Wednesday, 27 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७   फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानमधल्या जैश-ए-महम्मदच्या बालाकोट दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला; मोठ्या संख्येनं दहशतवादी, आणि जिहाद्यांचा खात्मा 

v जम्मू आणि काश्मीर सीमा रेषेवर पाकिस्तानी सेनेनं केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या पाच चौक्या उद्ध्वस्त

v पाक पुरस्कृत दहशतवादाला चोख उत्तर दिल्याबद्दल देशभरातल्या जनतेत समाधान आणि आनंद

v राज्याचा २०१९-२० वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होणार

 आणि

v मराठवाड्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सात जण ठार तर तीन जण जखमी

*****



भारतीय हवाई दलानं काल पहाटे पाकव्याप्त कश्मीरमधल्या खैबर पख्तुनख्वा भागात बालाकोट इथं जोरदार हल्ले करुन, जैश-ए-महम्मदचा सर्वात मोठा अड्डा उद्ध्वस्त केला. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. भारतात आणखी आत्मघातकी दहशतवादी हल्ले करण्याचा जैश-ए-महम्मदचा प्रयत्न असून, त्यासाठी फिदाईन जिहादींना प्रशिक्षण दिलं जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं. या कारवाईत मोठ्या संख्येनं दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक, अनुभवी म्होरके आणि जिहाद्यांचा खात्मा झाल्याचं गोखले यांनी सांगितलं,  हा अड्डा जैश-ए-महम्मदचा प्रमुख मसूद अझर याचा मेहूणा मौलाना युसुफ अझर ऊर्फ उस्ताद घौरी चालवत होता, असं ते म्हणाले. हल्ल्यात नागरिकांना इजा होणार नाही, याची काळजी घेऊन ही कारवाई केली. दहशतवादाच्या विरोधात सर्व उपाययोजना करण्यासाठी भारत कटीबद्ध असून, आता पाकिस्ताननं जैश-ए-महम्मदसह सर्व दहशतवादी गटांचे अड्डे नष्ट करावेत, अशी भारताची अपेक्षा असल्याचं गोखले यांनी सांगितलं.



 दरम्यान, काल रात्री जम्मू आणि काश्मीर सीमा रेषेवर राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सेनेनं केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना भारतीय सेना दलानं सीमारेषे लगतच्या पाच चौक्या उद्ध्वस्त केल्या. यामध्ये पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाले असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं. काल संध्याकाळी साडे सहा वाजेनंतर पाकिस्तानी सैनिकांनी युद्धबंदीच्या नियमाचं उल्लंघन करत अचानक शस्त्रास्त्राचा भारतीय हद्दीत मारा करत बॉम्ब फेकले. यावेळी त्यांनी सामान्य नागरिक लक्ष्य केले. मात्र भारतीय सेनेनं नागरी वसाहतीपासून दूर असलेल्या पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करत प्रत्यत्त्यतुत्तर दिलं. यात भारताचेही पाच सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत.

****



 जम्मू काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारीला पुलवामा इथं केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभर संताप व्यक्त होत होता. कालच्या कारवाईने पाक पुरस्कृत दहशतवादाला योग्य उत्तर मिळाल्याची भावना देशभरातून व्यक्त झाल्या. सर्व राजकीय पक्षांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे. भाजपानं पंतप्रधानांच्या दृढ इच्छाशक्तीचा गौरव केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधींनी भारतीय वायूसेनेबद्दल आदर व्यक्त करत या कारवाईचं स्वागत केलं आहे. पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसंच तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनीही या कारवाईचं स्वागत केलं आहे. क्रिडाजगताकडूनही या कारवाईचं स्वागत होत आहे.

****



 पाक पुरस्कृत दहशतवादाला भारतानं चोख उत्तर दिल्याबद्दल सर्वसामान्य जनतेनंही समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात या कारवाईचं जोरदार स्वागत केलं आहे.



 उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. उस्मानाबाद, उमरगा, आदी ठिकाणी साखर वाटण्यात आली, तर लोहाऱ्यात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. परभणी शहर तसंच जिल्ह्यातही नागरिकांनी फटाके फोडून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला. औरंगाबाद इथंही गुलमंडी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला.

****



 देश सुरक्षित हातात असून, देश सन्मानाला धक्का पोहोचेल असं काही घडू देणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल राजस्थानात चुरु इथं आयोजित सभेत बोलत होते. देशापेक्षा महत्त्वाच काहीच नसून, देशाची सेवा करणाऱ्या व्यक्तींपुढे, राष्ट्र उभारणीचं काम करणाऱ्या प्रत्येकापुढे आपण नतमस्तक असल्याचं ते म्हणाले. .

****



 वायूसेनेनं काल पहाटे केलेल्या या लक्ष्यभेदी कारवाईचं, राज्य विधानसभेनं एकमुखानं अभिनंदन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हा अभिनंदनाचा ठराव मांडला. शिवसेनेचे सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नसीम खान, शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, यांनी या प्रस्तावाला अनुमोदन देत, वायूसेनेचं कौतुक केलं.

****



 राज्याचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होत आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी दोन वाजता विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री विधान परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.

****



 मूळ आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरात लवकर पाठवण्यात येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत सांगितलं. यावर केवळ निवडणुकीसाठी धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून विधानपरिषदेतही काल प्रचंड गदारोळ झाला.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी झालेल्या सर्व कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द असल्याचं प्रतिपादन कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं कामगार विभागामार्फत आयोजित कल्याणकारी मंडळाच्या लाभ सोहळा वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. राज्यातल्या कामगारांना सुरक्षितता मिळावी म्हणून १० हजार रुपये किमतीच्या सुरक्षा आणि अत्यावश्यक संचाचं वाटप करण्यात येत आहे तसंच नोंदणी झालेल्या प्रत्येक बांधकाम कामगारांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये बांधकाम औजारांच्या खरेदीसाठी देण्यात येत असल्याचंही निलंगेकर म्हणाले.

****



 मराठवाड्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सात जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद नाशिक महामार्गावर वैजापूर इथं परवा मध्यरात्री कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात औरंगाबाद इथल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतांमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सविता घुले, त्यांचे पती विलास घुले आणि अन्य दोघांचा समावेश आहे. कंटेनरचे चाक फुटल्यानं समोरून येणाऱ्या मोटारीवर जाऊन तो आदळल्यामुळे हा अपघात झाला.



 पुणे- सोलापूर महामार्गावर काल सायंकाळी झालेल्या अन्य एका अपघातात मोटारसायकलला मोटारीने धडक दिल्यामुळे तीन जण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पती - पत्नी आणि एका दहा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

****



 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं उदारमतवादी शिक्षणावर अधिक भर द्यावा, असं आवाहन बंगळूरू इथल्या अंतरिक्ष संशोधन संस्था इस्त्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के कस्तुरीरंगन यांनी केलं आहे. स्वारातीम विद्यापीठाचा २१ वा दिक्षांत समारंभ काल नांदेड इथं पार पडला, त्यावेळी कस्तुरीरंगन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसलें यांच्यासह कुलसचिव, परिक्षा नियंत्रक आणि विभाग प्रमुख उपस्थीत होते. दीक्षांत समारंभात विविध अभ्यासक्रमात विशेष प्राविण्यासह गुण मिळवलेल्या विद्याथ्यांचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.

****



 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या पार्थिवावर काल कन्नड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी नागद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाउ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह सर्वपक्षीय आमदार, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. परवा, सुरेश पाटील यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती.



 दरम्यान, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या अॅड सदाशिव गायके आणि आणि नानासाहेब पाटील यांना काल औरंगाबादच्या मुख्यदंडाधिकाऱ्यांनी गुरूवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

****



 भूमीहीन शेतमजूरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल देशव्यापी धरणे आंदोलन केलं. लालबावटा शेतमजूर संघटना तसंच भारतीय खेत मजदूर संघटनेच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाचा भाग म्हणून, औरंगाबाद इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. रोजगार हमी मजूरांना ५०० रुपये दैनिक वेतन,  व्याजासह वेतन थकबाकी, दरमहा दोन रूपये किलो दराने ३५ किलो धान्य, दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजनेचा लाभ, यासह इतर मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

****



 येत्या तीन आणि चार मार्चला हिंगोली इथं आयोजित विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांची निवड करण्यात आली आहे. राधिका वेमुला या संमेलनाच्या उद्घाटक आहेत. संमेलनाचं हे चौदावं वर्ष आहे.

****



 २७ फेब्रुवारी  - कवीवर्य कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस, कविता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आज निवडक कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे. परिषदेच्या डॉ.ना.गो.नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

*****

***

No comments: