल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद करुन राज्याची विकास यात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धार काल  सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उद्योग आणि रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, कौशल्य विकास या कार्यक्रमांबरोबरच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदी सहाय्यभूत ठरणार आहेत, असंही ते म्हणाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून, तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून, त्या २९ मार्चपर्यंत चालणार आहेत.

****



 नांदेड नगर पालिकेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष पुरुषोत्तम माहेश्वरी यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षाचे होते. नांदेड इथल्या उस्मानशाही मिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काही काळ कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी नांदेड नगरपालिका निवडणूक  लढवली आणि नगराध्यक्ष झाले. नांदेडच्या महिला महाद्यिालयाचे ते सचिव तर प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. याशिवाय अन्य काही संस्थामध्ये ते सक्रिय होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता गोवर्धन घाट स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 शाळा न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथले शिक्षण संस्थाचालक राजकुमार सावंत आणि सचिव राहूल प्रधान यांना पंधरा दिवसांची कैदेची आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा गंगाखेड न्यायालयाने सुनावली आहे. कामावरून कमी केलेल्या शिक्षिकेला ४० दिवसाच्या आत पुन्का कामावर रूजू करून घेऊन वेतन देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते, मात्र या आदेशाचं पालन या संस्थाचालकांनी केले नाही, त्यामुळे सदरील शिक्षिकेनं न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

****



 औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ - म्हाडानं औरंगाबाद शहरातल्या अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या सदनिकांचे दर २० ते ४७ टक्यांपर्यंत कमी केले आहेत. म्हाडाचे अध्यक्ष उदय  सामंत यांनी  काल शहरातल्या  अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या रिक्त असलेल्या एकूण ९१७  सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचं उद्धाटन केलं,  त्यावेळी वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगरपरिषदेसाठी काल ७१ टक्के मतदान झालं. नगराध्यक्ष आणि २६ नगरसेवकांसाठी ही निवडणूक झाली. आज सकाळी दहा वाजता या मतदानाची मोजणी केली जाणार आहे.

****



 नवी दिल्लीत काल संपलेल्या  विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या जोडीनं मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं आहे. १० मीटर एअर पिस्टल प्रकारात या जोडीनं ४८३ पूर्णाक ४ दशांश गुणांची कमाई केली. अंतिम फेरीत त्यांनी चीन आणि जपानच्या खेळांडूचा प्रतिकार मोडून काढला.



 दरम्यान, काल बंगरूळू इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा सात गडी राखून पराभव केला आणि मालिकाही जिंकली. भारतानं  ऑस्ट्रेलियासमोर  ठेवलेलं १९१ धावाचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं २ चेंडू राखून पूर्ण केलं. भारताचा कर्णधार विराट कोहली यानं नाबाद ७२ धावा काढल्या.

****



 उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या जळकोट वाडी इथले शेतकरी त्रिंबकभाऊ फंड यांनी त्यांना मिळालेली कृषी भूषण पुरस्काराची ५१ हजार रूपयांची रक्कम पुलवामा इथं शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना समर्पित केली आहे. काल जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे त्यांनी ही रक्कम  सुपूर्द केली. फंड यांच्यासोबतच बोरामनी गावातल्या वजीर मुजावर शेख, वडगाव शिराढोण इथले  उद्धव पवार आणि अन्य शेतकऱ्यांनी मिळून एक लाख सोळा हजार रूपये या शहिदांच्या परिवारांना  दिले.

****



 पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत परभणी जिल्ह्यातल्या  नागरीकांसाठी आयुष्यमान भारत या योजनेच्या पत्रांचं वाटप काल जिल्हा सामान्य रुग्णालय इथं खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं.  दरम्यान येत्या शनिवारी २ मार्चला राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत परभणी इथं आरोग्य शिबीराचे आयोजन सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यत करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****


 दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं, उन्हाळी सुट्यांनिमित्त नांदेड इथून सुरू केलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यानुसार, नांदेड- हजरत निझामुद्दीन दिल्ली-नांदेड, नांदेड – तिरुपती –नांदेड, तिरुपती-नगरसोल-तिरुपती, नांदेड-पनवेल-नांदेड आणि हैदराबाद-जयपूर-हैदराबाद या विशेष गाड्या येत्या जूनपर्यंत सुरू राहणार आहेत.

*****

***

No comments: